तरुण भारत

सावध आणि आश्वासक सुरुवात

मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येच्या संदर्भात वर्तविण्यात आलेले अंदाज  आज खोटे ठरले आहेत. नीती आयोगालाही मुंबईच्या मॉडेलची दखल घेत महाराष्ट्र सरकारचे कौतुक करावे लागले. हेच ठाकरे सरकारचे पहिले यश मानावे लागेल.

वैद्यकीय शास्त्राला आव्हान ठरलेल्या कोरोनाचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात 9 मार्चला आढळला. तेव्हापासून राज्य सरकारची कोरोनाविरुद्ध दीर्घ लढाई सुरू आहे. ही लढाई किती काळ सुरू राहील हे सांगणे अवघड आहे. पण कोरोनामुळे राज्यातील विशेषत: मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडून कोरोनाची साथ आटोक्यात येणार नाही म्हणून मुंबई, पुण्याचा परिसर लष्कराच्या हवाली केला जाणार असल्याची आवई विरोधी पक्षाकडून उठवली जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात निर्बंध हळूहळू शिथिल करत नागरिकांना दिलासा दिला आहे. 22 मार्चपासून सलग 71 दिवसांच्या काहीशा जाचक वाटणाऱया लॉकडाऊनमुळे लोकांचा संयम सुटू लागला असतानाच सरकारने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे धाडस दाखवले आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ म्हणत सरकारने सावध आणि आश्वासक सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे.

Advertisements

कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्र विशेषत: मुंबईकडे लागले होते. ठाकरे सरकारचे पहिले वहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत असताना आणि सरकार स्थिरस्थावर होत असतानाच कोरोनाच्या धोक्याची घंटी वाजली. राज्य कारभार आणि प्रशासनाची जेमतेम तोंडओळख होत नाही तोच उद्धव ठाकरे यांच्यासमोर महाभयंकर कोरोनाचे आव्हान उभे राहिले. गुणाकार पद्धतीने वाढणाऱया कोरोनाचे संकट उद्धव ठाकरे योग्य पद्धतीने हाताळतील काय अशी अनेकांना शंका वाटत होती. कारण युरोप, अमेरिकेतील भयावह चित्र समोर येत होते. मात्र, गेल्या दोन-सव्वादोन महिन्यात कोरोनावर पूर्ण लक्ष पेंद्रीत करून ठाकरे यांनी शंका खोटी ठरवली. विरोधी पक्षाने चालवलेल्या आकांडतांडवाकडे  फारसे लक्ष न देता उद्धव ठाकरे शांतपणे काम करत राहिले आणि जनतेला दिलासा देत राहिले. परिणामी पेंद्राच्या आरोग्य पथकाने मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येच्या संदर्भात वर्तवलेले अंदाज आज खोटे ठरले आहेत. 30 एप्रिलपर्यंत मुंबईत कोरोनाचे तब्बल 42,604 तर 15 मेपर्यंत हाच आकडा 6 लाख 56 हजारांपर्यंत असू शकेल, असा धक्कादायक अंदाज पेंद्रीय पथकाने 20 एप्रिलच्या आसपास व्यक्त केला होता. हा अंदाज चुकला आणि आयोगाला मुंबईच्या मॉडेलची दखल घेत महाराष्ट्र सरकारचे कौतुक करावे लागले. हेच ठाकरे सरकारचे पहिले यश मानावे लागेल.

खरेतर कुणा कोविड 19 अर्थात कोरोना नामक विषाणूचे संकट जगावर येईल, हा विषाणू प्रचंड धुमाकूळ घालेल याची कुणालाही सुतराम कल्पना नव्हती. कोरोनाची साथ जितकी अनपेक्षित तितकीच ती अकल्पित होती. कोरोना नावाचा संसर्गजन्य आजार माणसाची हालचाल थांबवेल, व्यवहार ठप्प करेल हे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. तरीही चीनमध्ये प्रादुर्भाव झालेल्या कोरोनाच्या विषाणूने फेब्रुवारी-मार्च दरम्यान महाराष्ट्रात शिरकाव करून सर्वांच्या मनात धडकी भरवली. कोरोनाची साथ चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरण्यास वेळ लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकामागोमाग एक निर्णय घ्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रात मॉल, सिनेमागफहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय होत होता त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. महाराष्ट्र सरकारचे निर्णय पाहून दिल्लीला जाग आली आणि 22 मार्चपासून श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱया लॉकडाऊनची सुरुवात झाली.

