तरुण भारत

जेवणात झुरळ अन् बिम्स प्रशासनाची पळापळ!

रमेश हिरेमठबेळगाव

बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाची व्यवस्था तोकडी पडत आहे. रविवारी कोरोना रुग्णांना पुरविण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. बाधितांनी बिम्स प्रशासनाच्या नावाने शंखध्वनी केला असून जेवणावर बहिष्काराचा पवित्राही घेतला होता.

रविवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका रुग्णाला वाटप करण्यात आलेल्या डाळ-भातात झुरळ आढळून आले. ज्याच्या जेवणाच्या डब्यात झुरळ आढळले त्याने ते जेवण अर्ध्यावर सोडले. त्याचवेळी इतर बाधितही जेवण घेत होते. आताच ही गोष्ट सांगितली तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम नको, म्हणून त्याने सगळय़ांचे जेवण होईपर्यंत ही गोष्ट काही काळ गुपित ठेवली. नंतर आपल्या डब्यातील झुरळाचे दर्शन घडविले.

वैद्यकीय कर्मचाऱयांची धावपळ

रविवारी दुपारपर्यंत कोरोना वॉर्डमध्ये सुमारे 111 हून अधिक जण उपचार घेत होते. सायंकाळी ही संख्या 137 वर पोहोचली आहे. लहान मुले, गर्भवती महिलांचाही यामध्ये समावेश आहे. झुरळाचे दर्शन होताच सर्व कोरोनाबाधित एकत्र आले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील वॉर्डमधून खाली येऊन ‘तुमच्या अधिकाऱयांना बोलवा, त्यांना या जेवणाचा स्वाद  घेऊ द्या’ अशी मागणी केली. या कोरोनाबाधितांनी आक्रमक पवित्रा घेताच वैद्यकीय कर्मचाऱयांची धावपळ उडाली. वरि÷ अधिकाऱयांना यावेळी पाचारण करण्यात आले. यापुढे असे होणार नाही. ज्यांना ज्यांना शक्मय आहे त्यांनी घरगुती जेवण मागवू शकता, अशी परवानगी दिली. त्यामुळे या वादावर पडदा पडला. या संबंधीचे काही व्हिडिओ रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या संबंधीची माहिती मिळाल्यानंतर ‘तरुण भारत’ने एका कोरोनाबाधिताशी संपर्क साधला असता त्याने तेथील भयावह चित्र मांडले. ‘जेवण तर दूरच प्यायचे पाणीही व्यवस्थित नाही. ज्यांना शक्मय आहे, ते बाटलीबंद पाणी मागवू शकतात, ज्यांना शक्मय नाही त्यांना इस्पितळातील पाणी प्यावे लागते. मात्र, ते पिण्यायोग्य आहे का? याची एकदा तपासणी व्हावी’, अशी मागणी बाधितांनी केली आहे.

रुग्णांना दिला जाणारा चहाही व्यवस्थित नसतो. ‘आम्हाला जो चहा वाटतो तो तुम्हीही घेऊन पहा’ अशी मागणी बिम्सच्या अधिकाऱयांकडे केली. त्यामुळे त्यांची बोलती बंद झाली. ‘जेवणात दोन चपात्या, एक भाजी, एक अंडे, डाळ-भात दिला जातो. अन्नाला नाव ठेवू नये म्हणून आजवर आम्ही जे मिळेल ते खात होतो. तेसुद्धा व्यवस्थित दिले जात नाही. डाळीत झुरळ आढळले. स्वच्छतेचे तर नावच नाही. अशा परिस्थितीत बाधितांनी काय करावे?’ असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

बिम्स प्रशासनाची पाचावर धारण बसली

लहान मुले, महिला व बहुतेक कोरोनाबाधित पहिल्या मजल्यावरून खाली उतरताच बिम्स प्रशासनाची पाचावर धारण बसली. गर्भवती महिला, लहान मुले आहेत, किमान त्यांचा विचार करून तरी सकस आहार देण्याची मागणी बाधितांनी केली आहे. कोरोनाग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेताच ज्यांना शक्मय आहे त्यांनी घरातून अन्न मागवा, असे सांगत बिम्सच्या अधिकाऱयांनी परवानगी दिली आहे.

