तरुण भारत

भाजयुमो उपाध्यक्ष पंकज ना. गावकर यांच्यावर प्राणघातक हल्ला

चावडी – काणकोण येथे घडलेली घटना, पुतणाही जखमी, मडगावच्या हॉस्पिसियोत दाखल, दोन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद

प्रतिनिधी / काणकोण

Advertisements

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष असलेले भगतवाडा-काणकोण येथील पंकज ना. गावकर आणि त्यांचा पुतणे साईराज ना. गावकर या दोघांवर 17 रोजी संध्याकाळी 7 वा. चावडीवरील गोवा बागायतदार भवननजीकच्या रस्त्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार घडला असून सध्या पंकज ना. गावकर आणि त्यांचा पुतणा मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचार घेत आहेत. या प्रकरणी संशयित म्हणून संदेश तेलेकर आणि आनंदू तेलेकर या दोघांविरुद्ध काणकोणच्या पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज ना. गावकर यांचा रूबी रेसिडेन्सीमध्ये स्वतःचा फ्लॅट असून आपल्या पुतण्यासहित रूबी रेसिडेन्सीच्या जवळून आपल्या कारने येत असताना बागायतदार भवनच्या बाजूला त्यांना आपले काही नातेवाईक दिसले. त्यांना बोलाविण्यासाठी त्यांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजविला. त्याचवेळी संशयित संदेश तेलेकर आणि अन्य व्यक्ती या तेलेकर यांच्या घरासमोर खेळत होत्या. गावकर यांच्या गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने संशयित व्यक्ती रस्त्यावर धावून आली आणि शिव्या द्यायला लागली. हॉर्नचा आपल्याला त्रास झाला असे सांगून संशयिताने पंकज ना. गावकर यांच्या छाती, पोटावर गुस्से लगावले तसेच त्यांच्या वाहनाची मोडतोड केली. एवढेच नव्हे, तर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार आहे.

धावून आलेल्या कुत्र्यांनी चावे घेतले

या आवाजाने शेजारच्या घरातून पाळीव कुत्रे आले आणि पंकज ना. गावकर, साईराज ना. गावकर आणि अन्य एक व्यक्ती दीपक धोत्रेकर यांचा चावा घेतला. तिघांनाही जखमी अवस्थेत काणकोणच्या आरोग्य केंद्रात प्रथम दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर धोत्रेकर यांना घरी जाऊ दिले गेले. मात्र पंकज ना. गावकर आणि त्यांच्या पुतण्याला मडगावच्या हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असावा अशी चर्चा सध्या या ठिकाणी ऐकायला मिळत आहे.

प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत

दरम्यान, काणकोणच्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि संदेश तेलेकर यांच्या समर्थकांनी हे प्रकरण प्रतिष्ठेचे केले असून गृहमंत्रिपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचविण्यात आले आहे. काणकोणच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दोन-तीन वेळा संदेश तेलेकर यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तेलेकर उपलब्ध झाले नाहीत, अशी माहिती काणकोण पोलिसांनी दिली.

गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही ः इजिदोर

याबाबतीत काणकोणचे आमदार असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला असता आपण या प्रकाराची चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले. गुंडगिरी कुठल्याच परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसून गुंडगिरी करणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांत कारवाई न झाल्यास पुढील निर्णय : नाईक

काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या हल्ल्याचा आपण निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. सध्या कोविड-19 च्या परिस्थितीचा सामना करण्यात काणकोणचे पोलीस गुंतलेले आहेत. मात्र दोन दिवसांत जर संशयितांविरुद्ध कारवाई झाली नाही, तर काणकोण भाजप मंडळ पुढील निर्णय घेईल, असा इशारा नाईक यांनी दिला.

गंभीर बाब : भगत

पक्षाचे प्रदेश सचिव असलेल्या सर्वानंद भगत यांच्याशी संपर्क साधला असता, ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणी संपूर्ण चौकशी करण्याची जबाबदारी पक्षाचे आमदार असलेले उपसभापती फर्नांडिस यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील एक संशयित संदेश तेलेकर हे आम आदमी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असून मागच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आहेत. या प्रकरणी काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज देविदास पुढील तपास करत आहेत.

Related Stories

हडफडे-नागोवा सरपंचपदी श्रीकृष्ण नागवेकर

Amit Kulkarni

आज शिक्क्यातून व्यक्त होणार मतदारराजा

Patil_p

राज्यात उद्यापासून पंधरा दिवस संचारबंदी

Amit Kulkarni

केपे, तिळामळ, जांबावली परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम

Omkar B

कुटबण जेटीवरील व्यवहार ठप्प

Amit Kulkarni

भात वारवणी, शेंगा मळणी, हळद पाँलिश यंत्राची ब्रह्मकरमळीत निर्मिती

Amit Kulkarni
error: Content is protected !!