तरुण भारत

गोव्याला महासंकटातून वाचविण्यासाठी सज्ज व्हा !

आज विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत आणण्यासाठी गोंयकारांपुढे कठीण आव्हान आहे व हे आव्हान ते कितपत पेलतील, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

सत्तर दिवसांच्या लॉकडाऊननंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. गोवा राज्यातील वास्को मांगोरहिल भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने व कोरोनाचा सामूहिक प्रसार सुरू झाल्याचे निष्पन्न झाल्याने संपूर्ण गोव्यात सध्या खळबळ उडाली आहे. गोवा राज्यात कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय संकटात सापडलेले आहेत. नोकर कपात तसेच वेतन कपातीची टांगती तलवार सध्या कर्मचाऱयांवर आहे. सक्तीची रजा, पगाराविना रजेमुळे भविष्यात आर्थिक संकट वाढलेले आहे. अशा परिस्थितीत बहुतांश कुटुंबीयांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे. कोरोनाने ज्याप्रमाणे लाखो जीव घेतलेले आहे त्याचबरोबर राज्यातील आर्थिक व्यवस्थेचाही बळी घेतला आहे.  कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक स्थितीमध्ये आत्मनिर्भरता तसेच गोवा राज्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी गोवा सरकारबरोबरच सर्वांनी पावले उचलणे अत्यावश्यक ठरते.

Advertisements

लॉकडाऊन काळात राज्यातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली असल्याचे दिसून आले. लॉकडाऊन काळात राज्यातील गुन्हेगारीचा आलेख खाली आला, ही गोव्यासाठी जमेची बाजू आहे. गोवा पोलिसांचे सर्वच विभाग लॉकडाऊन काळातही सक्रियपणे काम करीत असल्यामुळे अमलीपदार्थ व्यवहार व विक्रीची प्रकरणेही घटली. मे महिन्याच्या अखेरीस मात्र खुनांची प्रकरणे तसेच आत्महत्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ चिंताजनक बाब म्हणावी लागेल.

लॉकडाऊन तालांवाने मात्र गोमंतकीय जनता मेटाकुटीला आली. दुचाकीवरून जाणाऱया सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती नाही, अशी घोषणा गोव्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केल्यानंतरही पोलीस तालांव देत राहिले. मात्र गोमंतकीय जनतेची तालांवाच्या नावाखाली गळचेपी करण्यात आली. मात्र या तालांवामुळे गोवा सरकारच्या तिजोरीत भर घालण्याचा प्रयत्न झाला. 

गोवा राज्याची विस्कटलेली आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी विविध क्षेत्रात आर्थिक स्रोत निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून कौशल्य विकासप्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. या संदर्भात पंचायत स्तरावर बैठका होत आहेत. विविध क्षेत्रातील तज्ञांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन होत आहे. आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, व्यवसाय विकसित करण्यासंबंधी या उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केले जाते. या विकासप्रणालीच्या माध्यमातून पंचायत क्षेत्रातील समाजसेवी संस्था, महिला मंडळे, महिला स्वयंसाहाय्य गटाद्वारे विविध उपक्रम राबवून आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हा प्रयोग यशस्वी होऊन गोमंतकीयांनी आर्थिक उन्नती साधावी, अशी मनोकामना व्यक्त करूया. गोव्यातील काही भागांमध्ये पाण्याचा साठा समाधानकारक असल्याने मोठय़ा प्रमाणात भाजी लागवडीसाठी संधी आहेत. भाजी लागवडीसाठी संबंधित अधिकाऱयांनी प्रोत्साहन देणे अगत्याचे ठरते. तसेच भाजी लागवड केल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे सरकारचे कर्तव्य आहे. उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी तर गोवा राज्यातील पडीक शेती लागवडीखाली आणणार, असा निर्धार केला आहे. यात युवावर्गाला सहभागी करून घेण्याच्यादृष्टीने विविध कृषी उपक्रम राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. गोव्यात कृषी क्रांती घडविण्याच्यादृष्टीने त्यांनी उचललेली पावले यशस्वी ठरोत, अशीच शुभेच्छा द्यावी लागेल.  दूध उत्पादन, ग्रामीण पर्यटन अशा व्यवसायानाही चांगला वाव असून त्यादृष्टीनेही प्रयत्न होणे आवश्यक ठरते. 

