तरुण भारत

कोरोनाबाधितांची संख्या 12 वर

प्रतिनिधी/ पणजी, मडगाव

गोव्यातही आता कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. शनिवारी आणखी 4 बाधित सापडल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या 12 झाली आहे. गुरुवारी एकाच दिवशी 8 रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने आता गोव्यातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून चेक पोस्टवरील तपासणीबाबत संशय व्यक्त होऊ लागला आहे.

Advertisements

गुरुवारी एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर त्यांना गोव्यात घेऊन आलेल्या वाहन चालकालाही बाधा झाल्याचे चाचणीच आढळून आले होते. त्यानंतर फोंडा येथे गुजरातहून भंगार घेऊन आलेला ट्रकचालक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मुंबईहून गोव्यात आलेल्या एका खलाशाला कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे गुरुवारी कोरोनाबाधीतांची संख्या 8 झाली होती.

काल शनिवारी एकदम 4 रुग्ण सापडले. त्यामुळे आता गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12 झाली आहे. वास्को येथील तिघे बार्ज पोहोचविण्यासाठी कोलकाता येथे गेले होते. तेथून परत गोव्यात आल्यानंतर ट्रुनेट टेस्टिंग वेळी तिघांपैकी दोघे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना मडगाव येथील कोविड इस्पितळात दाखल केले आहे. एकूण सात लोक कोलकाता येथे गेले होते. त्यामुळे उर्वरितांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या संशयितांची दोन दिवसानंतर पुन्हा चाचणी केली जाणार आहे.

कुंडई येथे आलेला ट्रक क्लीनर कोरोना पॉझिटिव्ह

हरिद्वार येथून फार्मा साहित्य घेऊन कुंडई येथे आलेला एक ट्रक क्लीनर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तो 28 वर्षीय असून मूळ आग्रा येथील आहे. 14 रोजी पत्रादेवी चेक पोस्टवरून हा ट्रक आला. क्लीनरला ताप असल्याने त्याला फोंडा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. त्याची कोरोना चाचणी करताच तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आणखी एक 43 वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. हा इसम काल शनिवारी पहाटे पणजी बस स्थानकावर आला. येथे तो सप्लायरला भेटला. ताप आणि खोकला असल्याने तो गोमेकॉत दाखल झाला. तेथे चाचणीअंती तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तो सावंतवाडी येथून गोव्यात आला असून तो मूळ सांगली येथील आहे.

लोकांमध्ये भीतीचे वातावरण

गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता चेक पोस्टवरील तपासणीबाबतही संशय व्यक्त होऊ लागला आहे. हीच स्थिती राहिल्यास गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उद्योग साहित्य आणि कडधान्य तसेच अन्य साहित्य घेऊन गोव्यात येणारे कोरोनाचे वाहक आल्यास गोव्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन शिथिलतेमुळे लोक मोठय़ा प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.

इंपोर्टेड वाहक गोव्यासाठी घातक

गोव्याबाहेरून येणारे कोरोनाबाधित हे ’इंपोर्टेड’ असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पण हेच इंपोर्टेड कोरोना वाहक गोमंतकीयांच्या संपर्कात येत आहेत. औद्योगिक क्षेत्रात तसेच बसस्थानक, लोकवस्तीच्या ठिकाणी, मार्केट परिसरात संपर्कात आले तर काय स्थिती होईल याबाबत विचार होण्याची गरज आहे. सध्या गोवा ऑरेंज झोनमध्ये आहे. ही स्थिती कायम राहिल्यास गोवा रेड झोनमध्ये यायला वेळ लागणार नाही.

Related Stories

कदंब कंत्राटी कामगारांचा आंदोलन सुरुच

Patil_p

पणजी शहरातील पे पार्किंगसाठी नऊ जागा अधिसूचित

GAURESH SATTARKAR

उत्तर प्रदेश – गोव्यामधील व्यापार संबंध दृढ होणार

Patil_p

मोपा विमानतळ पिडीत भूमिपुत्र परत क्रांती करतील

Patil_p

मडगावातील दोन्ही बाजारपेठांची नगराध्यक्षांकडून पाहणी

Omkar B

केपेतून भाजपचे बाबू कवळेकर, आरजीचे विशाल देसाई यांचे अर्ज

Patil_p
error: Content is protected !!