तरुण भारत

आंबा वाहतुकीतील चालक ‘पॉझिटिव्ह’

जिल्हय़ात तिसरा रुग्ण : ‘मुंबई कनेक्शन’ही कायम : वायंगणीतील रहिवासी : गावात सर्व्हे सुरू

  • युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

 सिंधुदुर्ग जिल्हय़ात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील 27 वर्षीय युवक मुंबई येथे आंबा वाहतुकीसाठी चालक म्हणून जाऊन आल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान वायंगणी गाव कन्टेटन्मेट झोन जाहीर करण्यात येऊन त्या युवकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिली.

जिल्हय़ात 25 मार्च रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला. हा रुग्ण मेंगलोर एक्सप्रेसने मुंबईहून प्रवास करून कणकवली येथे येत असताना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. हा रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर 29 एप्रिलला मुंबई येथून प्रवास करून आलेली 17 वर्षीय युवती कोरोना बाधित सापडली. तिच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. त्यानंतर आता पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये तिसरा कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण सिंधुदुर्ग जिल्हय़ातील स्थानिक आहे. मात्र मुंबई येथून तो जाऊन आला असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

26 एप्रिलला मुंबईला जाऊन आला

सिंधुदुर्गात कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला तिसरा रुग्ण हा आंबा वाहतुकीतील वाहन चालक आहे. 26 एप्रिल रोजी तो मुंबई येथे गेला होता. तर 27 एप्रिल रोजी तो परत आला होता. त्यानंतर त्याला संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. मुंबई येथील हॉटस्पॉटमधून आल्यामुळे पाच दिवसांनंतर 2 मे रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यानंतर या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये तात्काळ दाखल करण्यात आले असून सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर आहे.

संपूर्ण वायंगणी गाव ‘कन्टेटन्मेट झोन’

दरम्यान, संपूर्ण वायंगणी गाव कन्टेटन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात येऊन आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करून कोरोना तपासणीसाठी नमुने पाठविले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंयज चाकुरकर यांनी दिली.

सिंधुदुर्गवर ‘कोरोना’ वाढीचे संकट कायम

जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणात आंबा वाहतूक मुंबईसह विविध ठिकाणी होत आहे. तसेच मुंबईतून अनेक लोक वेगवेगळी कारणे दाखवून जिल्हय़ात येऊ लागले आहेत. आतापर्यंत सापडलेले तीनही कोरोना बाधित रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात मुंबईहून येणाऱया लोकांची संख्या वाढल्यास कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

आणखी 39 रिपोर्ट निगेटिव्ह

जिल्हय़ात एकूण 488 व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी 323 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर 165 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत एकूण 566 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी 518 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 48 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. विलगीकरण कक्षामध्ये आजमितीस 67 व्यक्ती दाखल आहेत. त्यापैकी 30 रुग्ण हे विशेष कोवीड रुग्णालयात दाखल असून 37 रुग्ण हे विशेष कोवीड आरोग्य केंद्रामध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत मंगळवारी दिवसभरात 4584 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

घरीच अलगीकरण                                 0323

संस्थात्मक अलगीकरण                0165

पाठविण्यात आलेले एकूण नमुने               0566

अहवाल प्राप्त झालेले नमुने                      0518

आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने                    0003

निगेटिव्ह आलेले नमुने                0516

अहवाल प्राप्त न झालेले नमुने                   0048

विलगीकरण कक्षात दाखल                      0067

सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण                   0002

मंगळवारी तपासणी झालेल्या व्यक्ती         4584

Related Stories

कोरोनाने आणखी 15 जणांच्या मृत्यूची नोंद

Patil_p

कुडाळ येथे कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू

NIKHIL_N

शिक्षक चंद्रकांत सावंत यांना “मानद डॉक्टरेट”

Ganeshprasad Gogate

जिल्हय़ातील राष्ट्रवादीत लवकरच फेरबदल!

Patil_p

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया युवकावर गुन्हा

NIKHIL_N

अडकलेल्या दोन ट्रेकर्सची खेड पोलिसांकडून सुखरूप सुटका

Patil_p
error: Content is protected !!