तरुण भारत

शिथीलतेमुळे जनजीवन येतेय पूर्वपदावर

खासगी, सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत : खासगी बसगाडय़ा बंद असल्याने प्रवाशांचे हाल : काही दुकाने, आस्थापने अद्याप बंदच

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राजधानी पणजीसह राज्यातील सर्व प्रमुख शहरे तसेच प्रमुख गावात व ग्रामीण भागातील सुमारे दीड महिना ठप्प असलेले जनजीवन काल सोमवारपासून पूर्ववत सुरळीत चालू झाले. दीड महिना घरात राहून कोंडमारा झालेल्या जनतेने कालपासून आपापली नोकरी, धंदा, व्यवसाय सुरू केला. काही ठराविक दुकाने अद्यापही बंद ठेवण्यात आली असून ती आगामी काळातील लॉकडाऊन संपल्यानंतर चालू होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीस मर्यादित कर्मचारी घेऊन सुरू करण्यात आलेली सरकारी कार्यालये कालपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र खासगी बसगाडय़ा बंद राहिल्याने खासगी तसेच सरकारी कर्मचाऱयांना कामावर पोहोचण्यासाठी बराच त्रास सहन करावाल लागला.

 राजधानीत तसेच इतर भागातही खासगी प्रवासी बसगाडय़ांनी मात्र काल सोमवारी वाहतूक चालू करण्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांनी काल आपल्या बसगाडय़ा बंदच ठेवल्या. कदंबची वाहतूक मात्र सुरू होती. काही सरकारी कर्मचाऱयांनी त्या बसगाडय़ांचा आधार घेत व वैयक्तिक वाहने वापरून कार्यालयात हजेरी लावली. बहुतेक सर्व दुकाने कालपासून खुली करण्यात आली असून ग्राहकांची संख्या मात्र कमी प्रमाणात दिसून आली.

 सर्वत्र वाहने, लोकांची वर्दळ सुरु

गेले अनेक दिवस सुनसान असलेले शहरातील, प्रमुख गावातील रस्ते वाहनांच्या  वर्दळीमुळे कालपासून गजबजून गेले. वाहने तसेच लोकांची वर्दळ सुरु झाली. एकंदरीत जनजीवन बऱयाच प्रमाणात पूर्ववत झाल्याचे समोर आले असून मास्कचा वापर बहुतेक सर्वांनी केल्याचे आढळून आले. परंतु सामाजिक अंतर राखणे मात्र अनेक ठिकाणी होत नसल्याचे दिसून आले. अंतराचे नियंत्रण राखणारा, ठेवणारा कोणीतरी सांगणारा असेल तेथेच त्याचे पालन होताना दिसले. तरंतु इतरत्र मात्र त्यांचे पालन गंभीरतेने होत नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलीस तपासणीविना मिळाली मोकळीक

दुचाकीवर दोघे तर चारचाकी वाहनातूत चौघांना फिरण्यास मोकळीक देण्यात आल्याने काल मोठय़ा संख्येने वाहने रस्त्यावर धावताना दिसली. राष्ट्रीय महामार्गा किंवा इतर रस्त्यावर होणारी पोलीस तपासणी आता जवळजवळ बंदच झाली असल्याचे दिसून आले. सकाळी 7 ते सायंकाळी 7 असे एकूण 12 तास सर्वांना मोकळीक देण्यात आली आहे.

सायंकाळच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी

सांयकाळच्या वेळेस संचालबंदी लागू करण्यात आल्याने सायंकाळी 7 वाजल्यानंतर मात्र सर्व रस्ते पुन्हा एकदा थंडावले. संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे दुकाने बंद झाली तसेच वाहतूकही थंडावली. दुकानांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशीच वेळ देण्यात आली असून त्याचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांची गस्त चालू होती. राजधानीत काही ठिकाणी उघडी असलेली दुकाने पालिसांनी बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे राजधानीसह राज्यभरात सायंकाळनंतर सर्वत्र सामसूम दिसत होती.

घाऊक दारु दुकानांसमोर गर्दी

दारुची घाऊक विक्री दुकाने कालपासून चालू झाली आणि त्या दुकानांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा (सामाजिक अंतर पाळल्यामुळे) दिसून आल्या. लोकांना महिनाभर मद्यप्राशन लॉकडाऊनमुळे करता आले नव्हते. त्याची भरपाई करण्यासाठी अशा लोकांनी दारू दुनानांसमोर गर्दी केली होती. सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर त्या दुकानांना मोठय़ा प्रमाणात ग्राहक मिळाले.

