तरुण भारत

कणकवली तहसीलदारांकडून माणुसकीचे दर्शन

नरडवे प्रकल्पाचा ठेकेदार अन् पाटबंधारे विभागाकडून कामगार बेदखल : कामगारांच्या तात्पुरत्या निवास, भोजनाची तहसीलदारांकडून व्यवस्था : उपासमार होऊ लागल्याने गावी निघाले होते कामगार

प्रतिनिधी / कणकवली:

Advertisements

लॉकडाऊनमुळे नरडवे धरणाचे काम बंद आहे. त्यात प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून संपर्क बंद झाला. नरडवे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तीन ते चारवेळा मोफत जीवनावश्यक साहित्य दिल्याने प्रकल्पावर काम करणाऱया कामगारांना थोडाफार आधार मिळाला. मात्र, पावसाळा तोंडावर आला, त्यातच उपासमारी होऊ लागल्याने पुणे व लातूर जिल्हय़ातील हे कामगार पायी गावी निघाले होते. करुळ व दाजीपूरच्या चेकपोस्टवरून त्यांना येथील तहसील कार्यालयात आणण्यात आले. तहसीलदार आर. जे. पवार यांनी या कामगारांच्या तात्पुरत्या निवाऱयाची व जेवणाची व्यवस्था केली. प्रकल्पाचा ठेकेदार व पाटबंधारे विभागाकडून बेदखल झालेल्या या कामगारांसाठी तहसीलदारांनी आधार देत माणूसकीचे दर्शन घडविले.

लॉकडाऊनमुळे परप्रांतीय व परजिल्हय़ातील कामगारांना सर्वाधिक फटका बसला. नरडवे धरण प्रकल्पाच्या कामासाठी ठेकेदाराने पुणे जिल्हय़ातील शिरुर, चाकण व लातूर येथील कामगारांना कामासाठी आणले होते. धरण प्रकल्पामध्ये झोपडय़ा बांधून हे कामगार काम करत होते. दोन्ही जिल्हय़ातील मिळून सुमारे 37 महिला, पुरुष व लहान मुले नरडवे धरण प्रकल्पस्थळी राहत होती. लॉकडाऊननंतर काही दिवस काम झाले, त्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण बंद करण्यात आल्याने या कामगार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला.

गावी जाणाऱया कामगारांना परतविले होते

दोन दिवसांपूर्वी नरडवे परिसरात वादळी वाऱयासह पाऊस झाला. त्यात कामगार कुटुंबांच्या झोपडय़ाही उद्धवस्त झाल्या. पावसात भिजतच या कुटुंबांनी रात्र काढली. पावसाळा तोंडावर आल्याने येथे राहण्यापेक्षा गावी गेलेले बरे या विचारातून दोन दिवसांपूर्वी हे कामगार कुटुंबिय चालत निघाले होते. लातूरकडे जाणारे कामगार फोंडाघाटातून दाजीपूरला पोहोचले, तर पुणे जिल्हय़ात जाणारे कामगार पाचलच्या दिशेने निघाले होते.

जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा

चेकपोस्टवर अडविल्यानंतर या कामगारांची माहिती तहसील कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार आर. जे. पवार यांनी दोन मिनिबस पाठवून त्या कामगारांना कणकवली येथे आणले. गावी जाण्याची व्यवस्था करेपर्यंत नगरपंचायतीच्या मुडेश्वर मैदानाजवळील पर्यटन सुविधा केंद्रात व्यवस्था करण्यात आली. इमारतीची तातडीने साफसफाई करून तेथे कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व कुटुंबांना पुढील काही दिवसांसाठी पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य तसेच मुलांना खाऊ वितरित करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षच

नरडवे प्रकल्पाच्या ठेकेदारासोबतच मध्यम पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. खरेतर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या आपल्या प्रकल्पातील कामगारांची व्यवस्था करणे, त्यांची माहिती महसूल यंत्रणेला देणे, कामगारांना जीवनावश्यक साहित्य देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची होती. मात्र, अशी कोणतीही सुविधा या विभागाकडून उपलब्ध न झाल्याचे कामगारांनी सांगितले.

Related Stories

हरहर विठ्ठल, घरघर विठ्ठल..

Patil_p

चौकुळला जखमी सांबराची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका

NIKHIL_N

उद्यापर्यंत गडगडाटासह पाऊस

NIKHIL_N

खेडमध्ये परिचारिकेसह ६ जणांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

मुंबईतील शिवशंभू ग्रुपतर्फे पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Ganeshprasad Gogate

सिंधुदुर्गात दहा हजार कोरोना चाचण्या

NIKHIL_N
error: Content is protected !!