तरुण भारत

वास्कोत ताबडतोब पूर्ण लॉकडाऊन करावे

आमदार, नगरसेवकांचा आग्रह : सरकारच्या दुर्लक्षामुळे तीव्र नाराजी

मांगोरहिलमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वास्कोत ताबडतोब पूर्ण लॉकडाऊन करावे, अशी मागणी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा तसेच अनेक नगरसेवकांनी केली आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.

बुधवारी सकाळीच मांगोरहिलच्या वस्तीतील चाळीस नागरिकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याची बातमी वास्कोत वाऱयासारखी पसरली. अशा रूग्णांमध्ये आणखी वाढ होणार असल्याची शक्यताही व्यक्त होऊ लागली. या वृतामुळे वास्को परिसरातील वातावरण क्षणात बदलले. कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाल्यास पूर्ण वास्को लॉकडाऊन करण्यात येईल असे वक्तव्य स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मंगळवारी केले होते.

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा आणि मुरगावच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी वास्को परिसर संकटात असल्याचे स्पष्ट करून तातडीने लॉकडाऊन जाहीर करावे अशी मागणी केली आहे. मात्र, सरकारने लॉकडाऊनचा निर्णय किंवा वास्कोच्याबाबत अन्य वेगळा निर्णयही संध्याकाळपर्यंत घेतला नाही. परंतु वास्कोत 40 कोरोना रूग्ण आढळल्याचे समजताच आमदारांनी पुन्हा एकदा आपली मागणीवर जोर दिलेला असून मुरगाव पालिका नगरसेवकांनीही त्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्र्यांकडे आपण हा विषय मांडलेला आहे, असे आमदारांनी सांगितले.

नगरसेवकांचेही मागणीला समर्थन

मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत तसेच नगरसेवक क्रितेश गावकर, लाविना डिसोजा यांनीही लॉकडाऊनची जोरदार मागणी केलेली आहे. मुरगावचे सर्व नगरसेवक  लॉकडाऊनचे समर्थन करीत असून परीस्थिती हाताळण्यासाठी लोकांबरोबर राहू असे नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊनच्या अफवेने उडाला गोंधळ

आजपासून वास्कोत लॉकडाऊन  सुरू होईल अशी शक्यता गृहीत धरून लोकांनी व्यवहारांना सुरूवात केली. त्यातच सोशल मीडियावरुन अफवांचाही मारा सुरू झाला. संध्याकाळी पाच वाजल्यापासून दि. 8 पर्यंत म्हणजेच पाच दिवस वास्कोत लॉकडाऊन राहील अशी अफवा पसरल्याने वास्को शहरात एकच गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ नंतर हळुहळु वास्को परिसरातील बायणा, सडा व इतर भागातही पसरला. खरेदीसाठी निर्माण झालेला हा गोंधळ संध्याकाळी उशिरापर्यंत सुरूच होता.

खरेदीसाठी झुंबड उडाल्याने ग्राहकांची लुट

जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी लोक मोठय़ा संख्येने बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरात गर्दी उसळली. वास्कोतील भाजी मार्केट व इतर भागात किराणा माल व फळे तसेच भाजी खरेदीसाठी झुंबड दिसून आली. या गर्दीवर कुणाचेही नियंत्रण नव्हते. लॉकडाऊनच्या अफवेमुळेच हा सारा प्रकार घडून आला होता. उद्या शुक्रवारी वटपौर्णिमा असल्यानेही हिंदु कुटुंबीयांची धांदल उडाली. बाजार बंद राहणार या भितीने त्यांनीही बाजारात धाव घेतली. याचा परिणाम म्हणून खरेदीसाठी दुकानदारांवर एकच ताण पडला. काही दुकानांतील मालही संपला. त्यामुळे त्यांनी दुपारनंतर आपली दुकानेच खोलली नाहीत.

काही व्यापाऱयांनी ग्राहकांना लुटल्याच्या तक्रारी

विशेष म्हणजे ग्राहक तुटून पडू लागल्याने काही व्यापाऱयांनी ग्राहकांना लुटायला सुरवात केली. त्यामुळे अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांना साहित्य खरेदी करावे लागले. हा प्रकार संध्याकाळी उशिरापर्यंत चालूच होता. त्यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकले नाही. वास्कोत कोरोनाने संवेदनशील परिस्थिती निर्माण केलेली असतानाही गोंधळ आणि गर्दीमुळे चिंतादायक परिस्थिती दिसून आली. लोकांना कोणत्याही नियमांचे भान नव्हते.

पाऊस आणि खंडीत वीज पुरवठय़ानेही केले त्रस्त

वास्को शहरात खरेदीसाठी झुंबड उडालेली असतानाच पावसानेही अधून मधून जोरदार वृष्ठी केली. त्यामुळे भरपावसात लोकांना बंदच्या भितीने व्यापार करावा लागला. शहरात व परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी वीज गायब होण्याचेही प्रकार घडले. काही ठिकाणी संध्याकाळी उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाला.

Related Stories

पर्यटन धोरण त्वरित मागे घ्यावे गोवा फॉरवर्डची मागणी

Omkar B

बाबू आजगावकर यांच्या वाढदिनी तुये येथील इस्पितळातील रुग्णांना फळे वाटप

Patil_p

तुमचा फोन खाली ठेवा आणि डिजिटल मुक्ती मिळवा : दिग्दर्शक जेन्स म्युरर

Shankar_P

सरकारला सल्ला देण्यापेक्षा जनतेसाठी काम करा फोंडा भाजपा मंडळाचा सुदिन ढवळीकरांना सल्ला

Omkar B

आंबावलीतही कोरोनाचा रुग्ण

Omkar B

राज्यात ‘लॉकडाऊन’चे आशादायी परिणाम

tarunbharat
error: Content is protected !!