तरुण भारत

रात्रीच्या निरव शांततेत ‘जीवघेणा लपंडाव’

‘हत्ती’एवढय़ा संकटातून बचावलेल्या तिघा ग्रामस्थांची आपबिती : मोरीच्या पाईपमधूनही बाहेर खेचण्याचा हत्तीकडून प्रयत्न

तेजस देसाई / दोडामार्ग:

Advertisements

मोर्ले येथे रानटी हत्तीने युवकांच्या केलेल्या पाठलागाची घटना ताजी असतानाच मोर्लेजवळील केर येथे तीन ग्रामस्थांना हत्तीपासून बचावासाठी तब्बल तीन तास पुलाच्या पाईपमध्ये बसून काढावे लागल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. तिथेही हत्तीने सोंड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ नि केवळ दैव बलवत्तर म्हणूनच तिघेही सुखरुप घरी पोहोचले.

केर गावातील जंगलात गेल्या महिनाभराहून अधिक काळ रानटी हत्तीचे वास्तव्य आहे. कधी मादी व छोटे हत्ती, तर कधी टस्कराचा वावर असतो. बागायतीचे  नुकसान सुरूच आहे. मात्र वन विभागाला सातत्याने सांगणार तरी काय? नुकसान होणाऱया झाडांमध्ये साग, फणसही असतात. पण वन विभागाच्या निकषात ते येत नसल्यामुळे अनेकजण भरपाईपासून वंचितही राहत आहेत. एकीकडे हे आर्थिक संकट सोसावे लागत असताना तीन ग्रामस्थांवर हत्तीने चाल करण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विनायक देसाई, सचिन देसाई व सदा देसाई यांनी हत्तीच्या पाठलागाचा हा जीवघेणा थरार अनुभवला.

यातील प्रत्यक्षदर्शी विनायक देसाई यांनी सांगितले की, ‘केर गावाच्या बाजूला भेकुर्ली गाव आहे. तिथ लॉकडाऊनमुळे एस. टी. सेवा बंद आहे. तेथील ग्रामस्थ हे गावात आले होते. त्यांच्याकडे बाज़ारात खरेदी केलेले सामान व सुमारे तीस किलो खत होते. त्यामुळे दोन दुचाकी घेऊन आम्ही त्यांना सोडण्यासाठी भेकुर्लीला गेलो होतो. तेथून परतत असताना रात्री सुमारे साडेदहा वाजता केर-पैलाड येथे उतारावर फणसाच्या झाडाखाली हत्ती उभा होता. दुचाकीच्या लाईटचा झोत पडताच त्याने चित्कारत पाठलाग करण्यास सुरुवात केली. आम्ही गाडय़ा तशाच टाकत जवळील पूल कम मोरीच्या पाईपमध्ये जीव मुठीत धरून दडून बसलो. कारण त्यावेळी तोच पर्याय आमच्यासमोर होता. दरम्यान, हत्तीची चाहूल नसल्याने काही वेळाने पुन्हा गाडय़ांकडे गेलो. तेव्हा पुन्हा या हत्तीने पाठलाग केला. असे एकदा नव्हे, तब्बल तीनवेळा घडले. हत्ती तिथेच थांबून असायचा. तिसऱयावेळी तर ज्या पुलात दडलो होतो, तिथे येत हत्तीने मोरीमध्ये सोंड घालत चित्कार केला. त्यावेळची आमची स्थिती ‘सगळं काही संपलं’ अशीच काहीशी होती. मात्र तीन पाईप लांबीची मोरी असल्याने व मध्यभागी थांबल्याने आम्ही वाचलो. काही वेळाने हत्ती निघून गेला. पुढे जात हत्तीने एका आंब्याची फांदी तोडल्याचा आवाज आल्यावर आम्ही धाडस करीत बाहेर आलो व कशाबशा गाडय़ा घेऊन गाव गाठला.’

हा प्रकार सांगतानाही देसाई यांच्या अंगावर रोमांच उमटत होते. यातील विनायक देसाई यांनी आपली चप्पल दुसऱया दिवशी घटनास्थळी जाऊन आणली. हत्ती बिथरला असून वाहनांची किंवा बॅटरीची लाईट दिसल्यावर तो अधिक संतापतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Related Stories

सर्व अधिकाऱयांचे रिपोर्ट निगेटिव्ह

NIKHIL_N

वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांची मोहीम

NIKHIL_N

चिपळूण नगराध्यक्षांची उच्च न्यायालयात धाव!

Patil_p

‘बांधकाम’च्या वरिष्ठ लिपिक बडतर्फ

Patil_p

मुंबईतून चालत येणाऱया 34 जणांना पोलिसांनी अडवले!

Patil_p

गुहागर तालुक्यात सडे जांभारी येथील गरोदर महिलेला कोरोना

triratna
error: Content is protected !!