तरुण भारत

पाकिस्तानात पुन्हा कठोर टाळेबंदी शक्य

जगभरात आतापर्यंत 56,09,654 जणांना कोरोना विषाणूची लागण : 3,48,322 जणांनी गमाविला जीव

जगभरात आतापर्यंत 56 लाख 09 हजार 654 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर या महामारीने 3 लाख 48 हजार 322 जणांचा जीव घेतला आहे. कोरोनाची बाधा वाढत राहिल्यास पाकिस्तानात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार आहे. पाकिस्तानचे सर्वोच्च आरोग्य अधिकारी जफर मिर्झा यांनी लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानने चालू महिन्यात निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ केला होता. पाकिस्तानात आतापर्यंत 57 हजार 705 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1,197 जणांचा बळी गेला आहे.

Advertisements

कोरियात कठोर नियम

दक्षिण कोरियात एका युवकाला क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4 महिन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होण्याच्या 2 दिवसांपूर्वीच हा युवक बाहेर पडताना आढळून आला होता. दक्षिण कोरियाचे सरकार आता नाइट क्लबशी संबंधित संसर्ग वाढल्याने नियम अधिक कठोर करण्याचा विचार करत आहे. देशात 11 हजार 225 बाधित सापडले असून 269 जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझील : 806 बळी

ब्राझीलमध्ये मागील 24 तासांत 806 जणांचा मृत्यू झाला असून 13 हजार 51 नवे बाधित सापडले आहेत. देशात आतापर्यंत 23,522 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3,76,669 जणांना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलमध्ये प्रतिदिन मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या पहिल्यांदाच अमेरिकेपेक्षा अधिक राहिली आहे. ब्राझीलच्या अमेझॉनच्या जंगलात वास्तव्य करणाऱया आदिवासींपर्यंत महामारी पोहोचल्याने विशेष चिंता व्यक्त होत आहे.

अमेरिका : संकट घटतेय

अमेरिकेत आता कोरोना संसर्गामुळे प्रतिदिन मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या कमी होऊ लागली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार सोमवारी देशात 532 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशातील एकूण मृतांचा आकडा 99,905 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात सुमारे 19 हजार नवे बाधित सापडले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या 17 लाख 06 हजार 226 झाली आहे. न्यूयॉर्कमधील संसर्गही आता कमी होऊ लागल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले.

सौदीत संचारबंदी शिथिल

सौदी अरेबियात मक्का वगळता देशातील प्रत्येक ठिकाणावरील संचारबंदी गुरुवारपासून संपुष्टात आणली जाणार आहे. मक्कामधील संचारबंदी समाप्त करण्याचा निर्णय 21 जूनपासून लागू होणार आहे. 31 मेपासून देशांतर्गत विमानोड्डाणे सतेच मशिदींमध्ये नमाजावरील बंदी हटविण्यात आली आहे. लोकांना खासगी आणि शासकीय कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी जाण्याची अनुमती दिली जाणार आहे. सौदीत आर्थिक व्यवहारांना चालना देण्यात येणार आहे.

ट्रम्प यांच्याकडून बचाव

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळण्यासाठी बाहेर पडल्याने वाद उभा ठाकला आहे. गोल्फ क्लबच्या बाहेर काही लोक फलक घेऊन उभे होते. “1 लाख लोक मारले गेले आहेत. आम्हाला चिंता आहे. तुम्हाला चिंता आहे का’’ असा मजकूर या फलकावर नमूद होता. काही प्रमाणात व्यायाम करण्यासाठी मी दर आठवडय़ाच्या अखेरीस गोल्फ खेळतो. बनावट आणि भ्रष्ट प्रसारमाध्यमांनी मात्र याला पाप वाटावे अशाप्रकारे सादर केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

दिवसात 1.02 लाख रुग्ण

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात 24 तासांमध्ये 1 लाख 2 हजार 790 नवे बाधित सापडले असून 4,380 जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षेचा दाखला देत संसर्गावरील उपचारासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या चाचणीवर बंदी घातली आहे. उपचार करवून घेत असलेल्या लोकांमध्ये हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या वापरामुळे मृत्यूची शक्यता वाढत असल्याचे लॅन्सेटच्या अहवालात म्हटले गेल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.

इटलीत नवी रुग्णसंख्या घटली

इटलीत 29 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच दिवसभरात सर्वात कमी म्हणजे 300 नवे रुग्ण सापडले आहेत. तर मागील 24 तासांत 92 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृतांचा एकूण आकडा 32,877 झाला आहे. तर बाधितांचे एकूण प्रमाण 2,30,158 झाले आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 41 हजार 981 जण संसर्गातून मुक्त झाले आहेत. युरोपमध्ये महामारीमुळे लॉकडाउन लागू करणारा इटली हा पहिला देश ठरला होता. इटलीत आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.

Related Stories

युएईत पारा 51 अंश सेल्सिअसवर

Patil_p

तुर्की, ग्रीस भूकंपाने हादरले; पत्त्यासारख्या कोसळल्या इमारती

datta jadhav

तिसऱयांदा आणीबाणी

Patil_p

बोली भाषा संपणार, वनौषधींचे ज्ञान धोक्यात

Patil_p

प्रतिक्षा संपली : रशियाची ‘स्पुतनिक-व्ही’ लस 1 मे ला भारतात

datta jadhav

वुहानचे जनजीवन येतेय पूर्वपदावर

tarunbharat
error: Content is protected !!