तरुण भारत

खेलरत्न पुरस्कारासाठी विनेश फोगटचा अर्ज

मात्र खेलरत्न विजेत्या साक्षी मलिकला हवाय अर्जुन पुरस्कार,

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेली महिला मल्ल विनेश फोगटची सलग दुसऱया वर्षी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार आहे.  रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकलेल्या साक्षी मलिकने मात्र खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळाला असला तरी आपल्याला अर्जुन पुरस्कार मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला आहे. 

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविलेली विनेश ही एकमेव भारतीय महिला मल्ल असून तिला गेल्या वर्षी खेलरत्न पुरस्कारापासून वंचित रहावे लागले होते. पुरुष मल्ल बजरंग पुनियाला गेल्या वर्षी हा पुरस्कार मिळाला होता. गेल्या तीन वर्षात विनेशच्या कामगिरीत सातत्य दिसून आले असून तिने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण मिळविले तर 2019 मध्ये तिने नूर सुलतान येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवित ऑलिम्पिकमधील स्थानही निश्चित केले होते. या वर्षीच्या सुरुवातीस नवी दिल्लीत झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्येही तिने कांस्यपदक मिळविले आहे.

‘विनेशचा खेलरत्नसाठीचा अर्ज आम्ही सोमवारी पाठवणार आहोत. या पुरस्काराची यावेळची ती प्रमुख दावेदार असेल. मात्र अर्जुन पुरस्काराच्या अर्जांचा आम्ही अजून विचार केलेला नाही. कारण यासाठी आमच्याकडे अनेक अर्ज दाखल झालेले आहेत. भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष त्याची छाननी करून क्रीडा मंत्रालयाकडे पाठवावयाच्या नावांची निवड करतील,’ असे डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले. ‘3 जूनपर्यंतचा अवधी आमच्याकडे असला तरी आम्ही सोमवारीच नावे पाठवणार आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

डब्ल्यूएफआयमधील एका सूत्राने सांगितले की, ‘अलीकडच्या काळात मैदानामध्ये संघर्ष करावा लागत असला तरी साक्षी मलिकने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे. 2016 मध्ये तिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकर व नेमबाज जितू राय यांच्यासमवेत खेलरत्न पुरस्काराने याआधीच सन्मानित करण्यात आलेले आहे. अलीकडे तिला युवा मल्ल सोनम मलिककडून दोनदा पराभूत व्हावे लागले. त्यामुळे तिला आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतही खेळण्याची संधी मिळाली नाही. डब्ल्यूएफआय तिचे नाव पाठवते का, हे पाहणे मात्र मनोरंजक ठरेल. कारण 2019 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविणारा मल्ल दीपक पुनिया (86 किलो गट) व महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारे (61 किलो गट, ऑलिम्पिकमध्ये नसलेला गट) यांनीही अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

‘रिओ ऑलिम्पिकच्या आधी साक्षी मलिकने कोणतीही मोठी कामगिरी बजावलेली नव्हती. त्यामुळे तिचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठविण्यात आले नव्हते. रिओमध्ये कांस्य जिंकल्यानंतर तिला थेट खेलरत्न पुरस्कारच देण्यात आला  होता. पण आता तिला अर्जुन पुरस्कारही मिळावा, असे वाटत आहे,’ असे या सूत्राने सांगितले. कामगिरीच्या आधारावर डब्ल्यूएफआयने निवड करण्याचे ठरविल्यास ते साक्षीचे नाव पाठवणार नाहीत. कारण तिच्यापेक्षा सरस कामगिरी करणाऱया दीपक पुनिया व राहुल आवारे यांना या पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय या पुरस्कारासाठी इतर क्रीडा प्रकारांतील खेळाडूंशीही त्या दोघांना स्पर्धा करावी लागणार आहे, असे त्याने स्पष्ट केले. अर्जुनसाठी अर्ज पाठविणाऱयांत संदीप तोमरचाही समावेश आहे.

आपल्याला पुरस्कार मिळावा यासाठी खेळाडूंना अर्ज करावा लागतो. नंतर  संबंधित राष्ट्रीय फेडरेशन्सने त्यांच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे करावी लागते. खेळाडूंना स्वतंत्रपणेही अर्ज पाठविता येतो. पण त्यासाठी त्यांना राज्य संघटना किंवा माजी अर्जुन, खेलरत्न, ध्यान चंद, दोणाचार्य पुरस्कार विजेत्यांचे समर्थन मिळणे आवश्यक असते.

Related Stories

पीव्ही सिंधू दुसऱया फेरीत

Patil_p

पाक संघातून हाफीज, फक्रला डच्चू

Patil_p

जेबॉर, साबालेन्का, बेरेटिनी उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

मँचेस्टरमध्ये भारतीय संघ प्रशिक्षकांविना खेळणार

Patil_p

पात्र फेरीतच भारताचे आव्हान समाप्त

Patil_p

बिग बॅश लीगमधून डिव्हिलियर्सची माघार

Patil_p
error: Content is protected !!