तरुण भारत

भारतीय संघ ‘क्वारंटाईन’ होण्यास तयार

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका वाचविण्यासाठी प्रयत्न, जादा सामना होण्याची शक्यता

वृत्तसंस्था / सिडनी

Advertisements

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी मालिका ठरल्याप्रमाणे व्हावी यासाठी भारतीय संघाने विलगीकरण स्वीकारण्याची तयारी दर्शविली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने शुक्रवारी सांगितले. मात्र त्याआधीची टी-20 विश्वचषक स्पर्धा होण्याबाबत त्यांनी फारशा आशावाद व्यक्त केला नाही. कदाचित ती रद्द होण्याची शक्यता असल्याचे त्याने सांगितले.

या वर्षाच्या अखेरीस विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार असून त्यात 4 कसोटी खेळविल्या जाणार आहेत. सध्या कोव्हिड-19 चा जगभरातच प्रकोप झालेला असल्याने प्रत्येक देशाने बाहेरून येणाऱयांसाठी विलगीकरणाचा नियम सक्तीचा केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात भारतीय संघ उतरल्यास दोन आठवडे संघाला विलगीकरणात रहावे लागणार आहे. ही मालिका वाचविण्यासाठी भारतीय संघाने विलगीकरणात राहण्याची तयारी दर्शविली असल्याचे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले. क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असून खजिना भरण्यासाठी त्यांनादेखील ही मालिका कोणत्याही परिस्थितीत व्हावी, असे वाटत आहे. ‘क्रिकेट पुन्हा सुरू व्हावे असे वाटत असेल तर याला पर्याय नाही. प्रत्येकाला क्वारंटाईन व्हावेच लागेल. तसे पाहिल्यास दोन आठवडय़ांचा कालावधी फार मोठा नाही,’ असे धुमल यांनी फेअरफॅक्स दैनिकांशी बोलताना सांगितले.

ऑस्ट्रेलियाने याच महिन्यात भारताला मागे सारत कसोटी मानांकनातील अग्रस्थान पटकावले आहे. त्यामुळे आगामी मालिकेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी असून एक संघ अग्रस्थान टिकविण्यासाठी तर दुसरा ते पुन्हा हस्तगत करण्यासाठी या मालिकेत लढणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर लॉकडाऊन घोषित करावे लागल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले असून उत्पन्नाचे स्रोतच थांबले आहेत. त्यामुळे ही मालिका झाल्यास लाखो डॉलर्सची कमाई लॉकडाऊनमुळे झगडणाऱया यजमान संघटनेला होणार आहे.

या मालिकेतून मिळणारा महसूल क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी इतका महत्त्वाचा आहे की, त्यांनी पाचवी कसोटी खेळवण्याचा प्रस्तावही भारतासमोर ठेवला आहे. भारताने हा प्रस्ताव मान्य केल्यास नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणारी एकमेव कसोटी रद्द करावी लागणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील मालिका वाढविण्याच्या प्रस्तावाबाबत आताच बोलणे घाईचे ठरेल, असे धुमल म्हणतात. जास्त उत्पन्न मिळत असल्याने भारतातील ब्रॉडकास्टर्सचे कसोटीपेक्षा वनडेला प्राधान्य असते, असे कारण त्यांनी दिले. त्यांना फक्त जादा कमाई हवी असते आणि ती कसोटीपेक्षा वनडे किंवा टी-20 सामन्यांतून होते, असे धुमल यांनी स्पष्ट केले. द्विदेशीय मालिका असल्याने ऑस्ट्रेलियन सरकार भारतीय संघाला आपल्या देशात प्रवेश देईल. पण टी-20 वर्ल्ड कपबाबत तसे म्हणता येणार नाही. त्यात सोळा संघांचा सहभाग असतो. याशिवाय बराच काळ क्रिकेटपासून दूर राहित्याने महत्त्वाचे खेळाडू ऑक्टोबरपर्यंत सज्ज होतील का, अशी शंका वाटत असल्याने ती रद्द होऊ शकते, असेही धुमल यांनी स्पष्ट केले.

Related Stories

आज मुंबई धावणार

Patil_p

वासची लंकेच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती

Patil_p

रशियाचा रूबलेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

भारतीय संघासाठी दोन आठवडय़ांचे क्वारंटाईन

Patil_p

लिव्हरपूलकडे प्रिमियर लीग फुटबॉल करंडक

Patil_p

कसोटी क्रिकेट खेळण्याचे ध्येय : काईल व्हिरेनी

Patil_p
error: Content is protected !!