तरुण भारत

50 लाखांहून अधिक बाधित

जगभरात कोरोनामुळे 3,25,239 जणांचा मृत्यू : रशियात 3 लाखांहून अधिक नागरिकांना लागण : चाचण्यांचे प्रमाण वाढले

जगभरात आतापर्यंत 50,04,161 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 19 लाख 72 हजार 175 बाधितांनी कोरोनाच्या संसर्गावर मात केली आहे. या संसर्गाने आतापर्यंत 3 लाख 25 हजार 239 जणांचा जीव घेतला आहे. रशियात एका दिवसात 8,764 नवे रुग्ण सापडले असून 135 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे. देशात आतापर्यंत 3,08,705 रुग्ण सापडले असून 2,972 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

ब्राझीलच्या प्रवासावर बंदी शक्य

ब्राझीलच्या प्रवासावर अमेरिकेकडून बंदी घातली जाऊ शकते, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्गाप्रकरणी ब्राझील चौथ्या क्रमांकाचा पीडित देश ठरला आहे. ब्राझीलमधून येत लोकांनी अमेरिकेच्या नागरिकांना बाधित करावे असे मला वाटत नाही. ब्राझीलमध्ये व्हेंटिलेटर्स पाठवून मदत केली जात असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून हा देश कोरोनाचा नवा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत. ब्राझीलमध्ये 2,71,885 बाधित असून 17,983 जणांना जीव गमवावा लागला आहे.

आफ्रिकन देशांचे कौतुक

विकसित देश कोरोना संसर्गाप्रकरणी आफ्रिकन देशांकडून धडा घेऊ शकतात. आफ्रिकन देशांनी महामारीवर चांगल्याप्रकारे नियंत्रण राखले आहे. प्रारंभिक अनुमानाच्या तुलनेत आफ्रिकन देशांमध्ये संसर्ग मंदगतीने फैलावला आहे. योग्य वेळी संसर्ग रोखण्यासाठी पावले उचलण्यात आल्याने हे शक्य झाले आहे. विकसित देशांसाठी हा धडा असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस यांनी बुधवारी म्हटले आहे. आफ्रिका खंडात आतापर्यंत 93 हजार 225 बाधित सापडले असून 2,925 जणांचा मृत्यू झाला
आहे.

1145 स्थलांतरितांना लागण

अमेरिकेत एका दिवसात 1,536 जणांचा मृत्यू झाला असून 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचा एकूण आकडा 15,71,018 झाला आहे. तर आतापर्यंत 93,542 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात ताब्यात घेण्यात आलेल्या 1,145 स्थलांतरितांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती इमिग्रेशन अँड कस्टम्स विभागाने दिली आहे. ताब्यात ठेवण्यात आलेल्या 2,194 जणांची चाचणी करण्यात आली आहे. 9 मेपर्यंत देशाच्या स्थलांतरित केंद्रांमध्ये 27,908 जणांना ठेवण्यात आले होते. तर 6 मे रोजी एका स्थलांतरिताचा मृत्यू झाला होता.

इस्रायल : धार्मिक स्थळे खुली

इस्रायलमध्ये बुधवार सकाळी धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. देशात कमाल 50 जणांच्या उपस्थितीत ज्यू प्रार्थनागृह, मशिद आणि चर्च सुरू करण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी दिली आहे. धार्मिक स्थळांमध्ये परस्परांपासून 2 मीटरचे अंतर, मास्क परिधान करणे आणि स्वच्छता ठेवावी लागणार आहे. इस्रायलमध्ये 25 मार्च रोजी धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. देशातील रेस्टॉरंट, बार आणि नाइट क्लबवरील बंदी 27 मेपासून हटविण्यात येणार आहे. जलतरण तलाव आणि हॉटेल्सही 27 मेपासून खुली होणार आहेत

पॅलेस्टाईनला युएईची मदत

पॅलेस्टिनींकरता मदतसामग्री नेणारे एतिहाद एअरवेजचे विमान मंगळवारी इस्रायलमध्ये दाखल झाले आहे. तसेच इस्रायलमध्ये उतरणारे संयुक्त अरब अमिरातचे हे पहिले वाणिज्यिक विमान ठरले आहे. विमान तेल अवीवच्या बाहेरील क्षेत्रात असलेल्या बेन गुरियन विमानतळावर उतरल्याची माहिती इस्रायल विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. लवकरच आम्ही प्रवासी विमानसेवा पाहू अशी आशा असल्याचे उद्गार युएईतील इस्रायलचे राजदूत डेनी डनोन यांनी काढले आहेत.

