तरुण भारत

‘ किराणा’ची दिवाळी!

‘ किराणा’ची दिवाळी!

कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मोदी सरकारनं 24 मार्च रोजी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला आणि 1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतातील लोकांच्या तोंडचं पाणी पळालं ते जीवनावश्यक वस्तू आता कशा मिळतील या चिंतेनं…मग अशा वस्तूंवर उडय़ा पडू लागल्या अन् मिळेल तितकी खरेदी करण्याचे, साठा करण्याचे प्रकार वाढीस लागले. त्यामुळं इतर अनेक उद्योग-व्यवसाय बंद असताना, मंदी पसरलेली असताना प्रचंड विक्री झाली ती किराणामालाची…काहींनी यासाठी जरी ऑनलाईन मार्ग पत्करलेला असला, तरी जास्त मागणी आली ती एरव्ही ‘ई-कॉमर्स’च्या लाटेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालं होतं त्या किराणामालाच्या दुकानांना. कित्येक दुकानमालकांच्या मतानुसार, अशी गर्दी त्यांनी बऱयाच काळापासून पाहिली नव्हती. सर्व थरांतील लोकांचा मोर्चा त्याकडे वळला. ‘ई-रिटेलर्स’वर ज्यांचा प्रामुख्यानं भरोसा असायचा त्या युवा पिढीच्या प्रतिनिधींचा सुद्धा त्यात समावेश राहिला…मग ज्यंनी गाशा गुंडाळण्याचं ठरविलं होता त्यांच्या दुकानांतील सर्व माल संपून गेल्यानं त्यांना नवसंजीवनी मिळाली. जे कुणी महिन्यातून एकदाच माल ऑर्डर करायचे त्यांनी दोन-दोनदा माल मागविला, तरी तो अपुरा पडू लागला. काहींची विक्री दुप्पट-तिप्पट वाढली…एकंदर किराणा क्षेत्राची कशी चांदी झाली त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप…

Advertisements

किराणामालावर 40 टक्के अधिक खर्च…

किराणामालाच्या दुकानांतील वस्तूंवर लोक कधी नव्हे इतका खर्च करू लागले असून ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यापासून ग्राहकांचा हा खर्च 40 टक्के वाढला असल्याचं एका पाहणीत आढळून आलंय…त्यानुसार, मार्च महिन्याच्या मध्यास जरी जीवनावश्यक वस्तू विकणाऱया दुकानांच्या संख्येत घट पाहायला मिळालेली असली, तरी विक्रीत मात्र प्रचंड उसळीचं दर्शन घडलं…मार्चच्या मध्यापासून एखाद्या ग्राहकाची सरासरी खरेदी 30 टक्क्यांनी वाढली आणि महिन्याचा शेवट पोहोचता पोहोचता त्यात भर पडली ती आणखी 30 टक्क्यांची. गेल्या काही आठवडय़ांत जरी त्यात काही प्रमाणात घट पाहायला मिळालेली असली, तरी नेहमीपेक्षा खरेदी 40 टक्के जास्तच राहिलीय…

चहा, कॉफीबरोबर ‘नूडल्स’, ‘पास्ता’वरही उडय़ा...

सदर पाहणीच्या अंतर्गत भारताच्या काही प्रमुख शहरांतील 17 लाख बिलांचं विश्लेषण करण्यात आलं. उपलब्धता नि जास्त फायदा यामुळं दुकानदारांनी ‘प्रीमियम’ म्हणजे महागडय़ा वस्तू ग्राहकांनी घ्याव्यात यासाठी रेटा लावल्याचंही त्यात दिसून आलंय…या पाहणीच्या निष्कर्षाप्रमाणं, लॉकडाऊन कसाच टळत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर काही शहरांत चहाच्या मागणीत साडेतीन पटींनी वाढ झाली. मात्र त्यानंतर त्यात घसरण आली. दक्षिण भारतातील राज्यांत अशीच परिस्थिती पाहायला मिळाली ती कॉफीच्या बाबतीत. मार्चच्या अखेरीसपर्यंत या विक्रीचा आलेख झपाटय़ानं वाढला आणि नंतर एप्रिलमध्ये तो उतरला…‘नूडल्स’, ‘पास्ता’ यांच्यावरच्या खर्चाचं प्रमाण देखील खूप वाढल्याचं दिसून आलंय. घरी असलेली बच्चे कंपनी अन् ‘फास्ट फूड’ची बंद असलेली आस्थापनं हे त्यामागचं कारण मानलं जातंय…

