तरुण भारत

ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळा : चीन

कोरोना संसर्गामुळे वंशद्वेष वाढल्याचा दावा : ऑस्ट्रेलियाचे प्रत्युत्तर : जगभरात आतापर्यंत 68,69,136 बाधित 

जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 68 लाख 69 हजार 136 वर पोहोचला आहे. तर 33,63,594 बाधितांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. याचदरम्यान चीनने स्वतःच्या नागरिकांना ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. चीनच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने नागरिकांना इशारा देत कोरोना विषाणूमुळे ऑस्ट्रेलियात चिनी आणि आशियाई लोकांच्या विरोधात वंशद्वेष आणि हिंसाचार वाढल्याचा दावा केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेल्या चिनी वंशीयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचे पर्यटन मंत्री सायमन बर्मिंघम यांनी चीनच्या या इशाऱयाला प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात यशस्वी बहुसांस्कृतिक स्थलांतरित समाज असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

Advertisements

दक्षिण आशियाला धोका

दक्षिण आशियाच्या अधिक लोकसंख्या घनता असलेल्या क्षेत्रांमध्ये कोविड-19 मोठय़ा प्रमाणावर फैलावण्याचा धोका आहे. दक्षिण आशियात केवळ भारतच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान आणि या क्षेत्रातील अन्य देशांमध्ये महामारी अद्याप मोठय़ा प्रमाणावर फैलावलेली नाही, परंतु असे घडण्याचा धोका आहे. दिसून येत असलेल्या चित्रानुसार स्थिती कधीही धोकादायक ठरू शकते असे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन आरोग्य सेवा संचालक मायकल रयान यांनी काढले आहेत.

चिली : 4,207 नवे रुग्ण

चिनीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मागील 24 तासांत तेथे 4,207 नवे बाधित सापडले आहेत. देशातील रुग्णसंख्या आता 1,22,499 वर पोहोचली आहे. 24 तासांदरम्यान बळींचा आकडा 92 ने वाढला आहे. देशातील मृतांचा आकडा आता 1,448 वर पोहाचला आहे. देशात 1,521 रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून 1,291 बाधित व्हेंटिलेटरवर आहेत. तर 337 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मेक्सिकोतही स्थिती बिकट

दक्षिण अमेरिकेत संसर्ग अत्यंत वेगाने फैलावत आहे. ब्राझील आणि पेरूनंतर आता मेक्सिकोतही स्थिती बिघडू लागली आहे. 24 तासांमध्ये मेक्सिकोत 4,346 नवे बाधित सापडले असून 625 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णांचा एकूण आकडा आता 1,10,026 झाला आहे. तर मृतांचे प्रमाण 13,170 झाले आहे. महामारी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसू लागल्याचा दावा सरकारने केला आहे. मेक्सिकोतही हिंसाचार सुरू आहे. 

निदर्शनांमुळे धोका

कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर होत असलेल्या निदर्शनांमुळे सरकारच्या कोरोना संकटासंबंधी अडचणी वाढल्या आहेत. निदर्शनांमध्ये सहभागी लोकांशी न्यूयॉर्कचे स्थानिक प्रशासन लवकरच संपर्क साधू शकते. अमेरिकेत न्यूयॉर्क प्रांतातच सर्वाधिक कोरोना संकट दिसून आले आहे. प्रशासन लवकरच काही नवी चाचणी केंद्रे सुरू करणार असून तेथे प्रतिदिन 20 हजार चाचण्या होणार असून त्याचा अहवाल त्याच दिवशी मिळणार आहे.

सौदीत कठोर निर्बंध

सौदी अरेबियाच्या जेद्दा शहरात दुपारी 3 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांपर्यंत हा नियम लागू राहणार आहे. मशिदींमध्ये नमाज पठण आणि कार्यालयांमध्ये जाण्यावरही बंदी असेल. दिवसभरात 2,591 नवे बाधित सापडले असून यातही जेद्दामध्ये सर्वाधिक 459 रुग्ण आहेत.

रशियात 5,725 बळी

रशियात मागील 24 तासांमध्ये 8,855 नवे रुग्ण सापडले असून 197 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4,58,689 बाधित आढळले असून 5,725 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियात प्रारंभी कमी असणारा मृत्यूदर आता वाढत असल्याचे दिसून येत आहे. रशियातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे.

32 दिवस कोमात, चिमुकला संसर्गमुक्त

ब्राझीलमध्ये डोम नावाच्या चिमुकल्याला कोरोना संसर्ग झाला होता. या 5 महिन्यांचा डोम 32 दिवसांपर्यंत कोमात होता. 5 महिन्यांच्या ब्राझिलियन चिमुकल्याला इंडय़ूस कोमात पूर्ण महिना घालवावा लागला होता. परंतु डोम आता संसर्गातून मुक्त झाला आहे. डोमने 54 दिवस रुग्णालयात घालविले असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डोमला श्वास घेताना त्रास होत होता. चाचणी केली असता त्याला कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले हेते. डोम संसर्गमुक्त होणे ‘चमत्कार’च मानला जात आहे.

पुन्हा लॉकडाउन नाही

पाकिस्तानात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा विचारसुद्धा केला जाणार नाही. एकदा लॉकडाउन लागू केल्याने देशाची स्थिती बिकट झाली असून आता अशाप्रकारच्या दुसऱया पर्यायावर विचार केला जाऊ शकत नसल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात 93,983 बाधित सापडले असून 1,935 जणांचा मृत्यू झाला आहे.

मूकबधिर, अंध अडचणीत

मास्क, सोशल डिस्टन्सिंग या उपायांनी दिव्यांग, मूकबधिर, दृष्टीहीनांच्या अडचणी वाढल्या आहेत. जगभरात अशा लोकांची संख्या 46 कोटी इतकी आहे. मूकबधिर लोक ओठांच्या हालचालींनी संवाद करतात, परंतु मास्कमुळे हे शक्य नाही. तर अंधांकरता स्पर्शज्ञान महत्त्वाचे असते. कोरोना संकटात कुठेही स्पर्श करणे धोक्याचे आहे.

Related Stories

ब्रिटनच्या विद्यापीठात संसर्ग

Patil_p

योशिहिडे सुगा जपानचे आगामी पंतप्रधान

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा निगेटिव्ह

prashant_c

जपानमध्ये पंतप्रधान किशिदा यांना निवडणुकीत बहुमत

Patil_p

‘काही न करता’ लाखोंची कमाई

Patil_p

ब्रिटन चीनच्या ‘हुआवेई’ला 5G नेटवर्कमधून हटवणार

datta jadhav
error: Content is protected !!