कधीही न अनुभवलेल्या लॉकडाऊनचा पहिला फटका हातावर पोट असणाऱया वर्गाला बसला. या गरीब वर्गाच्या हृदय पिळवटून टाकणाऱया कहाण्या रोज टीव्हीच्या पडद्यावर दिसत असताना महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून स्वार्थी राजकारण सुरू केले गेले. संकट अस्मानी असो की सुलतानी, संकटाच्या काळात हातात हात घालून आणि खांद्याला खांदा लावून पक्षभेद विसरून काम करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र, या परंपरेला विरोधी पक्षाने छेद दिला. संकटात राजकारण करू नका असे सांगणाऱया भाजपने कोरोनात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. खरे म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीला 60 वर्ष होऊनही आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेविषयी फारसे गंभीर राहिलो नाही. त्याची किंमत आज आपल्याला मोजावी लागत आहे. कोरोनाच्या साथीमुळे आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आपल्या समोर आल्या. कोरोनाचे संकट नसते तर आरोग्य यंत्रणेतील उणिवा दुर्लक्षित राहिल्या असत्या. पण, कोरोनाने आपण कुठे आहोत आणि आपल्याला आरोग्याच्या क्षेत्रात किती काम करायचे आहे याची जाणीव करून दिली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील त्रुटींचे, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे भांडवल करून भाजपने ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाची हाक देणे योग्य नव्हते. भाजपची आंदोलनाची वेळ चुकली. विरोधी पक्षाने प्रश्न जरूर उपस्थित केले पाहिजेत. पण संकट काळात सरकारला मदत होईल, नागरिकांना दिलासा मिळेल अशा जबाबदारीनेही वागले पाहिजे. परंतु, सततच्या राजकीय कुरघोडय़ांमुळे लॉकडाऊन उठून जनजीवन पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा करणाऱया सर्वसामान्यांच्या मनात आणखी चीड निर्माण झाली. आजही मुंबई, पुण्यासारख्या महानगरात रोज शेकडो नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशावेळी लॉकडाऊनमुळे राज्याच्या रुतलेल्या अर्थचक्राला बाहेर काढून गती देणे तितकेच महत्त्वाचे होते. त्यामुळेच सरकारने टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. कोरोनाचा अपेक्षित गुणाकार रोखण्यात यश आल्याचा दावा सरकार करत असले तरी पुढची लढाई अधिक चिवटपणे लढावी लागणार आहे. कारण पावसाळा तोंडावर आहे. पावसाळय़ात ताप, सर्दी, खोकला अशा आजारांची साथ असते. त्यामुळे ठाकरे सरकारचा आगामी कालखंड आणखी आव्हानात्मक असणार आहे. लॉकडाऊनने जे कमावले ते अनलॉकडाऊनने गमावले असे घडू नये म्हणून नागरिकांना स्वयंशिस्तीने वागावे लागणार आहे. ही शिस्त आणि सरकारने घालून दिलेले नियम प्रत्येकाने पाळले तर आपण लवकरच कोरोनाला दूर ठेवू शकू..

प्रेमानंद बच्छाव

Related Stories

एका लग्नाची गोष्ट (1)

Patil_p

पाणिग्रहण मूळमाधवो

Patil_p

ऐकावे जनाचे….

Patil_p

पर्ससीन-पारंपरिक मच्छीमार संघर्ष वाढला!

Patil_p

आधी घोळला गोंडा, आता बंडाचा झेंडा!

Patil_p

सदैव अजिंक्मय राहणे!

Omkar B
error: Content is protected !!