दुकानांकडील ओढा राहू शकतो कायम…

भारतातील अन्नधान्याच्या किरकोळ विक्रीवर तयार केलेला आणखी एक अहवाल एप्रिलच्या मध्यास प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार, 29 टक्के ग्राहकांनी जरी महामारीचा प्रभाव ओसरला, तरी पुन्हा या किराणामालाच्या दुकानांना पसंती देण्याची तयारी दर्शविलीय. अत्याधुनिक पद्धतीच्या सुपर मार्केट्समधील खरेदीचा कल जरी 5 टक्क्यांनी कमी झालेला असला, तरी महामारी गेल्यानंतर त्यांच्या ग्राहकांत 8 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज अहवालानं व्यक्त केलाय…‘लॉकडाऊन’च्या काळात अनेकांनी उपाहारगृहांतून तयार पदार्थ मागविण्यापेक्षा घरच्या घरीच ते तयार करण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळं अशा दुकानांतून झालेल्या किराणामालाच्या खरेदीत 53 टक्के वाढ, तर उपाहारगृहांतून तयार पदार्थ मागविण्याच्या प्रमाणात फक्त 11 टक्के वृद्धी पाहायला मिळाली…सदर अहवालानुसार, महामारीची तीव्रता कमी झाली, तरी घरी स्वयंपाक तयार करण्याच्या दृष्टीनं किराणामालाची खरेदी करणाऱया लोकांच्या प्रमाणात 48 टक्के वाढ पाहायला मिळेल…

काय सांगतो खरेदीचा ‘ट्रेंड’?

या अहवालाप्रमाणं, बहुसंख्य लोकांनी प्राधान्य दिलं ते जवळच्या किराणामालाच्या दुकानांतून खरेदी करण्यास. त्याचप्रमाणं दुकानांतील स्वच्छता या घटकालाही ग्राहकांनी खूप महत्त्व दिल्याचं आढळून आलंय. स्वच्छता सांभाळून दिलेली सेवा यास 50 टक्के ग्राहकांनी प्राधान्यक्रमात पहिल्या स्थानावर बसविलंय…38 टक्के लोकांनी दुकान निवडलं ते तिथं साहित्याची उपलब्धता कशी आहे ते पाहून…या अहवालात दिसून आलेली आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे कित्येकांनी आपल्या नेहमीच्या वापरातल्या वस्तू बदलून नवीन उत्पादनं नि ‘ब्रँड्स’कडे वळण्याची दाखविलेली तयारी. 65 टक्क्यांहून अधिक ग्राहक आपल्या नेहमीच्या ‘ब्रँड्स’पासून दुसरीकडे वळलेत. काहींच्या मते, ग्राहकांना नवीन ‘ब्रँड’ चोखाळून पाहणं भाग पडलंय ते परिस्थितीमुळं. उदाहरणार्थ काही जण ‘ब्रँडेड आटा’ नेहमी खरेदी करून न्यायचे. त्यांना तो उपलब्ध नसल्यानं मोकळा आटा घेऊन घरची वाट धरावी लागली. मात्र 89 टक्के लोकांनी आपण पुन्हा आपल्या मूळच्या ‘ब्रँड’कडे परतू असं सांगितल्याचं त्या अहवालात म्हटलंय…

