तरुण भारत

हेरगिरीसाठी व्हॉट्स ऍपचा वापर

पाकिस्तानी हेरांची कबुली, लष्कराच्या कनिष्ठ अधिकाऱयांना भुलवण्याचा डाव

आयबीने उधळला डाव, देश सोडून जाण्याचा आदेश

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाकिस्तानी दुतावासातील दोन अधिकारी आणि एका चालकाला हेरगिरीच्या आरोपावरुन पकडण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांची विशेष शाखा आणि इंटलिजन्स ब्युरोने ही कामगिरी केली आहे. या हेरांकडील चौकशीमध्ये ते लष्करातील कनिष्ठ अधिकाऱयांना भुलवून सेनेच्या हालचालीची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. तसेच कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हेरगिरीसाठी व्हॉट्स ऍपचा वापर करत होते, अशी कबुली या हेरांनी दिली आहे.

भारताने पाकिस्तानकडे या घटनेचा निषेध नोंदवला असून तिघांनाही तातडीने देश सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. हेरगिरीच्या कारणावरुन पर्सन नॉन ग्रेटा (निष्काषित व्यक्ती) घोषित करण्यात आले आहे. हे दोन्ही अधिकारी पाकिस्तानी दुतावासामध्ये व्हिसा विभागात कार्यरत होते. तर या कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय संबंधामध्ये आणखीच कटुता निर्माण होणार आहे.

चोरलेल्या दस्ताऐवजांची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. जानेवारीपासून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती. भारताने त्याना 24 तासात देश सोडण्याचे आदेश दिले असून राजनैतिक पदाला शोभेसे वर्तन करण्यासह बजावले आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाने सुचित केल्यानंतर आबिद हुसेन आणि मोहम्मद ताहिर यांना करोलबाग परिसरात अटक करण्यात आली. ते कोणाकडून तरी लष्करी हालचालीविषय कागदपत्रे घेण्यास आले होते. तथापि अतिरिक्त आयुक्त ललित मोहन नेगी, हृदयभूषण नेगी यांच्या पथकाने या दोन अधिकाऱयांसह त्यांच्या चालकाला रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून गोपनीय कागदपत्रेही हस्तगत केली असून भारतीय असल्याची खोटी ओळखपत्रे बनवून ते खुलेआम फिरत असल्याचे आढळून आले. या दोघांनीही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याचे मान्य केले आहे.

गोपनिय कागदपत्रांच्या बदल्यात संबंधित व्यक्तीला काही रक्कम आणि आयफोन देण्याचे कबूल केले होते, असेही या हेरांनी चौकशीत सांगितले. अबिद हुसेन याने त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला व्हॉट्स ऍपचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. भारतीय तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी ही खेळी केली जात होती. तथापि यापैकी कोणालाच ते या यंत्रणाच्या रडारवर असल्याची कल्पना नव्हती. ती भारतीय व्यक्ती सेनादलातील आहे, असा त्यांचा समज होता. त्यांना हाताशी धरुन सेनेच्या हालचालींची माहिती मिळवण्याचा डाव होता. परंतु भारतीय यंत्रणांना आयएसआयच्या वरचढ ठरल्या आहेत. तथापि भारतीय सैन्याची गोपनिय माहिती मिळवण्याचा आयएसआयचा घातक डाव या कारवाईमुळे भारतीय गुप्तचर संस्थांनी उधळून लावला आहे. या पाकिस्तानी हेरांवर ऑफिशियल सिक्रेट कायद्यांतर्गत एफआयआरही नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान, पाकिस्तानने मात्र भारताची ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांचे कामकाज कमी केले जात असल्याचे म्हटले आहे. याआधीही 2016 साली पाकिस्तानच्या राजनैनिक अधिकाऱयाची हेरगिरीच्या कारणावरुन हकालपट्टी करण्यात आली होती.

Related Stories

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताकडून हालचाली सुरू

Rohan_P

शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई

Abhijeet Shinde

मंत्रिमंडळ विस्तारासाठी हायकमांडच्या सूचनेची प्रतीक्षा

Patil_p

सोने दरात घट ; चांदी दरात वाढ

Patil_p

पंजाब काँग्रेसला गळती, जोगिंदर यांचा आपप्रवेश

Patil_p

पालखीत बसून मतदानास जाणार गरोदर महिला

Patil_p
error: Content is protected !!