वार्ताहर/ लोणंद
लोणंद येथील प्रसिद्ध भैरवनाथ डोंगरावर अनधिकृतपणे उभारलेला सभामंडप खंडाळा वनविभागाने धडक कारवाई करत आज जमीनदोस्त केला.
लोणंद येथील भैरवनाथ डोंगर हा अलीकडच्या काळात लोकसहभागातून वनराजी फुलल्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता. लोणंद येथील अनेकांच्या दिवसाची सुरवात ही भैरवनाथ डोंगरावर मॉर्निंग वॉक ला जाऊन होत असते. अशा मॉर्निंग वॉकला जाणारांनी आपल्या सोबत पाण्याच्या बाटल्या नेऊन या ऊजाड डोंगरावर चांगली वृक्षराजी फुलवली आहे.
मागील वर्षी भैरवनाथ डोंगरावर एक लोखंडी खांब व पत्र्याच्या सहाय्याने एक सभामंडप अज्ञातांनी उभारलेला होता. वनविभागाने त्या संदर्भात जुलै 2019 मधेच गुन्हा नोंदवला होता. तसेच लोणंद नगरपंचायतीच्या माध्यमातून नोटीसीद्वारे संबंधीतांनी अतिक्रमण काढून घ्यावे अशी सूचना देखील वनविभागाने केलेली होती. मात्र आजतागायत या अवैध सभामंडपाची कोणीही जबाबदारी न घेतल्यामुळे वनविभागाने आज धडक कारवाई करून हा सभामंडप जमीनदोस्त केला. तसेच त्यासाठी वापरण्यात आलेले लोखंडी सामान जप्त केले आहे. या कारवाईत खंडाळा परिक्षेत्राच्या अधिकारी जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा, वाई व कोरेगाव येथील सुमारे चाळीस कर्मचायांनी भाग घेतला .
सदर कारवाई चालू असताना सातारा येथील सहायक वन संरक्षक एस. बी चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या कारवाई वेळी लोणंद येथील भैरवनाथ मंदिर ट्रस्ट च्या शिवाजीराव शेळके पाटील आणि त्यांच्या सहकायांनी संबंधित अधिकायांना ही कारवाई न करण्याबाबत विनवणी केली मात्र वनविभागाने सदर सभामंडप अनधिकृतपणे वन जमिनीत असल्याचे सांगत ही करवाई नियमाप्रमाणेच असल्याचे सांगितले.