दिवाळीपेक्षा जास्त विक्री…

मार्च महिन्यातील ‘लॉकडाऊन’नं रिटेल क्षेत्रातील अनेकांची दांडी उडविलेली असताना ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या रिटेल विभागाची कहाणी वेगळीच राहिलीय…कंपनीच्या किराणामालाच्या दुकानांनी त्या महिन्यात विक्रीचा उच्चांक नोंदविला. मालवाहतुकीत अडचणीत येत असतानाही सदर विक्री दिवाळीच्या सणाच्या वेळी होणाऱया कामगिरीला देखील मागं टाकून गेलीय असं कंपनीनं मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील आकडेवारी सादर करताना म्हटलंय…‘रिलायन्स रिटेल’नं जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत आपल्या यादीत 496 दुकानांची, तर 2019-20 आर्थिक वर्षात 1553 दुकानांची भर टाकलीय. त्यामुळं त्यांची एकूण संख्या पोहोचलीय 11 हजार 784 वर…त्याशिवाय ‘रिलायन्स’नं किराणामालाच्या दुकानांना मदत केली ती ‘जिओ मार्ट’च्या माध्यमातूनही…

‘गुगल सर्च’मध्येही किराणा दुकानांची ‘बल्ले-बल्ले’…

‘कोरोना व्हायरस’मुळं भारतीयांची ‘गुगल’कडे पाहण्याची दृष्टी आमूलाग्र बदललीय…‘गुगल’नं हल्लीच ‘वॉट इज इंडिया सर्चिंग फॉर’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार यंदा बाजी मारलीय ती ‘ग्रोसरी डिलिव्हरी’, ‘इम्युनिटी’, ‘ऑनलाईन क्लासेस्’, ‘यूपीआय ट्राँझेक्शन्स’ आणि ‘कोरोना’संबंधीचा ‘इन्शुरन्स’ यांनी…त्याखेरीज उत्कृष्ट भयपट व यंदाचे यशस्वी तेलुगु चित्रपट यांनी अनुक्रमे 950 अन् 450 टक्क्यांनी जबरदस्त उड्डाण केलंय…‘माझ्या घराजवळचं किराणामालाचं दुकान’, ‘ऑनलाईन किराणा पुरवठा’ नि ‘रेशन दुकान’ यांनी अनुक्रमे 550, 350 आणि 300 टक्क्यांची वृद्धी नोंदवून झेप घेतलीय…2020 मध्ये सर्वांनीच लक्ष केंद्रीत केलंय ते आरोग्यावर. ‘कोव्हिड-19’च्या पार्श्वभूमीवर ‘रोगप्रतिकारक शक्ती’ (इम्युनिटी) या शब्दानं अक्षरशः धुडगूस घातलाय अन् वृद्धी नेंदविलीय ती तब्बल 500 टक्क्यांची…

‘व्हिटॅमिन सी’नं 150 टक्क्यांची, तर ‘कोरोना इन्शुरन्स’नं ‘गुगल’वर चक्क 1 हजार 230 टक्क्यांच्या वाढीची नोंद केलीय. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ‘कोव्हिड-19’ हा शब्द फारसा कुणाला माहीतही नव्हता…‘क्लासेस ऑनलाईन’ व ‘टीच ऑनलाईन’ अनुक्रमे 300 नि 148 टक्क्यांनी वाढ नेंदवून धावताहेत. त्यामागचं कारण लपलंय ते ‘कोरोना’मुळं जाहीर केलेल्या सुट्टीत. शाळांनी गमावलेला वेळ भरून काढण्यासाठी ‘ऑनलाईन क्लासेस्’चं आयोजन केलंय. पालकांनी ‘मशिन लर्निंग’ अन् ‘डेटा सायन्स’सारख्या प्रगत ‘कोर्सेस’ना देखील कवेत धरलंय…‘यूपीआय पिन’मधील बदलांविषयी माहिती मिळविण्यासाठी लोकांनी 200 टक्क्यांच्या वाढीसह ‘गुगल’ला धडक दिलीय. ‘डिजिटल पेमेंट्स’चा विचार केल्यास ‘यूपीआय पिन’नं ‘आयएमपीएस’ आणि ‘एनईएफटी’वर सहज मात केलीय…

