तरुण भारत

आंबे धुलैय ग्रामस्थांच्या नशिबी यंदाही होडीचा प्रवास

लॉकडाऊनमुळे पदपुलाचे काम रखडले : रस्त्याचीही दुरावस्था

वार्ताहर / दाभाळ

लॉकडाऊन व मजुरांच्या कमतरतेमुळे आंबे धुलैय येथील नदीवर बांधण्यात येणाऱया पदपूलाचे काम रखडल्याने पावसाळय़ात ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. पदपुलाचे काम यंदा पूर्ण होणे अवघड असल्याने पुढच्या वर्षापर्यंत प्रतिक्षा करावी लागेल, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराज पसरली आहे. यंदाच्या वर्षी मे अखेरीस या पदपुलाचे काम पूर्ण करून तो खुला करण्याचे आश्वासन स्थानिक आमदार व सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी ग्रामस्थांना दिले होते. परंतु यंदा तरी हे काम पूर्ण होईल असे दिसत नसल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखविले.

धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील आंबे धुलैय आणि धुलैय हे एकमेकाला लागून असलेली गावे मागील कित्येक वर्षे विकासापासून दुर्लक्षितच राहिली आहेत. या दोन्ही गावांना वाहतुकीच्या सुविधेबरोबरच रस्ता, नळाचे पाणी, वीज व सुलभ शौचालयासारख्या प्राथमिक गरजांचा तुटवाडा आहे. गावाबाहेर जायचे असल्यास होडीने नदी पार करावी लागते किंवा 7 कि. मी. अंतराचा खडबडीत रस्ता हा दुसरा पर्याय आहे. वाहतुकीच्या सुविधांच्या अभावामुळे गाव आरोग्य व शिक्षणाच्या सुविधापासून वंचित राहिले आहे. दैनंदिन कामानिमित्त ग्रामस्थांना गावाबाहेर जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

 दूधसागर नदीच्या काठावर वसलेल्या धुलैय आणि आंबे धुलैय या गावात जाण्यासाठी आजही नदी पार करावी लागते. त्यासाठी होडी हा सोपा पण तेवढाच धोक्याचा मार्ग आहे. पलिकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या निरंकाल व दाभाळ गावात जाण्यासाठी ग्रामस्थांना होडीतून जावे लागते. नोकरी व्यावसाय, बाजारहाट  किंवा मुलांना शिक्षणांसाठी दरदिवशी गावाबाहेर पडावे लागते. पावसाळय़ात दाभाळ व निरंकालपासून या गावाचा संपर्क तुटतो. नदी पार करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय म्हणून अंदाजे 6 ते 7 कि. मी. अंतर पार करीत दाभाळ किंवा निरंकाल गाव गाठावे लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होतो. होडीचा मार्ग अवघ्या पाच मिनिटांचा पण पावसाळय़ात तेवढाच धोक्यादायक. रस्त्याने पायी चालत जायचे झाल्यास दीड ते दोन तास पायपिट करावी लागते. दोन्ही गावांमध्ये मिळून साधारण दोनशेच्या आसपास लोकवस्ती आहे. पण वाहतुकीच्या सुविधीअभावी शिक्षण वा नोकरी व्यवसायासाठी कित्येक कुटुंबे हळूहळू स्थलांतर करीत आहेत. त्यात युवावर्ग जास्त ओह.

पदपूल झाल्यानंतर विकास मार्ग खुला होण्याची आशा

मागील दोन वर्षांपासून येथील नदीवर बंधारा वजा पदपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पदपूल म्हणजे गावातील अनेक वर्षाच्या मुख्य समस्येवर मार्ग ठरणार आहे. तो पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची लांबचा प्रवास व होडीने धोकादायक नदी पार करण्यावाचून सुटका होईल. यंदाच्या वर्षी या पदपुलाचे काम पूर्ण होऊन तो खुला होईल असा अंदाज येथील लोकांनी बांधला होता. परंतु देशव्यापी लॉकडाऊनमुळे हे काम रखडले व मजूर उपलब्ध होत नसल्याने आता ते बंदच आहे. डिसेंबर नंतर कंत्राटदाराने पदपुलाच्या कामाला गती दिली होती. कामाची गती बघितल्यास मे पर्यंत काम पूर्ण होण्याचे संकेत मिळत होते. मात्र लॉकडाऊनमुळे खोळंबा झाला. सध्या या बंधारा वजा पदपुलाच्या खालच्या बंधाऱयाचा भाग पूर्ण झाला असून पदपूलाच्या उंचीपर्यंत सर्व खांब पूर्ण झाले आहेत. थोडेफार काम राहिले आहे.

लांबचा रस्ता पण, तोही खड्डेमय

6-7 वर्षांपूर्वी या गावाकडे जाणाऱया रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. सध्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. डांबर व खडी उखडल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर हॉटमिक्स पद्धतीने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असे त्यावेळी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले होते व एप्रिल दरम्यान रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे ते त्यावेळी म्हणाले होते. परंतु अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याची झालेली वाताहत व खड्डय़ांमुळे पावसाळय़ात जास्तच हाल होणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

होडी वाहून गेल्याने समस्येत भर

गावात जाणारा रस्ता सोडल्यास शॉर्टकट मार्ग म्हणजे छोटय़ा होडीतून नदी ओलांडणे. दाभाळकडे जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत जवळचा. परंतु गेल्या वर्षी आलेल्या पुरात होडी वाहून गेल्याने दुसरी होडी उपलब्ध नाही. गेल्यावर्षीच या होडीची दुर्दशा झाली होती. पाण्यात घालण्याच्या परिस्थितीत नव्हती तरीही येथील नागरिकांनी तिची तात्पुरती डागडुजी करून यंदाच्या वर्षी पदपुलाची सोय होईल म्हणून वापरली. ही एकमेव होडी पुरात वाहून गेल्याने पावसाचे दोन महिने येथील नागरिकांनी लांब पल्ल्याचा रस्ता वापर करून कसेबसे दिवस काढले. आता यंदाच्या पावसाळय़ात होडी अभावी मोठी गैरसोय होणार आहे.

गावात ये-जा करण्यासाठी प्रवासी बस नसल्याने नागरिकांना आपले खासगी वाहन किंवा भाडय़ाच्या वाहनाने दैनंदिन कामासाठी प्रवास करावा लागतो. ज्या लोकांकडे स्वतःचे वाहन नाही, त्यांना पायपिट चुकलेली नाही. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अधिक अडचणिंना तोंड द्यावे लागते. त्यासाठी बस वाहतुकीची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली ओह. पदपूल व रस्त्याच्या डांबरीकरणाविषयी स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांना विचारले असता, लॉकडाऊन व मजूर उपलब्ध होत नसल्याने काम रखडल्याचे त्यांनी सांगितले. तरीही हे काम पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न असतील. ग्रामस्थांची प्रवासी बस वाहतुकीची मागणी पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री पाऊसकर म्हणाले

Related Stories

काजार, वाढदिवस, स्थानिकासाठी निर्बंध घालून मद्यालये खुली करा

Omkar B

म्हादई सरंक्षणासाठी आम्ही सर्व प्रयत्न करु

Patil_p

माजीमंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन

Omkar B

जुने गोवेतील कचरा प्रकल्प होऊ देणार नाही

Patil_p

सांतआंद्रेत मरीना प्रकल्प आणू देणार नाही

Patil_p

झवेरीच्या रेव्ह पार्टी सहभागाची न्यायालयीन चौकशी करावी

Omkar B
error: Content is protected !!