तरुण भारत

टी-20 विश्वचषकाबाबत निर्णय लवकरच

स्पर्धा लांबणीवर टाकण्याचे जवळपास निश्चित

मुंबई / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियातील आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली जाणार, हे जवळपास निश्चित झाले असून याची अधिकृत घोषणा येत्या आठवडय़ात होण्याचे संकेत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात याबाबत औपचारिक बैठक होईल, त्यावेळी ही विश्वचषक स्पर्धा पुन्हा केव्हा घेता येईल, यावरच ठोस चर्चा अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला आयसीसीसमोर या स्पर्धेबाबत तीन पर्याय विचाराधीन असल्याचे मानले जाते.

यापूर्वीच्या रुपरेषेप्रमाणे यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते. पण, ती या रुपरेषेप्रमाणे होऊ शकणार नाही, हे एव्हाना निश्चित झाले आहे. दि. 26 ते 28 मे या कालावधीत आयसीसी कार्यकारिणीची टेलिकॉन्फरन्स बैठक होणार असून यादरम्यान कोणत्याही वेळी स्पर्धेबाबत रितसर घोषणा होणे अपेक्षित आहे.

आयसीसी कार्यकारिणीच्या बैठकीत तीन विषयांवर प्रामुख्याने चर्चा होईल, असे संकेत असून त्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा लाब्ंाणीवर टाकण्याबाबत निर्णय, आयसीसीचे नवे अध्यक्ष निवडण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत निश्चित करणे व  निवडणुकीच्या तारखा व प्रक्रिया निश्चित करणे यांचा समावेश आहे.

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय सीमा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बंद राहणार असून त्यात क्वॉरन्टाईनची जाचक अट असणार आहे. त्यामुळे, 16 संघ दाखल झाल्यानंतर त्यांना क्वॉरन्टाईन करणे व त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धा घेण्यासाठी जो वेळ लागेल, तो देणे कठीण असल्याने त्या पार्श्वभूमीवर, ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील ही स्पर्धा लांबणीवर टाकणे क्रमप्राप्त मानले जाते.

खेळाडूंचा प्रवास, त्यांना राहण्यासाठी हॉटेल्स आदी सर्व व्यवस्था होणे कठीण होते. याशिवाय, रिकाम्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील सामने भरवून नुकसान सोसणे, हाच पर्याय आयोजकांसमोर असणार होता. पण, त्याऐवजी स्पर्धा लांबणीवर टाकणे अधिक रास्त होते, असे एका सूत्राने यावेळी नमूद केले. अगदी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कार्यकारिणीतून देखील ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचीच सूचना येत राहिली आहे.

बीसीसीआय ‘त्या’ संधीचा लाभ घेण्याच्या तयारीत…

यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय आयसीसीला घ्यावा लागला तर ऑक्टोबर-नोव्हेंबरचा दुर्मिळ ‘टाईम-विंडो’ बीसीसीआयला मिळेल आणि याचा लाभ या कालावधीत आयपीएल स्पर्धा घेण्याचा नियामक मंडळाचा विचार आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) ऑगस्टमध्ये कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी संघाला आणण्यासाठी चार्टर पाठवणार आहे. तीच कल्पना भारतीय व्यवस्थापन ऑस्ट्रेलिया व विंडीजमधील खेळाडूंना आयपीएलसाठी भारतात आणताना राबवेल, अशी चर्चा आहे.

काय आहेत आयसीसीसमोरील तीन पर्याय?

1) ऑक्टोबर-नोव्हेंबरऐवजी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये स्पर्धेची पुनर्रचना करणे हा आयोजकांसमोरील पहिला पर्याय असेल. अर्थात, एप्रिलमध्ये खेळवल्या जाणाऱया आयपीएलच्या तारखांशी सरमिसळ होणार नाही, इतका चिंतेचा विषय असेल. फेब्रुवारी-मार्चमध्ये स्पर्धा घेणे निश्चित झाले तर इंग्लंडचा भारत दौरा यामुळे अडचणीत येईल. आयसीसी इव्हेंट्स व भारताच्या मालिकांचे हक्क स्टार इंडियाकडे असल्याने ब्रॉडकास्टर्सना हा बदल पचनी पडणार नाही, असे संकेत आहेत.

2) यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात तर पुढील वर्षातील टी-20 विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. या ठिकाणांची अदलाबदल करत हा पेच निकाली काढता येऊ शकतो. मात्र, भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱयाची तयारी करत असल्याने या बदलास ते राजी होणार का, याची साशंकता असेल.

3) यंदाऐवजी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा भरवता येऊ शकेल. मात्र, यासाठी 2022 मध्ये आयसीसीचा आणखी कोणताही इव्हेंट नसेल, याची खातरजमा सर्व घटकांना करुन घ्यावी लागणार आहे.

Related Stories

दिल्ली ‘स्टार’, शॉ-धवन ‘सुपरस्टार’!

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

फॉर्ममधील मुंबईचा आज बांबोळीत ओडिशाशी सामना

Patil_p

अँडरसनचा भेदक मारा, पाक अडचणीत

Patil_p

रियल माद्रीदचे अध्यक्ष पेरेझ कोरोनाबाधित

Patil_p

जर्मनीतील फुटबॉल लीग स्पर्धा मे अखेरीस सुरू करण्याचा प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!