‘ई-कॉमर्स’ची स्थिती…

‘ई-कॉमर्स’ कंपन्यांनी अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या ‘ऑर्डर्स’ स्वीकारण्यासाठी ‘ऑरेंज’ नि ‘ग्रीन’ क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरविलंय…गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ‘नॉन इसेन्शल्स’ मालाची विक्री करण्यास परवानगी दिल्यानंतर सरकारनं अचानक 48 तास संपण्यापूर्वीच ‘टोपी’ फिरविण्याचं ठरविलं…आता पुन्हा गृह मंत्रालयानं हिरवा कंदील दाखविल्यानंतर येऊ घातलेल्या दिवसांत आस्थापनांना ‘ऑफलाईन’ दुकानांप्रमाणं सर्व प्रकारच्या वस्तू विकणं शक्य होईल…‘ऍमेझॉन इंडिया’नं म्हटलंय, ‘आम्ही सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतोय. ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांना भवितष्यात ‘ऑरेंज’ व ग्रीन’ क्षेत्रांमध्ये लोकांची सेवा सुरक्षितरीत्या करणं शक्य होईल. आम्हाला ‘लॉकडाऊन’मुळं जनतेला हव्या असलेल्या वस्तूंचा पुरवठा करणं जमत नव्हतं’…‘रेड झोन’मध्ये ‘ई-टेलर्स’ आस्थापनांना परवानगी दिलीय ती फक्त अत्यावश्यक मालाचा पुरवठा करण्याची. त्यात समावेश औषधांचा, स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा आणि किराणामालाचा…‘ऍमेझॉन इंडिया’च्या मते, ‘तांबडय़ा क्षेत्रा’तील लोकांना सुद्धा अन्य महत्त्वाचा माल देण्याची संधी प्रशासनानं त्यांना द्यायला हवी…भारतातील ‘ई-टेलर्स’चा विचार केल्यास किराणामाल अन् अन्य अत्यावश्यक वस्तूंची विक्री 10 टक्के…

लॉकडाऊन झाल्यानंतर ‘बिग बास्केट’सारख्या ‘ऑनलाईन ग्रोसरी रिटेलर’कडील ऑर्डर्स पाच ते सहा पटींनी वाढल्या असल्या, तरी आरंभी कर्मचारी उपलब्ध नसल्यानं त्यांची क्षमता 50 टक्क्यांवर पोहोचली होती. ‘कोव्हिड-19’च्या पूर्वी त्यांच्याकडे दिवसाला दीड लाख ऑर्डर्स यायच्या. हा आकडा ‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीच्या काळात 30 हजारांवर आला होता. मात्र आता साऱया गोष्टी जाग्यावर पडून त्यांच्याकडून रोज पूर्ती होऊ लागलीय ती तब्बल 3 लाख ऑर्डर्सची !

– संकलन : राजू प्रभू

Related Stories

इन्फोसिससह अन्य कंपन्यांच्या कामगिरीने तेजी

Patil_p

16 फर्म्सनी ‘आयपीओ’तून उभारले 31 हजार कोटी

Omkar B

टाटा कम्युनिकेशनचे फ्रान्सच्या ‘ईसिम’कडून अधिग्रहण

Omkar B

मास्टर कार्ड करणार उद्योजकांना मदत

Patil_p

लवकरच शाओमीचे एमआय नोटबुक-14 भारतात

Patil_p

मोटोरोलाचा रेजर 5 जी, 48एमपी कॅमेऱयासोबत दाखल

Patil_p
error: Content is protected !!