तरुण भारत

बसचालक, वाहक प्रवाशांच्या प्रतीक्षेत

बसस्थानकात तुरळक प्रवासी, परिवहनला फटका,

बेळगाव :/ प्रतिनिधी

लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने मंगळवारपासून बससेवेला प्रारंभ झाला. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे बसस्थानकात प्रवाशांची संख्या तुरळक झाली आहे. त्यामुळे बसचालक, बसवाहकांना प्रवाशांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. प्रवाशांची संख्या फारच कमी असल्याने काही बसेस एक दोन फेऱया मारत आहेत. तर काही बसेस जाग्यावर थांबून आहेत. परिणामी परिवहनला दररोजच्या 7 लाखांच्या महसूलाला मुकावे लागले आहे.

परिवहनला लॉकडाऊनपूर्वी दररोज 8 लाखांपर्यंत मिळणारा महसूल आता 3 लाखांवर येऊन ठेपला आहे. प्रवाशांची संख्या फारच कमी झाल्याने परिवहन मंडळ अडचणीत आले आहे. दररोज बेळगाव आगारातून मोठय़ा प्रमाणात महसूल जमा होतो. लॉकडाऊन काळात तब्बल 55 दिवस बससेवा बंद झाल्याने परिवहनला सतराशे कोटी रूपयांचा फटका बसला आहे. त्यातच आता बससेवा सुरू होऊन देखील प्रवासी मिळत नसल्यामुळे स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या बसेस जाग्यावर थांबून आहेत.

एरव्ही बस वाहतुकीवर प्रवाशांच्या गर्दीचा ताण मोठय़ा प्रमाणात असतो. बसस्थानकात हजारो प्रवाशांची नेहमी ये-जा असते. त्यामुळे बसस्थानक सतत प्रवाशांनी गजबजलेले असते. बसमध्ये जागा पकडण्यासाठी चढो-ओढ असते. तर काही जण दरवाज्यावर लोंबकळत प्रवास करतात. अशी परिस्थिती असली तरी सध्या मात्र मोजक्मयात बसमध्ये 10 ते 15 प्रवासी करताना दिसत आहेत.

 बेळगाव आगारामध्ये एकूण आठ आगाराचा समावेश असून त्यापैकी बेळगावमध्ये चार तर रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर, सौंदती येथे अन्य चार आगार आहेत. बेळगाव आगारातून दररोज स्थानिक बसेससह निपाणी, कोल्हापूर, संकेश्वर, इचलकंरजी, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, कराड, मुंबई, धारवाड, हुबळी, मंगळूर, बेंगळूर, गोवा, चिपळूण, विजापूर, हैद्राबाद आदी ठिकाणी बसेस धावतात. बेळगाव विभागातून दररोज दीड हजार गाडय़ा धावतात तर त्यांच्या 2711 फेऱया होत असतात. त्यामुळे बेळगाव आगारातून परिवहनला मोठा महसूल मिळत असतो. मात्र बससेवा सुरू होऊन चार दिवस उलटले तरी प्रवाशांनी पाठ फिरविल्याने परिवहन अचणीत आले आहे.

बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून शेजारील महाराष्ट्र व गोवा राज्यांत धावणाऱया बसेसची संख्या अधिक आहे. मात्र परराज्यांतील वाहतुक पूर्णपणे बंद असल्याने विशेष करून बेळगाव आगाराला मोठा फटका बसला आहे. बसस्थानकात आगाऊ बुकिंग सुरू करण्यात आले आहे. मात्र बुकिंगकडेही प्रवासी फिरकत नसल्यामुळे बुकिंग काउंटरही मोकळे दिसत आहे.

Related Stories

बाजारपेठेत वर्दळ वाढली

Patil_p

नद्यांची वाटचाल धोका पातळीकडे

Patil_p

बेकिनकेरे गावालगतचा तलाव धोकादायक स्थितीत

Patil_p

नदीकाठावरील अतिक्रमणाचे सर्व्हेक्षण

Patil_p

सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाला अजिंक्यपद

Patil_p

हिंदवाडी येथे विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

Patil_p
error: Content is protected !!