तरुण भारत

पुतळय़ाची जागा अयोग्यच

डिचोली बचाव अभियान आपल्या दाव्यावर ठाम

डिचोली/प्रतिनिधी

डिचोली येथील श्री शांतादुर्गा हायस्कूलसमोरील सर्कलमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा चुकीच्या जागेवर बसविण्यात आला असून त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळेल, असा दावा डिचोली बचाव अभियानने गेल्या डिसेंबर महिन्यात केला होता. त्यावेळी या आक्षेपाला राजकीय रंग देत काहींनी आम्हाला विरोध केला. मात्र काहीच दिवसांपूर्वी या सर्कलजवळ झालेल्या अपघाताने सर्वांचेच डोळे उघडले आहे. डिचोली बचाव अभियान आजही आपल्या त्याच दाव्यावर ठाम असून राजकीय हट्टापोटी भविष्यात कोणाही निष्पाप माणसाच्या बळीस कारणीभूत ठरण्यापेक्षा सदर पुतळा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नरेश सावळ यांनी केली आहे.

डिचोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नरेश सावळ बोलत होते. यावेळी डिचोली बचाव अभियानचे सचिव नरेश कडकडे, सुदिन नायक, उमेश मांदेकर, निशांत चणेकर, श्रीपाद कुंभारजुवेकर, रूनाक्ष बांदेकर, कुंदन फोगेरी आदींची उपस्थिती होती.

महाराजांच्या पुतळय़ाला विरोध नाही, विरोध आहे चुकीच्या जागेला

डिचोली शहर हे ऐतिहासिक शहर असून जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला, त्या डिचोली महालात महाराजांचा आकर्षक अश्वारूढ पुतळा उभा राहावा, ही आमचीही इच्छा होती व आहे मात्र सदर पुतळा चुकीच्या जागी उभारण्यात आल्यामुळे होणाऱया अपघातांमुळे अनेकांना अपंगत्व पत्करावे लागणे किंवा प्राण गमवावे लागणे, आम्हाला मान्य नाही. सर्कलमधील महाराजांचा पुतळा हा चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आला असून ती चूक सुधारून तो चारही रस्त्यांच्या मधोमध उभारण्यात यावा, अशी आमची मागणी होती मात्र सदर मागणीला वेगळाच अर्थ देऊन राजकारण करण्यात आले. आमच्या शिवप्रेमावर शंका घेण्यात आली. पण काही दिवसांपूर्वी याच पुतळय़ाच्या पायथ्याशी भीषण अपघात होऊन एक निरपराध व्यक्तीला पाय गमवावे लागले. त्यावेळी अनेकांना आमच्या मागणी मागील वास्तव समजले. हे वास्तव समजून घेण्यासाठी एका निरपराध व्यक्तीला अपंगत्व यावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे, असे नरेश सावळ म्हणाले.

छत्रपतींच्या पुतळय़ाच्या पायथ्याशी रक्ताचा सडा सांडला

काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला व्यक्ती हा डिचोलीचा नव्हता. तरीही माणुसकीच्या नात्याते सर्वांनाच सदर घटनेमुळे वाईट वाटले आणि जर हा अपघातात सापडलेला इसम डिचोली शहरातील किंवा डिचोलीवासीयांच्या नात्यातील असता तर सर्वांना किती वाईट वाटले असते? याचा विचार करणे गरजेचे आहे. ज्या राजकीय हट्टापोटी सदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या वादग्रस्त जागेवर उभारण्यात आला आहे, त्या छत्रपतींनाही या अपघातामुळे वाईट वाटले असणारच. त्यांचेही विचार असे नाहक व निरपराध बळी घेण्याचे मुळीच नव्हते, असे नरेश सावळ यांनी नमूद केले.

या अपघातांना बांधकाम खात्याचे अधिकारी, पोलीस, आरटीओ जबाबदार

या पुतळय़ामुळे आतापर्यंत या सर्कलच्या सभोवताली 8 ते 9 अपघात घडले आहेत. राज्यात किंवा देशातही आज रस्ता रुंदीकरण करीत असताना रस्त्याच्या बाजूला व मधोमध असलेली बांधकामे, स्थळे, वास्तू स्थलांतरीत करून रस्त्याच्या बाजूला आणल्या जातात व रस्त्यावरील रहदारी सुरळीत कशाप्रकारे होईल, याकडे लक्ष दिले जाते मात्र डिचोलीत सुरळीत चाललेल्या वाहतुकीची लय बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. हे बांधकाम सुरू असताना जर जबाबदार व्यक्ती म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी, पोलीस, वाहतूक पोलीस, आरटीओ यांनी आक्षेप घेतला नसल्यास या आणि यापुढे होणाऱया सर्वच अपघातांना ते जबाबदार आहेत, अशी टीका यावेळी नरेश सावळ यांनी केली.

पुतळय़ाच्या खालून जाणाऱया जलवाहिनीचे काय?

या पुतळय़ाच्या खालून एक महत्त्वाची जलवाहिनी जात असून याद्वारे बोर्डे भागातील घरांना पाणी पुरवठा होतो. या पुतळय़ासाठी बांधकाम करताना सदर जलवाहिनी फोडली होती व नंतर ती दुरुस्त करण्यात आली मात्र आजपर्यंतच्या अभ्यासानुसार एकदा फुटलेली जलवाहिनी पुन्हा त्याच जागी वारंवार फुटतेच. जर या पुतळय़ाखालून गेलेली जलवाहिनी पुन्हा फुटली आणि बोर्डे व परिसरातील लोकांना पाण्याची समस्या निर्माण झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी पुतळय़ाची वास्तू फोडणार काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, असेही नरेश सावळ यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडे याविषयी चर्चा करणार

डिचोली शहरात व मतदारसंघात जर काही वाईट व वेगळे घडत असल्यास त्याविषयी लोकांना जागरुक करणे व संबंधित सरकारी अधिकारी, खात्यांना तसेच नगरपालिकेलाही सल्ला देणे आमचे कर्तव्य आहे. त्याच कर्तव्य भावनेतून आपण या गोष्टी मांडल्या आहेत. भविष्यात मोठय़ा अपघाताला कारणीभूत ठरू शकणाऱया चुकीच्या जागेवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने त्या जागेवरून हटवून इतरत्र बसवावा. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशीही सविस्तर चर्चा करणार आहे, असेही नरेश सावळ यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

सुस्त, गलथान कारभारामुळे कोलवाळ तुरुंगात कैद्याचा मृत्यू

Patil_p

राज्यपाल मलिक यांची बदली योग्य जागी

Omkar B

राष्ट्रीय जनता दल गोवाच्या अध्यक्षाचा राजीनामा

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयात पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र

Amit Kulkarni

कठोर कार्यवाहीसाठी आता मंत्र्यांवर जबाबदारी

Patil_p

काही एनजीओ सरकारच्या विकास प्रकल्पांना सातत्याने विरोध करतात – मुख्यमंत्री

Patil_p
error: Content is protected !!