कॅम्ब्रिज विद्यापीठात पूर्ण सत्र ऑनलाईन
कॅम्ब्रिज विद्यापीठ 2020-21 शैक्षणिक सत्रात सर्व वर्गांना ऑनलाईन स्वरुप देणार आहे. पुढील वर्षाच्या उन्हाळय़ापर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होत राहणार आहे. चालू शैक्षणिक सत्रात ऑनलाईन वर्गाचा पुढाकार घेणारे कॅम्ब्रिज हे ब्रिटनमधील पहिले विद्यापीठ ठरले आहे. शक्य झाल्यास सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत फेस-टू-फेस व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. कॅम्ब्रिज विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा वापर करत शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न चालविला आहे.

चीनमध्ये 5 नवे रुग्ण

चीनमध्ये कोरोनाचे 5 नवे रुग्ण सापडले आहेत. यातील एक बाधित मंगोलिया स्वायत्त क्षेत्राच्या अंतर्गत भागात आढळून आला आहे. तर 5 रुग्ण जिलिन प्रांतात सापडले आहेत. देशाच्या अनेक रुग्णालयांमधून आतापर्यंत 1,662 विदेशी नागरिकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 46 विदेशी नागरिकांवर अद्याप उपचार सुरू आहेत. देशात अद्याप कुठल्याही विदेशी नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने बुधवारी दिली
आहे.

ब्रिटनमध्ये 35,341 बळी

ब्रिटनमध्ये एका दिवसात 545 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 35 हजार 341 जणांचा बळी गेला आहे. याचबरोबर कोरोना बळींच्या प्रकरणी अमेरिकेनंतर ब्रिटन दुसऱया स्थानावर आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 2,48,818 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. युरोपमध्ये आता केवळ ब्रिटनमध्ये कोरोनाचे संकट गंभीर स्थितीत दिसून येत ाअहे.

पेरूमध्ये चीनहून अधिक रुग्ण

पेरूमध्ये बाधितांचा आकडा चीनपेक्षा अधिक झाला आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 99,483 बाधित सापडले असून 2,914 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमधील बेड्स वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. लोकांनी सोशल डिस्टंन्सिंग, मास्क परिधान करणे आणि सातत्याने हात धुवत राहण्यासारखी पावले उचलण्याचे आवाहन राष्ट्रपती माटिंन विजकारा यांनी केले आहे.

20 हजार आरोग्य कर्मचाऱयांना बाधा

तीन महिन्यांच्या कालावधीत जर्मनीत 20 हजार 400 आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 61 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 हजारांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशाच्या एकूण बाधितांमध्ये 11 टक्के प्रमाण आरोग्य कर्मचाऱयांचे आहे. देशात आतापर्यंत 8,193 बाधितांना जीव गमवावा लागल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Related Stories

अर्थव्यवस्था पुन्हा खुली करणे हेच सर्वोत्तम

Patil_p

जपानमध्ये वर्षभरात सर्वात कमी विवाह

Patil_p

‘मोती’ ठरला भाग्यविधाता

Patil_p

जर्मन नागरिकांना इशारा

Patil_p

अमेरिकेत एच -1 बी व्हिसावरील निर्बंध शिथिल; भारतीयांना दिलासा

datta jadhav

कोरोनाबळींच्या संख्येत मेक्सिको जगात तिसऱ्या स्थानावर

datta jadhav
error: Content is protected !!