तरुण भारत

थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी

जगभरात कोरोनाचा 47,39,567 जणांना संसर्ग : 3,13,636 जणांचा विषाणूमुळे मृत्यू : युरोपमध्ये स्थितीत सुधारणा

जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 47 लाख 39 हजार 567 जणांना झाली आहे. तर 18 लाख 23 हजार 902 जण या संसर्गातून सहिसलामत बाहेर पडल्याने जगाला दिलासा मिळाला आहे. महामारीदरम्यान थायलंडने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 30 जूनपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी राज्य किंवा सैन्य विमान, तातडीचे लँडिंग, टेक्निकल लँडिंग, मानवी मदत, वैद्यकीय तसेच दिलासाजन्य उड्डाणांवर लागू होणार नाही. थायलंडमध्ये आतापर्यंत 3 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.

Advertisements

भारतीय परतणार

इस्रायलमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत 25 मे रोजी एअर इंडियाचे विमान त्यांना आणण्यासाठी पाठविले जाणार आहे. भारत सरकार 7 मेपासून या मोहिमेच्या अंतर्गत विविध देशांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढत आहे. पहिल्या टप्प्यात ब्रिटन, अमेरिका, बांगलादेश यासारख्या देशांमधून 6,527 नागरिकांना परत आणले गेल आहे.

अमेरिका : 1,237 बळी

अमेरिकेत मागील 24 तासांत 1,237 जणांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. तेथील मृतांचा आकडा आता 90,113 झाला आहे. तर देशातील एकूण रुग्णसंख्या 15,07,798 झाली आहे. न्यूयॉर्क प्रांतात दिवसभरात 157 लोकांना जीव गमवावा लागला आहे. मागील 6 दिवसांपासून तेथील बळींचा आकडा 200 पेक्षा कमी राहिला आहे. प्रांतात आतापर्यंत 28 हजार जणांचा बळी गेला आहे.

पाक : 40,151 रुग्ण

पाकिस्तानात कोरोना बाधितांची संख्या आता 40 हजार 151 झाली आहे. देशात आतापर्यंत 873 जणांना जीव गमवावा लागला आहे. सिंध प्रांतात सर्वाधिक संकट निर्माण झाले असून तेथे 15,590 रुग्ण सापडले आहेत. पंजाब प्रांताचीही स्थिती गंभीर असून तेथे 14,584 बाधित आढळले आहेत. टाळेबंदीचे पालन होत नसल्याने तेथील स्थिती गंभीर होत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 112 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

चीनमध्ये 5 नवे रुग्ण

चीनमध्ये 24 तासांत 5 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 8 जणांनी कोरोनावर मात केली आहे. चीनमध्ये मागील एक आठवडय़ापासून कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर 5 नव्या रुग्णांमध्ये विदेशातून आलेल्या 2 नागरिकांचा समावेश आहे. चीनमध्ये विदेशातून आलेल्या एकूण 1,700 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमधील बाधितांचा आकडा आता 82,947 झाला असून 4,633 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनवर आगपाखड

चीनचे लोकसंख्या अमेरिकेपेक्षा अधिक असूनही तो देश डब्ल्यूएचओ, संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक व्यापार संघटनेला अल्प निधी का देतो असा सवाल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत विचारला आहे. चीनला अमेरिका किंवा इतर देशांच्या तुलनेत अधिक सवलती दिल्या जातात. चीनमधून फैलावलेल्या या महामारीपूर्वी अमेरिकेची अर्थव्यवस्था सर्वांपेक्षा आघाडीवर होती. आम्ही कुठल्याही देशाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत होतो. पुन्हा एकदा आणि लवकरच आम्ही त्याच स्थानी असू असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.

ब्रिटनमध्ये 19 जण अटकेत

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये लोकांनी टाळेबंदीच्या विरोधात शनिवारी निदर्शने केली आहेत. तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचेही उल्लंघन केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी 19 जणांना अटक केली आहे. टाळेबंदीच्या विरोधातील निदर्शनांदरम्यान लोकांचा एक गट परस्परांच्या अत्यंत नजीक आला होता. यातून संसर्गाचा धोका वाढू शकत असल्याने 10 जणांवर दंड ठोठावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ब्रिटनमध्ये 13 मेपासून टाळेबंदीचे नियम शिथिल करत लोकांना उद्यानात जाण्याची अनुमती देण्यात आली आहे.

20 कर्करोगग्रस्तांची कोरोनावर मात

कर्करोगाला सर्वात घातक आजारांपैकी एक मानले जात आहे. कोरोना विषाणूची बाधा कर्करोगग्रस्ताला झाल्यास तो निश्चितपणे अधिकच जीवघेणा ठरतो. परंतु चेन्नईच्या राजीव गांधी शासकीय रुग्णालयात 20 कर्करोगग्रस्तांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. तर 7 कर्करोगग्रस्तांवर कोरोनासंबंधी उपचार सुरू आहेत. दोन कर्करोगग्रस्तांचा या संसर्गादरम्यान मृत्यू ओढवला आहे.

