तरुण भारत

मोसमी पावसाचा बिगूल

सात जून ही पावसाच्या आगमनाची तारीख कालच मागे पडली. मोसमी पाऊस अंदमान, केरळ व कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचला आहे पण, अद्याप मुंबई, महाराष्ट्र, कोकणात दाखल झाला नाही. येत्या दोन दिवसात तो सर्वत्र पोहोचेल आणि यंदा चांगला बरसेल. देशात यंदा खरीप हंगाम यशस्वी होईल. सारी संकटे, अडचणी, मंदी यावर खरीप हंगामाची यशस्विता मात्रा ठरेल असे सांगितले जाते आहे आणि हवामान खात्याचा तोच अंदाज आहे. गेले चार दिवस निसर्ग वादळ घोंगावत होते. या वादळाचा मुंबईला तडाखा बसणार अशी भीती होती. सावधगिरीचे उपाय योजण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीचा तडाखा मोठा असू शकतो. वित्तहानी, प्राणहानी प्रचंड होण्याची शक्यता असते. कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे सारेच हबकले आहेत,अडचणीत आहेत. त्यात ही वादळाची भर म्हणून अवघा महाराष्ट्र चिंतीत होता. पण थोडक्यात निभावले. या वादळाने कोकण, उरण परिसराला धडक दिली. तेथे घरांचे, झाडांचे, बागांचे, कलमांचे नुकसान झाले पण, वादळ मुंबईत शिरले नाही. वादळात प्राणहानी झाली नाही. जे काही नुकसान झाले त्यासाठी ठाकरे सरकारने शंभर कोटींचे पॅकेज दिले आहे. तुर्त वादळाचा धोका टळला आहे. पण, कोरोना महामारीचा धोका वाढतोच आहे. आता आजपासूनच सावधानता बाळगून अनेक गोष्टी ‘पुनश्च हरिओम’ या धोरणाने सुरू होतील. हॉटस्पॉट नाही तेथे काही प्रमाणात जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी पावले टाकली जात असली तरी कोरोना दहशत संपलेली नाही आणि कोरोनावर परिणामकारक इलाज, औषध, लस सापडेपर्यंत संपणारही नाही. अनेक ठिकाणी एसटी वाहतूक जिल्हांतर्गत सुरू आहे. पण, माणसे घराबाहेर पडायला तयार नाहीत. दुकाने, हॉटेल्स वगैरे गोष्टी काही अटींवर सुरू आहेत. पण म्हणावा तसा प्रतिसाद नाही. एकतर कोरोनाची धास्ती व दहशत आहे,जोडीला लोकांचे बजेट कोलमडले आहे. अनेकांना रोजगार नाही, पगार निम्म्यावर आले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. व्यवहार ठप्प आहेत. पुढे काय वाढून ठेवले आहे याची सर्वांना चिंता आहे. या साऱया अडीअडचणी, चिंता, समस्या, प्रश्न असले तरी पाऊस आला आहे. पावसाचे शेतीसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगात इतरत्र पावसाचे वेगवेगळे ऋतु आहेत. भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर हा वर्षा ऋतु असतो. नैर्त्रुत्येकडून येणारे वारे पावसाचे ढग घेऊन येतात. हिंदी महासागर व अरबी समुद्रात पाण्याने भरलेले ढग हे वारे घेऊन येतात आणि या पावसाचा लाभ भारतीय शेतीला होतो. हा पाऊस परत जातानाही बरसतो. या परतीच्या पावसातही गहू, हरभरा, शाळू अशी रब्बीची पिके येतात. ओघानेच पावसाचे महत्त्व मोठे आहे. यंदा वेळेत आणि चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. गेली काही वर्षे चांगला पाऊस या शब्दाचीही भीती वाटावी अशी स्थिती झाली आहे. सांगली-कोल्हापूर हे जिल्हे आणि सीमाभाग महापुराच्या