खासगी बसगाडय़ा बंदच

सरकारने खासगी प्रवासी बसगाडय़ांना सुरू करण्यास अनुमती दिली परंतु 50 टक्केच प्रवासी घेण्याचे बंधन घातल्यामुळे खासगी बसमालक, चालकांनी गाडय़ा रत्यावर आणल्या नाहीत व चालवल्या नाहीत. अर्धे प्रवासी घेऊन गाडय़ा चालवणे परवडणारे नाही अशी माहिती काही बसचालकांनी, मालकांनी दिली. लॉकडाऊन चालू असल्याने लोकही घराबाहेर पडत नाहीत त्यामुळे प्रवासी मिळणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुकाने सुरु मात्र ग्राहक नाहीत

राज्यातील अनेक प्रमुख शहरातील बाजारपेठा व त्यातील बहुतेक दुकाने कालपासून सुरू झाली असून तेथे ग्राहकांची वाट पाहिली जात असल्याचे आढळून आले. पणजी मार्केट मात्र काल पूर्णपणे खुले झाले नाही काही दुकाने चालू करण्यात आली आहेत, तथापि ग्राहक नाहीत अशी वस्तुस्थिती आहे.

जोपर्यंत खासगी प्रवासी बसगाडय़ा सुरू होत नाहीत तोपर्यंत बाजारपेठेतील लगबग चालू होणे शक्य नाही असे अनेकांनी सांगितले. जनतेमध्ये अजुनही कोरोनाची भिती असून नोकरी, धंदा व्यवसाय करणारे, गरज भासणारे लोकच घराबाहेर पडत आहेत. इतर लोक मात्र घरातच राहून स्वतःला सुरक्षित ठेवत असल्याचे दिसून आले.

दारु खरेदीसाठी लागल्या रांगा : मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

प्रतिनिधी / मडगाव

लॉकडाऊनच्या काळात सर्व बार तसेच घाऊक दारू विक्रेत्यांची दुकाने बंद राहिल्याने दारू पिणाऱयांची बरीच गैरसोय झाली होती. चोरटय़ा मार्गाने दारू पिणेदेखील अनेकांना महाग पडले. त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले. मात्र, लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात व खास करून ग्रीन झोनमध्ये गोव्याचा समावेश झाल्याने, घाऊक पद्धतीने काल दारू विक्रीला प्रारंभ झाला. त्यामुळे दारू खरेदी करण्यासाठी मोठय़ा रांगाच लागल्या होत्या.

गोव्यात अनेकजण दारूविना थांबू शकत नाही. अशा मद्यपीची प्रचंड गैरसोय झाली होती. अनेकांच्या प्रकृतीवर देखील परिणाम झाला होता. कधी एकदा दारू उपलब्ध होते व कोरडा पडलेला घसा ओला करतो असे त्यांना झाले होते. त्यांनी काल सुटकेचा श्वास सोडला. काल सोमवारपासून घाऊक पद्धतीने दारू विक्रीला मान्यता दिल्याने, सकाळपासून दारू खरेदीसाठी गर्दी उडाली होती. मडगाव शहरात तर अनेक घाऊक विक्रेत्यांच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घाऊक पद्धतीने दारू खरेदी करावी लागत असल्याने, अनेकांनी आपली वाहने सोबत आणून दारू खरेदी केली व पुढील काही दिवसाचा साठा करून ठेवला. लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यातही बार सुरू करण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे मद्यपीना एक तर आपल्या घरात किंवा मित्रांसोबत बाहेर कुठे तरी दारू प्यावी लागली.

मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

दारू विना थांबू न शकणाऱयांना जेव्हा सोमवारपासून दारू उपलब्ध झाली, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मनापासून आभार मानले. दारू विना आणखीन थांबणे शक्य नव्हते. सहनशिलता संपत आली होती. त्यात आरोग्यावर देखील परिणाम झाला होता अशा प्रतिक्रिया मद्यपीनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.

म्हणे दारू पिणारे अर्थव्यवस्था मजबूत करते

आज जर कोणी दारू आणायला जात असेल तर टाळय़ा वाजवून त्याचा उत्साह वाढवा, कारण तो अर्थव्यवस्था मजबूत करायला निघाला आहे अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावरून काल मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाले. काल दारू खरेदी करण्यासाठी लागलेल्या रांगा पहाता नक्कीच यात काही प्रमाणात तथ्य असावे याला पुष्टी मिळाली. दारू विक्रीसाठी अबकारी खात्याला मोठय़ा प्रमाणात कर भरावा लागतो व त्यातूनच अर्थव्यवस्था मजबूत होते असा देखील दावा केला जात आहे.

Related Stories

लोकलढय़ाचा विजय, आयआयटी हद्दपार!

Amit Kulkarni

येत्या 10 महिन्यात कला अकादमीचे होणार नूतनीकरण

Amit Kulkarni

माशेल भागात मर्यादीत लॉकडाऊन यशस्वी

Omkar B

डॉ. आपोलोनियो लुईस निवर्तले

Amit Kulkarni

जे.पी. नड्डा शुक्रवारी गोव्यात

Amit Kulkarni

झुवारी पूल 18 रोजी सकाळी तीन दास बंद

Patil_p
error: Content is protected !!