कोरोना विषाणूने बाधित सुदृढ व्यक्तीवर उपचार करणे मोठे आव्हान नाही, परंतु एखादा व्यक्ती पूर्वीपासून गंभीर आजाराने पीडित असल्यास आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर उपचार करणे अधिकच आव्हानात्मक ठरत असल्याचे उद्गार रुग्णालयाच्या डीन जयंती रंगराजन यांनी काढले आहेत. 

कर्करोगग्रस्तांची रोगप्रतिकारकक्षमता कमी असल्याने कोरोनाचा धोका अधिक असतो. कर्करोगग्रस्तांसाठी विशेष आहार तयार करण्यात आला, यात कॅलरी आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक होते. तोंड किंवा गळय़ाच्या कर्करोगाने पीडित लोकांसाठी वेगळय़ा प्रकारचे भोजन तयार करण्यात आले. सर्वात कमी वयाचा कर्करोगग्रस्त 13 वर्षांची मुलगी होती. तर सर्वाधिक वृद्ध रुग्ण 73 वर्षीय पुरुष होता अशी माहिती रंगराजन यांनी दिली आहे.

मोकळय़ा जागेत जंतूनाशक फवारणी घातक

विषाणू नष्ट होण्याची शक्यता अल्प : लोकांच्या प्रकृतीसाठी धोकादायक

मोकळय़ा जागेत जंतूनाशक (डिसइन्फेक्टेंट) फवारल्याने कोरोना विषाणू मरत नाही, उलटपक्षी असे करणे लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. गल्ली तसेच बाजारपेठांमध्ये डिसइन्फेक्टेंट फवारणी किंवा फ्यूमिगेशनने लाभ होत नाही, कारण धूळ आणि घाणीमुळे तो निष्क्रीय होतो. केमिकल स्प्रेमुळे सर्व पृष्ठभागावर फवारणी होईलच असे नाही तसेच विषाणू नष्ट होण्यासाठी आवश्यक कालावधीपर्यंत त्याचा प्रभाव राहत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.

कुठल्याही व्यक्तीवर डिसइन्फेक्टेंटची फवारणी होऊ नये. या फवारणीमुळे शारीरिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते. क्लोरिन आणि अन्य विषारी रसायनांमुळे लोकांना डोळे आणि त्वचेशी संबंधित विकार होऊ शकतात. श्वसनात अडथळा तसेच पोट-आतडय़ांशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. 

डिसइन्फेक्टेंटयुक्त कापडाने स्वच्छता

बंदिस्त भागातही फवारणी आणि फ्यूमिगेशन थेट स्वरुपात केले जाऊ नये. तर डिसइन्फेक्टेंटमध्ये कापड भिजवून त्याद्वारे स्वच्छता केली जावी. विषाणू कुठल्या भागावर किती काळ जगतो याबद्दल अचूक माहिती प्राप्त झालेली नाही.

8 लसींवर काम सुरू

चालू वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस तयार करू असे  ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर पेले आहे. मार्चपर्यंत लस येऊ शकते अशी माहिती चीनचे आरोग्य अधिकारी झांग वेनहॉन्ग यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात कोरोनाच्या 8 लसींची क्लीनिकल ट्रायल सुरू आहे.

आयुर्वेदिक औषधांची निर्यात वाढली

कोरोना संकटामुळढे विदेशात आयुर्वेदिक औषधांची मागणी वाढली आहे. अमेरिका आणि युरोपसह आशियाच्या अनेक देशांमध्ये भारताच्या वनौषधींच्या निर्यातीला मोठा वेग आला आहे. कोरोना महामारीमुळे वार्षिक निर्यात दुप्पट होण्याचा अनुमान आहे. याचबरोबर जगाचा चीनवरील डळमळीत होणाऱया विश्वासानेही यात मोठी भूमिका बजावली आहे. .

यापूर्वी चीनच्या औषधांची विदेशात मागणी होती, परंतु त्यातील मोठा हिस्सा भारताला मिळण्याची चिन्हे आहेत. जागतिक तज्ञ रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचा सल्ला देत असल्याने वनौषधींची बाजारपेठ वाढू लागली आहे. युरोपच्या स्टोअर मार्केट अँड रिसर्चने भारताच्या वनौषधींच्या निर्यातदारांची ओळख पटविली आहे. वनौषधींवर प्रक्रिया करणाऱया उद्योगांनुसार 10 औषधांची सर्वाधिक निर्यात होत आहे. यात गिलोय आणि तुळशीची सर्वाधिक मागणी आहे.

अश्वगंधा, आवळा, गोखरू, कालमघे, हळद, पपईच्या बिया, नोनीच्या मागणीत वाढ झाली आहे. कालमेघ याआधीच इन्फ्लुएंजावर प्रभावशाली असल्याचे मानले गेले आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारात अश्वगंधा समवेत चार आयुर्वेदिक औषधे आणि आयुष-64 नावाच्या अन्य एका औषधाच्या वापराला मंजुरी दिली आहे.

Related Stories

इस्रायलमध्ये लसीचा तिसरा डोस मंजूर

Amit Kulkarni

पत्नीकरता तयार केले गोल फिरणारे घर

Patil_p

‘वाढत्या’ जीभेची समस्या

Patil_p

युरोपात नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

datta jadhav

ब्राझीलमध्ये 27 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

अफगाण नागरिकांचे पलायन सुरूच

Patil_p
error: Content is protected !!