तरुण भारत

नेत्रावळी अभयारण्यात दुर्मिळ ‘ब्लॅक पँथर’चा वावर

पाटय़ें बिटमधील धारगिणी भागातील कॅमेऱयात झाला कैद, मुख्यमंत्र्यांनी केले छायाचित्र ‘ट्विट’

प्रसाद तिळवे / सांगे

Advertisements

नेत्रावळी अभयारण्य परिसरात वन खात्याने पाटय़ें बिटमधील धारगिणी भागात लावलेल्या कॅमेऱयात दुर्मिळ असा ‘ब्लॅक पँथर’ कैद झाला आहे. वन खात्याने वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून येथे कृत्रिम तळे निर्माण केले असून तेथे पाणी पिण्यासाठी जनावरे येत असतात. याच ठिकाणी वन खात्याने कॅमेरे बसविले असून यात हा ब्लॅक पँथर कैद झाला आहे.

याशिवाय अन्य अनेक प्राणी सदर कॅमेऱयांत कैद झाले असून यावषी ‘ब्लॅक पँथर’ कॅमेऱयात कैद होण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे नेत्रावळी अभयारण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वनखाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॅमेऱयांत टिपले गेलेले ब्लॅक पँथरचे सदर छायाचित्र ट्विटरवरून ट्विट केले आहे.

पंधराहून जास्त ठिकाणी कॅमेरे

सध्या सर्वत्र हा कुतुहलाचा विषय बनला आहे. वन खात्याने देखरेखीचा एक भाग म्हणून नेत्रावळी अभयारण्य परिसरात सुमारे पंधराहून जास्त ठिकाणी कॅमेरे बसविले आहेत. तसेच अनेक ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सोयी निर्माण केल्या आहेत. त्या ठिकाणी तसेच जनावरे प्रवेश करत असलेल्या वाटेवर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अशाच एका भाटी राऊंडमधील पाटय़ें बीट येथे लावण्यात आलेल्या कॅमेऱयात सदर ब्लॅक पँथर कैद झाला आहे.

या वृत्ताला नेत्रावळी अभयारण्याचे वनाधिकारी बिपीन फळदेसाई यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला. नेत्रावळी अभयारण्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कॅमेरे बसविलेले आहेत. त्यांची माहिती वनखाते सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवते. पावसाळय़ानंतर ऑक्टोबरपासून लावण्यात आलेल्या नेत्रावळी अभयारण्यातील कॅमेऱयांत कैद झालेला हा एकमेव ब्लॅक पँथर असून याशिवाय दोन बिबटे देखील कैद झाल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय अन्य जनावरांचा समावेश आहे.

विहिरीतून झाली होती ब्लॅक पँथरची सुटका वास्तविक नेत्रावळी अभयारण्य परिसरात ब्लँक पँथरचे खूप वर्षांपासून वास्तव्य असल्याचे अनेक जाणते लोक सांगतात. पाच ते सहा वर्षांपूर्वी एका विहिरीत पडलेल्या ब्लँक पँथरची वन विभागाने सुटका केली होती. सध्या कॅमेऱयात कैद झालेला ब्लॅक पँथर नर आहे की मादी हे कळू शकलेले नाही. मात्र तो पाच ते सहा वर्षांचा असावा असा अंदाज आहे. यासंदर्भातील माहिती वनाधिकारी फळदेसाई यांनी दक्षिण गोवा वन्यविभागाच्या उपवनपाल अनीषा कारकुल यांना दिली असून त्यांनी ती माहिती आपल्या वरिष्ठांना सादर केली आहे.

Related Stories

वाळपई शहराच्या आठवडी बाजाराला संमिश्र प्रतिसाद

Omkar B

सरकारची ऑफर ‘संजीवनी’ स्वयंपूर्ण बनविण्यासाठी

Amit Kulkarni

कोरोनामुळे काँग्रेसचे मतदार मतदानासाठी बाहेर पडलेच नाही

Omkar B

चीनमध्ये होणाऱया ऑलिंपिकवर बहिष्कार घाला

Amit Kulkarni

पेडणे तालुक्मयालाही चक्रीवादळाचा तडाखा

Amit Kulkarni

सांखळीत अडविले खनिजवाहू ट्रक

Patil_p
error: Content is protected !!