तडाख्यातून अजून सावरलेला नाही. सन 2005 चा आणि 2019 चा महापूर आणि पाठोपाठ कोरोना व आता पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता. यामुळे नागरिक विशेषतः कृष्णा, वारणा, पंचगंगाकाठ हादरला आहे. पावसाळय़ाची सरकारी पातळीवर आणि व्यक्तीगत पातळीवर जो तो तयारी करतो आहे. पूरपट्टय़ातील गावे, वस्त्या, नदीकाठची गावे, घरे चिंतेत आहेत. सरकारी पातळीवर त्यांना सावधानतेचे इशारे व नोटीसा दिल्या जात आहेत. यावेळी महापूर येऊ नये म्हणून धरणातील पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन केले जाते आहे. पण अलीकडे ढगफुटीसारखे पावसाचे प्रकार उद्भवताना दिसत आहेत. बंधारे फुटणे वगैरे दुर्घटना आहेत. मुंबईपासून बेळगावपर्यंत आणि पुण्यापासून सांगली, कोल्हापूर पंढरपूरपर्यंत सर्वत्र हा धोका आहे. पण सावध राहणे योग्यवेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. माणसे पार्किंगमध्ये पाणी आले तरी घर सोडत नाहीत. हा गतवर्षीचा अनुभव चांगला नाही. यावेळी महापूर येऊ नये आणि चांगला पाऊस यावा, खरीप हंगाम यशस्वी व्हावा अशी अपेक्षा आहे. निसर्ग वादळाने काही भागात पाऊस झाला आहे. ओघानेच खरीप पेरण्यांना सुरूवात झाली आहे. बांधावर खत, बांधावर बियाणे अशा सरकारी घोषणा असल्या तरी बियाणे,खते यामध्ये लिकींग व लूट असते हे वेगळे सांगायला नको. यंदा हमीभाव आधी जाहीर होतील असे वाटते आहे. पण तेलबिया, डाळी यांची कमतरता आहे. शेतकऱयांनी पारंपरिक ज्वारी, बाजरी या पलीकडे जाऊन तेलबियांचे व वेगवेगळय़ा डाळी, भाज्या यांचे चांगले वाण घेऊन नेमकेपणाने शेती केली पाहिजे. लॉकडाऊनमुळे हवा, पाणी, नद्या, यात सुधारणा झाली आहे. शेतीला त्याचा फायदा होईल. पण टोळधाडीसारखी धास्ती आहेच. जोडीला अनेकांचे रोजगार गेल्याने आणि शहरी मंडळींचे गावाकडे स्थलांतर झाल्याने नवे काही प्रश्न उभे राहणार आहेत. शेतकऱयाला पाऊस, रोगराई याच जोडीला चोरी, पळवापळवी याचाही फटका असतो. उघडय़ा शेतात बियाणे, खते घालून तो नशीब आजमावतो. खरीपासाठी सर्वांची तयारी झाली आहे. पीककर्ज व बियाणे, खते यांची टंचाई नाही. यंदा चांगला पाऊस झाला आणि खरीप हंगाम यशस्वी झाला तर मंदी संपवण्याची शक्ती बळीराजात आहे. शेतकऱयाचे उत्पन्न वाढवणार अशी मोदी सरकारची घोषणा होती. ठाकरे सरकारही माझा शेतकरी माझा शेतकरी असा जप करते. यंदा पावसाच्या रूपाने होणारी चैतन्याची बरसात साऱया चिंता नष्ट करेल अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊन संपून पुन्हा जनजीवन सुरळीत होते आहे. पण, धोका संपलेला नाही. अशावेळी अधिक सतर्क राहून पावले उचलायला हवीत. सारी जबाबदारी सरकारची नाही. आपणही कर्तव्य आणि जबाबदारीचे पालन करायला हवे.

Related Stories

परीक्षांचे भिजत घोंगडे

Patil_p

पुत्रे मित्रवदाचरेत्।…….सुवचने

Omkar B

बळीराजासाठी एक पाऊल मागे घ्या

Omkar B

रुततात काटे येथे, आक्रंदतात युवा

Patil_p

डिजिटल सौंदर्य

Patil_p

जिल्हा बँक निवडणुकीत प्रतिष्ठेची लढाई!

Patil_p
error: Content is protected !!