तरुण भारत

केवढे हे क्रौर्य

पहाटे दूध, वर्तमानपत्रे आणायला जाताना, किंवा एरव्ही त्या बाजूने फिरकताना. तिला आणि तिच्या मैत्रिणींना त्या दुकानात अनेकदा पाहिले असेल. दुर्लक्ष करून पुढे गेलो. आणि नेमकी तिला मी तेव्हा ओळखू शकलो नसतो, आजही ती तीच आहे का हे मी सांगू शकणार नाही. तिचं नाव किंवा तिच्या मैत्रिणींची नावं मला ठाऊक असण्याचं कारण नाही. अनेकदा तिथून जाताना त्यांचा कलकलाट कानांवर येई. मी कधी लक्ष दिलं नाही. 

लॉकडाऊनआधीची रात्र. लोकांना कुणकुण लागली होती. नक्की ठाऊक नव्हतं. रात्रीची जेवणं उरकून आम्ही पती-पत्नी पाय मोकळे करायला चाललो होतो. अचानक त्या दुकानाचा मालक समोर आला आणि त्यानं विचारलं, ‘उद्यापासून कर्फ्य लागणार, सगळे व्यवहार बंद होणार असं म्हणतात, ते खरं आहे का?’ आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही त्याला तसं सांगितलं. आज दुकान शांत होतं. तिचा आणि तिच्या मैत्रिणींचा अजिबात आवाज येत नव्हता. कदाचित त्या दुकानात नसतीलही.

Advertisements

दुसऱया दिवशी कर्फ्य होता. लॉकडाऊन जाहीर झाला. रोजची घडी बदलली. प्राधान्ये बदलली. घराबाहेर पडणे बंद झाले. सरकारच्या मते जीवनावश्यक असलेल्या वस्तू जिथून जशा मिळाल्या तिथून तशा घेतल्या. त्या गडबडीत मोबाईल फोनची काच बदलायची राहून गेली. चष्मा तुटायला आलेला होता, तो दुरुस्त करणे किंवा नवा चष्मा घेणे राहून गेले. वाचनालयातून पुस्तके बदलून आणायची होती. बिछान्याला खिळलेल्या आईला रोज लागणाऱया काही वस्तू संपत आल्या होत्या. जीवनावश्यक नसलेल्या अशा अनेक गोष्टींची बेगमी करायचे राहून गेले. सकाळी दूध खात्रीपूर्वक मिळेनासे झाले. जेव्हा मिळेल तेव्हा आम्ही अर्धा लिटर जादा दूध घेऊन जपून ठेवू लागलो. वर्तमानपत्रे बंद झाली. मोबाईलवर त्यांच्या पीडीएफ वाचू लागलो. पण यातले काहीच महत्त्वाचे नाही.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तो दुकानदार मला कधीच भेटला-दिसला नाही. बहुधा कुठेतरी अडकून पडला असेल. अर्थातच त्याचे दुकान बंदच झाले असणार.

परवा पहाटे तिथून दूध आणताना दुकानासमोरचा कुलूपबंद जाळीचा पिंजरा दिसला. ती हो बहुधा तीच असेल, किंवा नसेल-आणि तिची मैत्रीण… अशा दोन्ही कोंबडय़ा एकमेकींना बिलगून मरून पडल्या होत्या. मास्कमुळे मला दुर्गंधी जाणवली नाही. पण डोळे भरून आले. तो माझा बावळटपणा असेल.

Related Stories

देशातल्या वाघांच्या शिकारीचे प्रस्थ

Patil_p

अबकारी शुल्कात कपात करण्याची मागणी

Patil_p

काँग्रेसला दिलासा!

Patil_p

पं. दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ संघटक

Patil_p

तत्काळ मोहिलें अनिरुद्धा

Omkar B

ठाकरे-पवारांच्या नातवांवर फोकस!

Patil_p
error: Content is protected !!