तरुण भारत

जानकीनिमित्तें सुरकैवारा

श्रीकृष्णाच्या चरणी विनम्र होऊन जांबवंत म्हणाला-हे प्रभो! मी आता जाणले की, आपणच सर्व प्राण्यांचे स्वामी, रक्षणकर्ते, पुराणपुरुष भगवान विष्णू आहात. आपणच सर्वांचे प्राण, इंद्रियबल, मनोबल आणि शरीरबल आहात. विश्वाची उत्पत्ती करणाऱयांचीही उत्पत्ती करणारे आपणच विराजमान आहात. काळाचे जितके म्हणून अवयव आहेत, त्या सर्वांचे नियमन करणारे काळ आपणच आहात आणि शरीर भेदामुळे वेगवेगळे भासणाऱया अंतरात्म्यांचे परम आत्मासुद्धा आपणच आहात. जानकीनिमित्तें सुरकैवारा । जात असता लंकापुरा ।  मार्ग मागितला सागरा । न करी आदरा तो तेव्हां । ईषन्मात्र क्रोधोर्मी। अवलंबितां हृदयपद्मीं । तद्युक्तकटाक्षसायकीं तिग्मीं। दाटला व्योमीं प्रलयाग्नि । सक्रोधकटाक्षशरमोक्षणीं। सागर संक्षुब्ध केला क्षणीं । तप्ततैलासम जीवनीं । उसळे अग्नि खळखळा। तेणें पोळले नक्रादिग्राह। तिमिंगिलादि मत्स्यसमूह।  उल्लाळतां प्रलयदाह । जलौकसांसी मांडला। तेव्हां खळबळिला अर्णव । मग विप्रवेषें करूनि स्तव ।  प्रसन्न केला श्रीराघव । उपाय सर्व कथूनियां । सक्रोधभुकु टिकटाक्षपातें । मार्ग दिधला सरितानाथें ।  तथापि स्वयश प्रकट तेथें । भवाब्धिसेतु स्थापिला। सेतु बांधोनि वानरकटकें । प्रतापें तारिलीं श्रीरघुनायकें।  अद्यापि भवाब्धिसद्भाविकें। तद्दर्शनें तरताती । ऐसें विस्तारूनियां यश । सुवेळे गेला अयोध्याधीश।  लंका जाळूनि केली कपिश। अमरावतीस लाजविती। ज्याचिया बाणांच्या तीव्रघायीं। दशग्रीवाचीं मस्तकें भोयीं । छेदोनि पाडिलीं लोलती पायीं । काकजंबुकगृध्रांच्या । तोचि तूं येथें मजकारणें । प्रकट झालासि हें मी जाणें । जाकळोनियां स्वदासकरुणें । केलें येणें ये ठायीं ।

नामनौकाआरोहणें । अद्यापि पामरिं भवाब्धितरणें ।

हे कीर्ति वर्णिती श्रुतिपुराणें । त्या तुजकारणें वोळखिलें । जांबवंत पुढे म्हणतो-रामावतारात आपण सीतेचे निमित्त करून देवांच्या कल्याणाकरिता, देवांना रावणाच्या बंदिखान्यातून सोडविण्याकरिता लंकेला जात असताना समुद्र आडवा आला. तेव्हा तुम्ही सागराला मार्ग मागितला. पण त्याने आपल्या आज्ञेचा आदर केला नाही. त्यावेळी आपण जराशा क्रोधाने समुद्राकडे पाहिले मात्र तर समुद्रात खळबळ उडाली. समुद्राचे पाणी तापलेल्या तेलाप्रमाणे उकळू लागले. त्याच्या पोटात प्रलयाग्नी भडकला. तेव्हा समुद्रात राहणाऱया मोठमोठय़ा सुसरी, मासे व जलचर घाबरले. समुद्रही घाबरून एका विप्र वेशात आपल्या समोर प्रकट झाला. त्याने आपल्याला वंदन केले व आपली स्तुती केली. त्यानंतर त्याने सागर पार करण्याचा मार्ग आपल्याला सांगितला. तेव्हा आपण वानरांच्या सहाय्याने त्याच्यावर आपल्या कीर्तीचाच पूल बांधला. हा पूल भवाब्धी तरून जाणाऱया पुलाचेच प्रतीक होय. या पुलावरून कित्येक वानरे सागर पार करून गेली. आजही या सेतूच्या दर्शनाने भाविक साधक संसार सागर तरून जातात. सागर पार जाऊन आपण लंका जाळली आणि रावणादी राक्षसांची मस्तके आपल्या बाणांनी छिन्न विछिन्न करून जमिनीवर पाडली. प्रभू! आपण हा सारा विलक्षण पराक्रम केलात त्यावेळी मी तेथे हजर होतो. माझ्या डोळय़ांनी मी आपला हा पराक्रम स्वतः पाहिला आहे.

Ad. देवदत्त परुळेकर

Related Stories

आफ्रिकेला ‘कोरोना’चा दुहेरी विळखा

Omkar B

हसावं की रडावं

Patil_p

भद्रा पर्णनि हरि आला

Patil_p

परंपरा आणि नाग्या

Patil_p

लॉकडाऊनमधली मुक्ताफळे

Patil_p

केली उत्पन्न विष्णुमाया

Patil_p
error: Content is protected !!