तरुण भारत

कोरोनाचे वाढते संकट कसे रोखणार?

येणाऱयांचा दबाव, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वेळीच थांबणे आवश्यक : रत्नागिरीतील प्रशासनाची हतबलता काय सांगते?

संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

 चाकरमान्यांना कोकणात आणण्याचा निर्णय झाला नसला, तरी प्रशासनावर दबाव आणत अनेक चाकरमानी कोकणात येऊ लागले आहेत. रत्नागिरी जिल्हय़ाला तर याचा मोठा फटका बसला असून कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने तेथील जिल्हाधिकाऱयांनी हतबलता व्यक्त केली आहे. चाकरमान्यांचा ओघ वाढतच राहिल्यास सिंधुदुर्गातही हीच स्थिती येऊ शकते. यासाठी दबावतंत्रावर नियंत्रण आणून लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेपही थांबणे आवश्यक बनले आहे.

 कोरोनाचा शिरकाव देशात झाल्यानंतर कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात केंद्र राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीची कडक अंमालबजावणी केली गेली. त्यामुळे दोन्ही जिल्हय़ांत स्थिती नियंत्रणात होती. मुंबई शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी चाकरमान्यांना जिल्हय़ात आणण्यास स्पष्ट नकार दिला होता. चाकरमानी आल्यास कोकणातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. येथे आवश्यक सुविधा नाहीत. व्हेंटीलेटरची कमतरता, आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळाची कमतरता यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण होईल, याची कल्पना दिली होती. असे असतानाही एप्रिल अखेरपर्यंत नियंत्रणात असणारी स्थिती आता बिघडली आहे.

चाकरमान्यांच्या वाढत्या ओघामुळे गेल्या पंधरा दिवसांत कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढली आहे. रत्नागिरी जिल्हय़ातही मोठय़ा प्रमाणात चाकरमानी आल्याने रुग्णांची संख्याही वाढली आहे. मंगळवारी दुपारी हा आकडा 52 होता. 28 एप्रिलपर्यंत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ात स्थिती नियंत्रणात होती. 29 एप्रिलनंतर मात्र कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आणि रत्नागिरी जिल्हा ऑरेंज झोनमधून रेडझोनमध्ये गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. चाकरमान्यांचा लोंढा वाढल्यास सिंधुदुर्ग जिल्हय़ातही स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे चाकरमान्यांना आणण्यासाठी चाललेले दबावतंत्र, राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबला पाहिजे. कोरोनाच्या हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई व पुण्यातून चाकरमान्यांचा ओघ सुरु झाला आहे. मात्र जिल्हय़ात दाखल होत असलेल्या या चाकरमान्यांची तपासणी व अन्य नियोजन करताना प्रशासन मेटाकुटीस आले आहे. रत्नागिरी जिल्हय़ाची परिस्थिती पाहिली, तर संस्थात्मक विलगीकरण कक्ष फुल्ल झाले आहेत. त्यामुळे केवळ हातावर शिक्का मारून चाकरमान्यांना घरी पाठवले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेले चाकरमानी सुरुवातीला रस्त्याने, जंगलातून, रेल्वेमार्ग करीत येत होते. यामध्ये पोलिसांच्या कचाटय़ात सापडलेल्यांचे विलगीकरण केले जात होते. मात्र आता अधिकृत ऑनलाईन पास घेऊन चाकरमानी खासगी वाहनांनी दाखल होत आहेत.

 केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार परराज्यातील कामगार, विद्यार्थी, यात्रेकरुना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची परवानगी दिली किंवा काही लोक कामानिमित्त इतर जिल्हय़ात जाऊन अडकले आहेत. आजारी रुग्णाला मूळ गावी न्यायचे आहे, वैद्यकिय तपासण्या करायच्या आहेत, अशा लोकांना ई-पास देण्यास सुरुवात केली, हे सर्व ठिक आहे. परंतु, हेच ई-पास मिळवण्यासाठी दबावतंत्राचा वापर होताना दिसून येत आहे. ई-पास मिळवण्यासाठी वेगवेगळी करणे पुढे केली जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पास नाकारले गेले, तर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. विशेषत: राजकारण्यांकडून हस्तक्षेप होताना दिसत आहे. प्रशासनाचाही काहीवेळा नाईलाज होत आहे. गावातील शाळांमध्ये विलगीकरण कक्ष केल्याने येणाऱया चाकरमानी व ग्रामस्थ यांच्यात वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातही हळूहळू कोरोना नियंत्रणाची स्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी भीती आहे.

क्वारंटाईनमुळे वादाचे प्रसंग

सिंधुदुर्ग जिल्हय़ात सद्यस्थितीत 946 जणांना होम क्वारंटाईन व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हय़ाबाहेरून मुंबई व पुणे येथून आलेल्या या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांतच जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांची संख्या वाढली आहे आणि दररोज शेकडो लोक मुंबईतून येत आहेत. त्याशिवाय सिंधुदुर्गात येण्यास इच्छूक असणाऱया जिल्हय़ाबाहेरील 19 हजार व्यक्तींनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्यांमधून पाच हजार जरी लोक आले, तरी जिल्हय़ाची यंत्रणा कोलमडू शकते. सद्यस्थितीत 946 लोकांना क्वारंटाईन केल्यानंतरही वादाचे प्रसंग घडत आहेत. पुरेशा सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे 19 हजार व्यक्ती जिल्हय़ात आल्यास रत्नागिरी जिल्हय़ाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन हतबल ठरू शकते.

Related Stories

लॉकडाऊनचा फटका गणेश मूर्तीकारांनाही

NIKHIL_N

देवाक काळजी रे ।। माझ्या देवाक..!

NIKHIL_N

तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब

NIKHIL_N

अनोख्या बांबू पेनची यशस्वी निर्मिती

NIKHIL_N

विविध मागण्यांसाठी आशा आणि गट प्रवर्तकांचा एल्गार

Patil_p

रामचंद्र (बाळा ) देसाई यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

NIKHIL_N
error: Content is protected !!