तरुण भारत

रोहिंग्याचा शरणार्थीचा कोरोनामुळे मृत्यू

बांगलादेशातील शरणार्थी शिबिरात गंभीर संकट : जगभरात 64,74,226 जणांना महामारीची लागण

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 64 लाख 74 हजार 226 वर पोहोचला आहे. यादरम्यान एकूण 30 लाख 83 हजार 658 बाधितांनी महामारीवर मात करण्यास यश मिळविले आहे. कोरोना संसर्गामुळे 3 लाख 82 हजार 914 जणांचा मृत्यू ओढवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका न्यायालयाने टाळेबंदीच्या नव्या नियमांना घटनाबाहय़ आणि अवैध ठरविले आहे. नवे नियम निर्बंधांमध्ये दिलासा देण्याच्या पुढील टप्प्यांपर्यंत जाहीर करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या गॉटेंग डिव्हिजनने नियमांमध्ये  दोन आठवडय़ांत सुधारणा करण्याचा निर्देश सरकारला दिला आहे. तर बांगलादेशातील रोहिंग्यांच्या शरणार्थी शिबिरात संसर्गाने पहिला बळी घेतला आहे.

Advertisements

ब्राझील : स्थिती नियंत्रणाबाहेर

ब्राझीलमध्ये मागील 24 तासांत एकूण 1,262 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील बळींचा एकूण आकडा आता 31,309 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार दिवसभरात सुमारे 29 हजार नवे बाधित सापडले आहेत. देशात आतापर्यंत 5,58,237 रुग्ण सापडले आहेत. साओ पाऊलो या शहरात संसर्ग अधिक प्रमाणात फैलावला आहे. शहरात दिवसभरात 327 नवे बाधित आढळले आहेत. ब्राझीलमधील स्थिती नियंत्रणात न आल्यास तेथे महामारी अत्यंत वेगाने वाढू शकते असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

पाकिस्तान : मंत्र्याचा मृत्यू

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मंत्री हाजी गुलाम मुर्तझा बलोच यांचा मंगळवारी संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. प्रांतीय सरकारच्या प्रवक्त्याने यासंबंधी माहिती दिली आहे. पाकिस्तानात टाळेबंदी हटविल्यानंतर स्थिती वेगाने बिघडली आहे. देशात आतापर्यंत 80 हजार 463 बाधित सापडले असून एकूण 1,688 जणांचा मृत्यू झाला आहे. सिंध प्रांतात सर्वाधिक संकट निर्माण झाले असून तेथे 31 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.

इटली : प्रवासबंदी हटविली

इटलीने युरोपीय देशांच्या नागरिकांवरील प्रवासबंदी हटविली आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. तसेच युरोपमधून येणाऱया लोकांना क्वारंटाइन केले जाणार नाही. तर देशांतर्गत प्रवासावरील बंदीही हटविण्यात आली आहे. बुधवारपासून लोकांना देशात कुठेही जाण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारकडून कोरोना प्रतिबंधासाठी लादण्यात आलेले निर्बंध हटविण्याचा हा तिसरा टप्पा आहे.  

अमेरिकेत रुग्ण वाढले

जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार अमेरिकेत 24 तासांदरम्यान 20 हजार 461 नवे बाधित सापडले आहेत. तर याच कालावधीत 1,015 जणांचा मृत्यू झाला होता. बाधितांचा आकडा आता 18,81,256 वर पोहोचला असून 1,08,062 जण दगावले आहेत. कृष्णर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याच्या हत्येनंतर होत असलेल्या निदर्शनांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे स्थिती अधिकच बिघडणार असल्याचे विधान अमेरिकेच्या सर्जन जनरलने केले आहे.

सिंगापूर सरकारची तयारी

सिंगापूरच्या स्थलांतरित कामगारांमध्ये संसर्ग फैलावल्यावर आता तेथील सरकारने नवी डोरमेट्रीज निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या डोरमेट्रीजमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक चांगल्या सुविधा असतील, विशेषकरून स्वच्छतेची खबरदारी घेतील जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सिंगापूरमध्ये 60 हजार नव्या डोरमेट्रीज निर्माण केलया जाणार आहेत. त्या पुढील काही महिन्यांमध्ये त्यांची संख्या 1 लाख होणार आहे.

वुहान : 99 लाख चाचण्या पूर्ण

वुहान शहरातील 99 लाख लोकांची चाचणी करण्यात आली असून कुठलाच नवा बाधित सापडला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. परंतु 300 लक्षणेरहित बाधित सापडले आहेत. चीनमध्ये अशा प्रकरणांची नोंद बाधितांमध्ये केली जात नाही. टाळेबदी हटविल्यानंतर वुहान शहरात नवे रुग्ण सापडले होते. याच कारणामुळे प्रशासनाने 14 मेपासून शहराच्या 1.1 कोटी लोकसंख्येच्या चाचणीची मोहीम हाती घेतली आहे.

बांगलादेशात संकट वाढले

बांगलादेशात असलेल्या जगातील सर्वात मोठय़ा शरणार्थी शिबिरात मंगळवारी पहिल्या रोहिंग्या शरणार्थीचा मृत्यू झाला आहे. मृताचे नाव मात्र समजू शकलेले नाही. कॉक्स बाजारानजीक निर्माण झालेल्या या शिबिरात लाखो रोहिंग्या शरणार्थी राहतात. मागील महिन्यात या शिबिरात पहिला रुग्ण आढळून आला होता, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे.

चिली : 3,500 नवे रुग्ण

दक्षिण अमेरिका खंडातील चिली देशात कोविड-19 चा प्रकोप वाढतच चालला आहे. तेथील बाधितांचे प्रमाण 1,08,686 झाले आहे. तर 1,188 जणांचा मृत्यू ओढवला आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 3,527 नवे रुग्ण सापडले असून 75 जणांना जीव गमवावा लागल्याची माहिती आरोग्य मंत्री जॅमी मनालिक यांनी दिली आहे. राजधानी सँटियागो समवेत अन्य महानगरांमध्ये 5 जूनपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

ब्रिटन : कृष्णवर्णीयांना धोका

एका अहवालानुसार ब्रिटनमध्ये कृष्णवर्णीय, आशियाई आणि अल्पसंख्याक वंशीय लोकांना महामारीमुळे जीव गमाविण्याचा धोका अधिक आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने हा अहवाल सादर केला आहे. काही लोकांना या महामारीचा अधिक धोका आहे. स्थिती समजून घेण्यासाठी लोकांना वाचविण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले आहे.

इस्रायल : पुन्हा नवे रुग्ण

कोविड-19 वर बऱयाच अंशी नियंत्रण मिळविणाऱया निवडक देशांमध्ये इस्रायलचा समावेश आहे. परंतु इस्रायलमध्ये मागील 24 तासांदरम्यान 116 नवे बाधित सापडले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत एकूण 17 हजार 285 बाधित आढळले आहेत. तर मृतांचा आकडा 287 झाला आहे.

Related Stories

ट्रम्प यांच्याकडून कोरोना मदत निधी विधेयकावर स्वाक्षरी

datta jadhav

‘जॉन्सन ॲन्ड जॉन्सन’च्या लसीचे भारतात उत्पादन?

datta jadhav

चीनमधील मानवाधिकाराबद्दल संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता

Amit Kulkarni

आगामी 4 ते 6 महिन्यात कोरोनाचा प्रकोप; परिस्थिती अधिक गंभीर होणार

Rohan_P

चीनमध्ये डॉ.कोटणीस यांच्या स्मृतींना उजाळा

Omkar B

बेल्जियम : 25 जणांना अटक

Omkar B
error: Content is protected !!