तरुण भारत

लष्करातील खर्चात 20 टक्के कपात

केंद्र सरकारचे निर्देश : ‘टूर ऑफ डय़ुटी’द्वारे तरुणांना देशसेवेची संधी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

कोरोनाच्या संसर्गामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर ताण पडलेला आहे. भारतातही भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अशा कठीण प्रसंगात केंद्र सरकारने लष्करातील खर्चात 20 टक्केपर्यंत कपात करण्याची सूचना केलेली आहे. त्यानुसार काम सुरू करण्यात आलेले असून खर्चकपातीचा आढावा घेतला जात आहे. काही दुय्यम खर्च टाळण्यात येणार असून नवीन उपक्रम चालवण्याचीही सैन्यदलाची मानसिकता आहे. त्यादृष्टीने ‘टूर ऑफ डय़ुटी’ या संकल्पनेच्या माध्यमातून नवतरुणांना देशसेवेची संधी देण्याचा विचार सुरू आहे. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येईल, असे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

मनोहर पर्रिकर इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड ऍनालिसीसच्या ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलताना लष्करप्रमुख नरवणे यांनी लष्करातील बदलती परिस्थिती, आव्हाने आणि नेमके स्वरुप याबाबत भाष्य केले. कोरोना संसर्गानंतर देशाची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे सर्व खात्यांच्या खर्चावर मर्यादा आलेल्या आहेत. साहजिकच लष्करालाही काही आव्हानात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. मात्र, देशाची सुरक्षा आणि सैन्यदलाची ताकद अबाधित ठेवून भविष्यातील परिस्थितीशी लढण्याची लष्कराची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘टूर ऑफ डय़ुटी’चा पर्याय

सद्यस्थितीत ‘टूर ऑफ डय़ुटी’ अर्थात टीओडीच्या पर्यायावर गंभीरपणे विचार सुरू आहे. या उपक्रमाद्वारे देशसेवा करू इच्छिणाऱया तरुणांना तीन वर्षांसाठी लष्करात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. त्यानुसार शाळा-महाविद्यालयांकडून पाठपुरावा आवश्यक असून कौशल्ययुक्त युवकांना नव्या संधी मिळू शकतील. यामुळे लष्कराची ताकदही वाढेल आणि पेन्शन आणि अन्य सुविधांवरील खर्चही कमी होईल, असा दावा जनरल नरवणे यांनी केला.

चीन-नेपाळसोबतच्या तणावावर तोडगा

दरम्यान, सीमारेषेवरून नेपाळशी कोणताही वाद नसून अन्य देशांच्या चिथावणीवरून काहीवेळा वादाचे प्रसंग पुढे येत असल्याचे नरवणे यांनी चीनचा नामोल्लेख टाळत स्पष्ट केले. तसेच लडाख आणि उत्तर सिक्कीममध्ये चीनशी सीमावादावरून झालेला तणाव स्थानिक पातळीवरच मिटविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दोन शक्तिशाली देश आमने-सामने आल्यानंतर खटके उडू शकतात. मात्र, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सैन्यदल आणि सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचे ते पुढे म्हणाले.

Related Stories

विरोधकांकडून दिशाभूल : सीतारामन

Patil_p

प्रशांत किशोर बनले पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार

datta jadhav

उत्तराखंडात 305 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

देशात 1,00,636 नवे बाधित

datta jadhav

खाणीत अडकलेले कामगार 65 तासांनंतर बाहेर

Patil_p

मोस्ट वॉन्टेड वालिदसह तीन दहशतवादी ठार

Patil_p
error: Content is protected !!