कोरोना वॉर्डमध्ये गोंधळाचे वातावरण

जे स्थानिक आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक बेळगावात राहतात, त्यांना घरातून डबा मागविणे शक्मय आहे. जे निपाणी, चिकोडी, अथणी, हुक्केरी आदी तालुक्मयातून येथे आले आहेत, त्यांनी काय करायचे? असा प्रश्न बाधितांनी उपस्थित केला आहे. दुपारी उशिरापर्यंत कोरोना वॉर्डमध्ये गोंधळाचे वातावरण होते. वैद्यकीय कर्मचाऱयांनी यापुढे असे होणार नाही, असे सांगत बाधितांना वॉर्डला पाठविल्याची माहिती मिळाली आहे.

गर्भवती महिलांची काळजी कोण घेणार?

‘तरुण भारत’ला मिळालेल्या माहितीनुसार सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये सर्व काही ठिक नाही. आपल्यालाही बाधा होईल, या भीतीने या वॉर्डच्या जवळपासही कोणी फिरकत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन जे सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवला जात होता. कोरोना वॉर्डमध्ये सर्व काही आलबेल आहे, बाधितांना औषधोपचाराबरोबर उत्तम अन्नपाण्याची व्यवस्था केली जात आहे, अशी फुशारकी जिल्हा प्रशासन मारत होते. मात्र, रविवारचा प्रकार लक्षात घेता एकप्रकारे प्रशासनाचे बिंग फुटले आहे. या वॉर्डमध्ये जिल्हय़ातील वेगवेगळय़ा ठिकाणाहून आलेल्या चार गर्भवती महिलांवर उपचार केले जात आहेत. त्यांना हैड्रोक्सी क्लोरोक्विन-200 एमजीच्या गोळय़ा देणे धोक्मयाचे असते, असे डॉक्टरच सांगतात. मात्र, चुकून एका महिलेला या गोळय़ा दिल्याची माहिती मिळाली आहे. चूक लक्षात येताच एका जाणकार महिलेने कर्मचाऱयांना जाब विचारला. त्यावेळी एकदा घेतल्यावर काही होत नाही, यापुढे आम्ही तुम्हाला या गोळय़ा देणार नाही, असे सांगून वेळ मारून नेण्यात आली.

चौकट

पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात अधिकाऱयांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, बिम्स प्रशासन व जिल्हा प्रशासनातील वरि÷ांनी त्यांची दिशाभूलच केली आहे. कोरोना वॉर्डमधील वस्तुस्थितीपासून पालकमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आले. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना बिम्समध्ये व्यवस्था कोलमडत चालली असून आता पालकमंत्र्यांनीच बिम्स प्रशासनाला वठणीवर आणण्याची गरज व्यक्त होत आहे. यासंबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आपण यासंबंधीचे व्हिडिओ पाहिले आहेत. बाधितांसाठी तयार होणारे जेवण बिम्सच्या आवारातच बनविले जाते. रोज आरएमओ व जिल्हा शल्यचिकित्सकांकडून जेवणाची तपासणी झाल्यानंतरच ते रुग्णांना वाटले जाते. उद्यापासून एखादे फळ देण्याचा विचार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

Related Stories

कोरोना योद्धय़ांच्या सवलती काढून घेतल्या

Patil_p

एसपीएम रोड अडकला पुन्हा समस्यांच्या गर्तेत

Patil_p

गोकर्णनजीक तदडी बंदरात सापडला 500 किलोचा व्हेल शार्क मासा

Amit Kulkarni

डॉ. आंबेडकर जयंतीचे आचरण साधेपणाने

Patil_p

मृतदेहापासून संसर्गबाधेचा धोका नाही !

Patil_p

केसीईटी परीक्षा: उपमुख्यमंत्र्यांनी परीक्षा केंद्राची केली पाहणी

triratna
error: Content is protected !!