तरुण भारत

कोकण किनारपट्टीवर नवा ‘चतुर’

कोकणच्याच युवा संशोधकांची यशस्वी शोधमोहीम

स्वप्नील वरवडेकर / कणकवली:

Advertisements

खासकरून पावसाळा कालावधीत दिसणाऱया ‘चतुर’ प्रकारातील नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. उल्लेखऩीय म्हणजे ही नवी प्रजात कोकण किनारपट्टीवर आढळल्याने तिचे ‘कोकण रॉकड्वेलर’ असे नामकरण करण्यात आले असून ‘ब्रडिनोपाया कोकणेन्सीस’ असे शास्त्राrय, तर ‘वेताळ’ असे मराठी नामकरणही करण्यात आले आहे. त्याहूनही उल्लेखनीय म्हणजे या नव्या चतुराला शोधण्याचा मान शंतनू जोशी (मूळ रायगड व सध्या रा. मुंबई) व डॉ. दत्तप्रसाद सावंत (मूळ देवगड व सध्या रा. मुंबई) या कोकण सुपुत्र असलेल्या युवा संशोधकांनाच प्राप्त झाला आहे.

जगभरात चतुर आणि टाचण्यांच्या मिळून सहा हजारांहून अधिक जाती-प्रजाती आहेत. त्यातील ‘ब्रॅडिनोपाया जिनस’ या प्रकारामधील ही चौथी प्रजात आहे. यापूर्वीच्या तीन प्रजातींमधील एक भारतात, तर दोन आफ्रिकेत आहे. शंतनू – दत्तप्रसाद या जोडीनेच वर्षभरापूर्वी सिंधुदुर्गातच चतुर प्रकारातील ‘टाचणी’च्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. आता आणखी एका उत्कृष शोधमोहिमेमुळे या जोडीचे देशभरातील कीटकतज्ञांनी अभिनंदन केले आहे.

किनारपट्टीवर आढळला नवा चतुर

डॉ. दत्तप्रसाद हे जुलै 2015 मध्ये देवगड येथील ग्रामीण रुग्णालयानजीक असणाऱया आपल्या घराच्या परिसरात असताना त्यांना ही नव्या चतुरामधील मादी दिसली. कोकणात ‘ग्रॅनाईट घोस्ट’ ही चतुराची प्रजात सर्रास दिसते. पण, हा नवा चतुर बराचसा वेगळा असल्याचे दत्तप्रसाद यांना जाणवले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांना घराजवळच याच चतुरामधील नरही दिसला. 2016 मध्ये त्यांना मुरुड जंजिरा किल्ल्यावर अगदी आपल्या घरानजीक दिसलेलाच चतुर आढळला. त्याचवेळी ही नवी प्रजात असण्याच्या शक्यतेने दत्तप्रसाद यांनी या मादी प्रकारातील चतुराचा फोटोही काढला. तर नोव्हेंबर 2017 मध्ये विजयदुर्ग किल्ल्याचा बुरुज चढत असतानाच तेथे असणाऱया पाण्याच्या हौदाकडे दिसलेल्या याच चतुराच्या नर-मादीचे नमुने त्यांनी गोळा केले.

अन्य चतुरांपेक्षा विलक्षण फरक

दत्तप्रसाद-शंतनू जोडीने मायक्रोस्कोप्ट व अन्य यंत्रणांनी निरीक्षण केल्यानंतर हा नवा चतुर व कोकणात आढळणारा ‘ग्रॅनाईट घोस्ट’ प्रकारातील चतुर यांच्यामध्ये विलक्षण फरक आढळला. त्याचे जननेंद्रीय ‘ग्रॅनाईट घोस्ट’पेक्षा वेगळे होते. ‘ग्रॅनाईट घोस्ट’च्या पंखांवरील ‘स्पॉट’ काळा-पांढरा असतो. तर नव्या चतुराच्या पंखावरील ‘स्पॉट’ तपकिरी काळा होता. ‘ग्रॅनाईट घोस्ट’चे पंख पारदर्शक असतात. पण, नव्या चतुराला जिथे पंख जोडले जातात, तिथे काळा ‘पॅच’ आढळला. त्याचे डोळेही ‘डार्क’ होते. जननेंद्रीयाचा आकारही वेगळा दिसला. ‘ग्रॅनाईट घोस्ट’च्या पंखांवरील ‘डिस्कॉयडल एरिया’मध्ये तीन ‘सेल्स’ची रांग असते. पण, नव्या चतुराच्या पंखांवरील ‘डिस्कॉयडल एरिया’मध्ये चार ‘सेल्स’ची रांग असल्याचे दत्तप्रसाद, शंतनू यांच्या लक्षात आले.

