तरुण भारत

तब्बल 29 हजार ग्राहक अनिश्चित काळासाठी अंधारात

प्रतिनिधी/ दापोली

दापोलीवर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने महावितरणचे तब्बल 950 विजेचे खांब नादुरुस्त झाले आहेत. यामुळे दापोली शहर व तालुका मिळून तब्बल 29 हजार ग्राहक अनिश्चित काळासाठी ’ब्लॅकआऊट’च्या नव्या संकटात सापडले आहेत. शुक्रवारीही महावितरणचे अधिकारी ग्रामीण भागात पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ग्रामीण भागातील रस्ते अद्याप बंद असल्याने महावितरणला सर्व्हे करायला अतोनात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  बुधवारी सकाळी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने दापोलीत महावितरणचे प्रचंड मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये एलटी म्हणजे कमी दाबाचे सुमारे 700 पोल व एचटी म्हणजे मोठय़ा दाबाचे सुमारे 250 विजेचे खांब झाडे पडून निकामी झाले आहेत. दापोली शहरात महावितरणचे 10 हजार व ग्रामीण भागात 19 हजार ग्राहक आहेत. हे सर्व ग्राहक आज पूर्णपणे अंधारात आहेत. तसेच या 950 विजेच्या खांबांना जोडणाऱया ताराही अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. तसेच डिओ व कंडक्टरचे नुकसान झाले आहे. या सर्वांची मोजदाद करण्याचे काम शुक्रवारीही सुरू होते. यासाठी महावितरणने त्यांच्याकडे असणारे 45 वायरमन व 3 कामगार समूहांना ठेका पद्धतीवर काम करण्यासाठी नेमलेले 35 कामगार काम करत आहेत. तसेच गुरुवारी या सर्व कामगारांनी दापोली शहरात येणाऱया मुख्य वाहिनीचे काम रात्री 10 वाजता अथक प्रयत्नांनी पूर्ण केले. यामुळे दापोलीच्या काळकाई कोंड येथील कार्यालयात रात्री 10 वाजता वीज पुरवठा काही काळासाठी सुरू झाला. मात्र यानंतर पुन्हा पाऊस व वाऱयाचा वेग वाढल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा पुन्हा खंडित झाला. हा वीज पुरवठा कुठे खंडित झाला आहे, हे पाहण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून महावितरणचे कामगार दापोली ते खेड ही पूर्ण वीज जोडणी जंगल मार्गातून तपासण्याचे काम करत होते.

   950 पोल निकामी झालेले असताना यो 33 केव्ही म्हणजे मुख्य वीज वाहिनीच्या 8 खांबांचाही समावेश आहे. तसेच 20 डीपी स्ट्रक्चरही पूर्णपणे निकामी झाले आहे. दापोली महावितरणकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दुरुस्तीसाठी साधनसामुग्री उपलब्ध नाही. दापोली कार्यालयाकडे यापैकी केवळ 10 टक्के एवढीच साधनसामुग्री उपलब्ध आहे. उर्वरित साधनसामुग्री दापोलीला तत्काळ मिळावी, यासाठा दापोली कार्यालयातून रत्नागिरीत तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ही साधनसामुग्री उपलब्ध होण्यासाठी 2 दिवस लागणार आहेत. 

 तालुक्यावर आलेल्या या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी महावितरण’ला 10 कामगार मिळून 100 माणसांची आवश्यकता आहे. दापोली तालुक्याचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कुमक मिळावी म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. मात्र ही मागणी अद्याप प्रतीक्षेत आहे. दापोलीत महावितरणचे दोन विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या विभागात ग्रामीण, शहर दापोली, दाभोळ, हर्णे हे भाग येतात. तर दुसऱया विभागात कुडावळे, देगाव, वाकवली, ग्रामीण दोन व ग्रामीण तीन आधी भाग येतात. या प्रत्येक भागामध्ये विजेचे खांब, तारा व डीपीचे नुकसान झाले आहे. केळशीकडे जाणारा रस्ता अद्यापही बंद असल्याने तेथील नुकसानीचा निश्चित आकडा अद्याप महावितरणच्या दापोली कार्यालयाला प्राप्त झालेला नाही.

   दापोलीला 2 वाहिन्यानी खेड येथून वीज पुरवठा करण्यात येतो. तो गुरुवारी रात्री काही वेळासाठी सुरळीत करण्यात आला होता. मात्र आता तो पुन्हा बंद पडल्याने दापोली शहराचा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी चार दिवस लागतील, अशी माहिती महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता अर्जुनकुमार मोहिते यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. तसेच तालुक्यातील अंतर्गत भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी साधनसामुग्री वेळेत उपलब्ध झाली व मनुष्यबळही वरिष्ठ कार्यालयाने वेळेत पुरवले तर उर्वरित दापोलीचा वीज पुरवठा 10 ते 15 दिवसात सुरळीत करण्याचा विश्वासशी त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता सायनेकर, खेड येथील कार्यकारी अभियंता धारगे व दापोलीचे प्रभारी कार्यकारी अभियंता अर्जुनकुमार मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शाखेत डी. पी. पाटील, दाभोळ शाखेत अभियंता अभिजित बावडेकर, हर्णे शाखेत अभियंता नेहा मेधे, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश कांबळे, वाकवली शाखा अभियंता केळकर, खातू लाईनमन, मनोहर गिरी, अमित कांबळे, पारधी, धनावडे, संजय फडके व त्यांचे सहकारी दापोली तालुक्याचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. मात्र पावसामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यात त्यांना व्यत्यय येत आहे.

Related Stories

आणखी 5 जणांना डिस्चार्ज

Patil_p

गुहागर, चिपळूण क्रीडा संकुलांची प्रलंबित कामे महिनाभरात

Patil_p

जिह्यात कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावला 38 नवे रूग्ण 3 जणांचा मृत्यू

Patil_p

रत्नागिरीत २४ तासांत १०२ नवे रुग्ण तर ५ मृत्यू

Shankar_P

साखरप्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ

Patil_p

राजापुरात 16 जण विलगीकरण कक्षात

Patil_p
error: Content is protected !!