22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

जिल्हय़ात ‘लॉकडाऊन’मध्ये मोठी शिथिलता

एस. टी., रिक्षा, बाजारपेठा, कार्यालये उद्यापासून सुरू : सायंकाळी सात ते सकाळी सात संचारबंदी कायम

  • जिल्हय़ाच्या सीमा राहणार बंद
  • रिक्षामध्ये असतील दोनच प्रवासी
  • तूर्त आठवडा बाजार बंदच राहणार
  • आरटीओ, दुय्यम निबंधक कार्यालय सुरू
  • शासकीय कार्यालयांत 100 टक्के उपस्थिती
  • मास्क न वापरल्यास 200 रु. दंड
  • थुंकल्यास 1 हजार रुपयांचा दंड

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य शासनाने मोठी शिथिलता दिली आहे. त्यामुळे आता जवळपास दोन महिन्यानंतर एस. टी. बससेवा सिंधुदुर्गात दि. 21 मेपासून सुरू होणार आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालये, ऑटोरिक्षा, बाजारपेठाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी कायम राहणार आहे. तर बाजारपेठा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. मास्क वापरणेही बंधनकारक असून न वापरल्यास 200 रुपये दंड केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी येथे दिली.

 कोरोनाचा शिरकाव भारतात झाल्यानंतर देशात 24 मार्चपासून संचारबंदी सुरू झाली. परंतु, कोरोनाचा फैलाव वाढतच गेल्याने संचारबंदीतही टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. केंद्र व राज्य सरकारने 19 मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे रोखला गेला नसला, तरी लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. आर्थिक संकटही वाढू लागल्याने राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये मोठी शिथीलता आणखी आहे.

रेड झोन आणि नॉन रेड झोन

राज्य शासनाने आता रेड झोन व नॉन रेड झोन असे दोनच झोन केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा नॉन रेड झोनमध्ये येतो. त्यामुळे सिंधुदुर्गात जिल्हय़ांतर्गत एसटी बस सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र 50 टक्केच प्रवासी क्षमता एसटी मध्ये ठेवली जाणार आहे. जिल्हय़ाच्या सीमा कायम बंद राहणार आहेत.

ऑटोरिक्षांनाही परवानगी

ऑटोरिक्षाही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र रिक्षामध्ये स्वत: रिक्षा चालकाव्यतिरिक्त दोनच प्रवासी घेता येणार आहेत. मॉल्स, बीअरबार, परमीटरुम आणि हॉटेल्स रेस्टॉरंन्ट वगळता बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बाजारपेठा सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतच सुरू ठेवता येणार आहेत. आठवडा बाजार सुरू ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तूर्तास तरी आठवडा बाजार बंद राहणार आहेत. हॉटेलवाल्यांना घरपोच सेवा देता येणार आहे. तसेच बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी सोशल डिस्टन्सिंग पाळावेच लागणार आहे. कुठल्याही दुकानदारासमोर पाचपेक्षा जास्त ग्राहक असता नये. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे. तसेच बाजारपेठा खुल्या झाल्या, तरी बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टंन्सिग न पाळता गर्दी झाल्यास बाजारपेठ किंवा संबंधित दुकान बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे.

आरटीओ, दुय्यम निबंधक कार्यालय सुरू

शासकीय कार्यालयामध्ये दहा टक्केच कर्मचाऱयांच्या उपस्थितीबाबत आदेश होते. त्यातही आता शिथिलता आणली असून सर्व शासकीय कार्यालयामध्ये आता शंभर टक्के उपस्थिती राहणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, आरटीओ कार्यालयही सुरु राहणार आहे.

 मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड

लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता आणली असली तरी मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. मास्क न वापरल्यास 200 रुपयाचा दंड केला जाणार आहे. तसेच थुंकल्यास एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. दुचाकी वाहनावर फिरण्यास एका व्यक्तीलाच परवानगी दिलेली आहे.

सायंकाळी 7 ते सकाळी 7 संचारबंदी

संचारबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असली, तरी सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत संचारबंदी कायम आहे. या संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार असून त्यासाठी पोलिसांमार्फत गस्त घातली जाणार आहे. ग्रामीण भागात गटविकास अधिकाऱयांमार्फत लक्ष ठेवला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

त्या पत्राचा उपयोग होतोय!

जिल्हय़ात आजपर्यंत 27 हजार व्यक्ती जिल्हय़ाबाहेरून आलेले आहेत. त्यातील 90 टक्के व्यक्ती मुंबई-ठाणे मधून आहेत. चाकरमान्यांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हय़ातील विलगीकरणाची क्षमता संपल्याचे जाहीर करून राज्यातील इतर जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्तांना पत्र पाठवून पूर्व संमतीशिवाय पास देऊ नये, असे जिल्हाधिकाऱयांनी पत्र पाठवून कळवले होते. या बाबत विचारले असता त्या पत्राचा चांगला परिणाम झाला असून पास देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसे पास देण्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाची पूर्व संमत्ती विचारात घेतली जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा ओघ आता कमी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केला.

Related Stories

कारवाईनंतरही मालवण, वेंगुर्लेत एलईडीचा धुमाकूळ

NIKHIL_N

कुटुंबाचा आधार ठरलेल्या अकरा महिलांचा सन्मान

NIKHIL_N

दोडामार्गात कोविड टेस्टिंग सुविधा उपलब्ध करा!

NIKHIL_N

दापोलीकर गारठले, तापमान 10 अंश सेल्सिअस

triratna

पाच वर्षांसाठी सत्ता आमच्या हाती द्या

NIKHIL_N

विलगीकरणातील चाकरमान्यांनी केली शाळेची डागडुजी

Patil_p
error: Content is protected !!