..अन् नवा ‘चतुर’ मान्यताप्राप्त

दत्तप्रसाद-शंतनू यांनी नव्या चतुराचे नमुने बेंगलोर येथील नॅशनल सेंटर फॉर बायलॉजीकल सायन्सेस या किटकांच्या नव्या प्रजातींबाबत संशोधन करणाऱया संस्थेत जमा केले. तेथे कीटकशास्त्रज्ञ डॉ. कृष्णमेघ कुंटे व अन्य अभ्यासकांनीही निरीक्षण केले. त्यानंतर हा संशोधनाचा पेपर न्युझीलंड येथील ‘झू टॅक्झा’ या कीटकजन्य सजिवांचे संशोधन करणाऱया ‘जर्नल’मध्ये पाठवण्यात आला. तेथेही काही शास्त्रज्ञांनी निरीक्षण/अभ्यास केला. अखेरीस ही किटकाची नवी प्रजात असल्याचे निश्चित झाले व त्यास 18 मे रोजी अधिकृत मान्यता मिळाली.

कोकणच्या जैवविविधतेशी सांगड

नव्या चतुराला ‘ब्रडिनोपाया कोकणेन्सीस’ असे शास्त्राrय नाव देण्यात आले, कारण कोकणच्या जैवविविधतेला अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर ‘कोकण रॉकड्वेलर’ असे इंग्रजी नाव देण्यात आले आहे, कारण या प्रजातीचे चतुर जांभ्या दगडांच्या भिंतींवर किंवा मोठय़ा दगडांवर जाऊन बसतात, असेही दत्तप्रसाद – शंतनू सांगतात.

किनारपट्टीवर अस्तित्व

ही नवी प्रजात सध्या ठाणे जिल्हय़ात ओवळेकरवाडी फुलपाखरू उद्यान, साकुर्ली (ता. शहापूर), मुंबई उपनगर जिल्हय़ात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, रायगड जिल्हय़ात रामधरणेश्वर (ता. अलिबाग), मुरुड – जंजिरा किल्ला, तळेवाडी (ता. अलिबाग), रत्नागिरी जिल्हय़ात गव्हे, मुसळोंडी (ता. गुहागर), फणसोप (ता. रत्नागिरी), गणपतीमुळे, तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात विजयदुर्ग व देवगड याठिकाणी आढळली आहे. याचाच अर्थ ही प्रजात कोकण किनारपट्टीवर आढळत असल्याचे शंतनू, दत्तप्रसाद यांनी सांगितले.

कोकण सुपुत्रांची उल्लेखनीय कामगिरी

शंतनू-दत्तप्रसाद जोडीने यापूर्वी ‘सेरियाग्रिऑन’ प्रकारातील पाचव्या प्रजातीचा सिंधुदुर्गातच वाडा (ता. देवगड) येथे शोध लावला होता. डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी घेतली असून सध्या ते केईएम रुग्णालय मुंबई येथे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतानाच किटकांच्या नव्या जाती शोधण्यासाठी प्रयत्नशील असतात. शंतनू जोशी यांनी झेवियर्स कॉलेज मुंबई येथून बीएस्सी केले असून सध्या ते कीटकजन्य सजिवांबाबत संशोधनाचे काम स्वतंत्रपणे करीत असतात. त्यांनी यापूर्वी ईशान्य भारतात चतुरांच्या दोन प्रजाती शोधल्या आहेत.

Related Stories

खरीप हंगामासाठी 95 कोटींचे कर्ज वाटप

NIKHIL_N

प्रत्येक तालुक्यात प्रतिदिन 100 डोस

NIKHIL_N

खेडमध्ये कोरोना वाढ सुरुच!

Patil_p

…तर रिलायन्स, जिओ विरोधात सेना स्टाईलने आंदोलन छेडणार

Shankar_P

पाटच्या दाभोलकर कुटुंबाला अठरा वर्षांनी मिळाली शिधापत्रिका

NIKHIL_N

आज रात्रीपासून लॉकडाऊन अधिक कडक

NIKHIL_N
error: Content is protected !!