तरुण भारत

आजपासून प्रवाशांच तीन स्तरीय हाताळणी

मुख्यमंत्र्यांची माहिती : आज रस्ता, रेल्वे, हवाईमार्गे 4000 प्रवाशी येणार

  • महाराष्ट्रही गोव्याचा फॉर्मुला पाळणर
  • प्रवाशाची तीन स्तरीय हाताळणी
  • प्रवाशास कोरोना नेगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक
  • नपेक्षा रु. 2000 भरून स्वाईप चाचणी होणार
  • चाचणी न केल्यास व्हावे लागेल होम क्वारंटाईन

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोव्यात आजपासून हवाई वाहतूक सुरू होत असल्याने आणि रेल्वे, रस्ता याद्वारे 4000 प्रवासी दाखल होणार असल्याने सरकारने स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजरमध्ये बदल केले आहेत. तीन पद्धतीने यानंतर रुग्ण हाताळणी केली जाणार आहे. येणाऱया प्रवाशांना कोविड निगेटिव्ह असल्याचे प्रशस्तीपत्र सोबत आणावे लागेल. नपेक्षा 2000 रुपये भरून स्वाईप टेस्ट करावी लागेल किंवा होम क्वारंटाईन व्हावे लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना लढय़ात गोव्याची कामगिरी उत्कृष्ट असून महाराष्ट्रानेही गोव्याचा फॉर्म्युला पाळावा, असा निर्णय घेतला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

आज सोमवारपासून गोव्यात देशी विमान प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. हा निर्णय सर्वच राज्यांना लागू आहे. त्यामुळे गोवा यासाठी नकार देऊ शकत नाही. यासंदर्भात केंद्रीय नागरी वाहतूकमंत्र्यांशीही आपण चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यात आज सोमवारी 4000 प्रवासी विमानसेवा, रेल्वे, जलमार्ग व रस्ता वाहतुकीच्या माध्यमातून येणार आहेत. त्यामुळे सरकारने विशेष काळजी घेतली आहे. सरकारला लोकांची काळजी आहे, मात्र विरोधक अशा आपत्कालीन वेळीही राजकारण करतात याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रवाशांची तीन स्तरांवर होणार तपासणी

आजपासून तीन पद्धतीने हाताळणी केली जाणार आहे. गोव्यात जे प्रवासी येतात त्यांनी कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट सोबत आणावे. ते 48 तास अगोदर घेतलेले असावे. नपेक्षा गोव्यात येताच प्रवाशाने स्वाईप चाचणी करावी. त्यासाठी 2000 रुपये आकारले जातील. एखाद्या प्रवाशाकडे पैसे भरायला नसतील तर त्याने 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावे. त्याच्या हातावर शिक्का मारला जाईल. तसेच त्याच्या घराबाहेर नोटीस लावली जाणार आहे. त्याच्यावर आरोग्य खाते, पंचायत, नगरपालिका यांच्या प्रतिनिधींची देखरेख असणार आहे. घरी क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीने बाहेर फिरू नये. तसे केल्यास त्याला सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेऊन पैसे आकारले जातील.

पर्यटकांना सरकारने बोलाविले नाही

सरकारने गोव्यात पर्यटकांना बोलावलेले नाही. त्यामुळे जे गोव्यात येतात त्यांना आपला पत्ता दाखवावा लागेल. गोव्यात एकही हॉटेल सुरू नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये येण्याचा प्रश्न नाही. गोव्यात काहींचे सेंकड होम आहे किंवा गोव्यातील लोकांनीच काहींना बोलाविले असेल, पण त्याचा पुरावा सर्व प्रवाशांना सादर करावा लागेल. सोमवारी विमानातून 2000, रेल्वेतून 1000 व रस्ता वाहतुकीद्वारे 1000 प्रवासी गोव्यात येणार आहेत. जे प्रवासी येतात त्यांना कोणती मार्गदर्शक तत्वे पाळावी ही माहिती दिली जाईल. फॉर्मही भरून घेतला जाणार आहे. सरकार सर्वांना क्वारंटाईन करून त्यांच्यावर खर्च करू शकत नाही. त्यामुळे येणाऱयांनी स्वतःची काळजी घ्यावी. बाहेर फिरू नये, असे आवाहन त्यांनी केले.

विलगीकरणामुळे घर वाळीत टाकू नये

संशयित रुग्णाला घरी क्वारंटाईन केले म्हणून लोकांनी त्यांचे घर वाळीत टाकू नये. सुरक्षित अंतर राखल्यास कोणतीही भीती नाही. प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. जे संपर्कात येतात त्यांनाच लागण होण्याची शक्यता असते, मात्र शेजाऱयांना होणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्याची कामगिरी उत्कृष्ट

कोरोना काळात गोव्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याचबरोबर केरळचीही कामगिली चांगली राहिली आहे. गोव्याच्या अधिकाऱयांनी केरळमधील उपाययोजनांचा अभ्यास केला आहे. मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. आता मुंबई, महाराष्ट्रानेही गोव्याची पद्धती अवलंबण्याची सूचना आपल्या अधिकाऱयांना केली आहे. 23 मार्च ते 25 मे पर्यंत वॉररुममध्ये सातत्याने चर्चा सुरू होती. कोरोनाविरोधी लढा कशा पद्धतीने लढावा यावर चर्चा होत होती. मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली बैठका चालायच्या. आपण व महसूल यांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शविली. 60 दिवस या बैठका चालल्या. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशीही बैठका चालल्या. सर्वच खात्याचे अधिकारी, आयएएस अधिकारी या बैठकांना उपस्थिती लावायचे. कार्यकारी समितीनेही चांगले काम केले आहे. प्रसारमाध्यमांनाही लोकांपर्यंत माहिती चांगल्या पद्धतीने पोहोचली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आतापर्यंत 13 हजार चाचण्या

आतापर्यंत 13 हजार लोकांच्या कोविड चाचण्या झालया आहेत. त्यामध्ये 66 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. पैकी 19 रुग्ण बरे झाले. आता राज्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 47 एवढी आहे. हे रुग्णही आठ दिवसात बरे होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर समाधानी ः आरोग्यमंत्री राणे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशावांच्या दृष्टीने जे निर्णय घेतले ते आपल्याला मान्य असल्याचे यावेळी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

Related Stories

’मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड’चे उद्या प्रकाशन

Patil_p

महिला काँग्रेसकडून मूक मेणबत्ती मोर्चे

Amit Kulkarni

काणकोणात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत

Omkar B

22 प्लस जागा मिळविण्याचे भाजपचे ध्येय

Amit Kulkarni

टीएमसीच्या युवा शक्ती कार्डसाठी 35 हजार नोंदणी

Amit Kulkarni

मंत्री माविन गुदिन्हो यांची चिखलीच्या हॉस्पिटलला पुन्हा भेट, घेतला साधनसुविधांचा आढावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!