गोंयकार म्हणजे सुशेगाद म्हणून गणला जातो. त्यामुळे तो अनेकदृष्टय़ा परप्रांतियांवर अवलंबून आहे. आज गोवा राज्यातील सगळे व्यवसाय परप्रांतियांच्या हातात आहेत. कष्टाची कामे केवळ परप्रांतीय मजूरवर्ग करीत असल्याने गोंयकारांची त्यांच्यावरच भिस्त आहे. परंतु आज लॉकडाऊनमुळे बहुतांश परप्रांतियांनी आपला गावच न्यारा म्हणून आपले घर गाठले आहे. त्यामुळे गोवा राज्याचे पुढे होणार काय अशी विवंचनाही आहे. एकेकाळी गोवा म्हणजे जणू कुवेत असे परप्रांतियांना वाटायचे. गोंयकारांना ते आदराने ‘पात्रांव’ म्हणायचे. परंतु लाखोंच्या संख्येने मजूरवर्ग आपल्या गावी गेल्याने ‘पात्रांव’ हा सूर कुठेतरी हरविल्याचे दिसून आले. गोव्यात आता मजुरांची कमतरता जाणवू लागली आहे. पणजीच्या महापौरांनी तर पणजी महानगरपालिकेसाठी विविध विकास कामांसाठी मजूरवर्ग पाहिजे म्हणून आवाहन केले आहे. या आवाहनाला गोमंतकीय मजूर कितपत प्रतिसाद देतील, हे आगामी काळात पहावे लागेल.

आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी काही गोमंतकीयांनी लहान-मोठे व्यवसाय सुरू केले असले तरी यात ते कितपत यशस्वी होतील, याबाबत साशंकता आहे. मात्र यासाठी स्थानिकांनी त्यांना प्रोत्साहन देणे अगत्याचे ठरते. कोरोनाच्या साम्राज्यात गेले बरेच आठवडे गोंयकार घरकोंबडे बनलेले आहेत. आधीच सुस्तावलेला गोंयकार आपापल्या व्यवसायात पुन्हा गरूडभरारी घेईल काय असा सवाल उपस्थित होत आहे. कोरोनाचे साम्राज्य एवढय़ात संपुष्टात येणार, लयाला जाणार असे वाटत नाही, मात्र मास्क वापरणे तसेच हात वरचेवर साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करणे व सामाजिक अंतर राखणे हे करोनाव्रत यापुढे चालू राहील, अशी शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे पर्यावरण शुद्ध राहिले, असा दावा पर्यावरणप्रेमी करीत आहे. त्यामुळे अधूनमधून लॉकडाऊन व्हावा, अशी इच्छाही ते व्यक्त करतात. आज लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरून येणे आणखीन काही वर्षे तरी शक्य नाही. त्यामुळे लॉकडाऊन असावा, अशी भावना व्यक्त करणे म्हणजे चेष्टा करण्याजोगी आहे. आज विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत आणण्यासाठी गोंयकारांपुढे कठीण आव्हान आहे व हे आव्हान ते कितपत पेलतील, याबाबत शंका उपस्थित होत आहे.   गोवा हे सुंदर, सोबित राज्य म्हणून गणले जाते. कोरोनाच्या महामारीमुळे या राज्याचे हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी गोवा सरकारबरोबर संबंधित यंत्रणा तसेच जनतेने कार्यप्रवण राहणे अत्यावश्यक ठरते. गोवा म्हणजे  पर्यटकांच्यादृष्टीने स्वर्ग. या गोव्याची बिघडलेली पर्यटनव्यवस्था तसेच अन्य व्यवसाय पुन्हा रूळावर आणणे गोवा सरकारची जबाबदारी ठरते.

                        -राजेश परब

Related Stories

येडिंपाठोपाठ बोम्माईंच्या मागेही नष्टचर्य

Amit Kulkarni

दिधलीं द्रव्यें तें ऐकें

Patil_p

‘राज’ करणारी राणी

Patil_p

शिकारीच्या विळख्यात घोरपड

Patil_p

काँग्रेसला दिलासा!

Patil_p

विद्यार्थ्यांबरोबरच राजकारण्यांचीही ‘शाळा’ घेणे गरजेचे

Patil_p
error: Content is protected !!