तरुण भारत

मन उलगडताना…

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ‘मनाचा मेंदूमधील ब्रेक’ हे इनबिल्ट फंक्शन आहे परंतु ते
ऍक्टिव्ह करण्यासाठी त्याला टप्प्याटप्याने टेनिंग देणे गरजेचे आहे. जगभरात चाललेल्या संशोधनानुसार ‘माईंडफुलनेस’ अर्थात ‘सजगतेची तंत्रे’ यासाठी विशेष उपयुक्त ठरत आहेत. याविषयी आपण जाणून घेणारच आहोत परंतु त्यापूर्वी मानवी मेंदू, मेंदूची रचना, रसायनांचा वैचारिक आणि भावनिक स्थितीवर होणारा परिणाम याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. शरीराच्या वजनाच्या फक्त 2… वजन असलेला मेंदू हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. शरीराला लागणाऱया प्राणवायूपैकी 20… प्राणवायू, रक्तपुरवठय़ापैकी 20… रक्त, अन्न उष्मांकापैकी 20… उष्मांक (कॅलरीज) स्वतः वापरत असतो. नाक, कान, डोळे, त्वचा या ज्ञानेंद्रियांनी मिळविलेली माहिती गोळा करून बाह्य जग कसे आहे हे ठरवत असतो. म्हणजेच ज्ञानेंद्रियांच्या, मज्जापेशी व मज्जातंतूच्या कार्यक्षमतेवर मेंदूने जगासंबंधित लावलेला अर्थ अवलंबून असतो.  मज्जापेशींच्या एका टोकाला संवेदना, माहिती, ज्ञानग्रहण करणारी वायर (Axon) असते तर दुसऱया टोकाला शेकडो संपर्क तंतू (Dendrites) असतात. एका पेशींवरील काही रसायनामधील रासायनिक क्रियेद्वारा दुसऱया पेशीवरील संदेशग्राहक (Receptors) संपर्क साधून सूक्ष्म विद्युतदाबाच्या मदतीने विद्युत ऊर्जेत रुपांतरीत संदेश पुढे पाठवतात. दोन पेशींमधील फटीत होणाऱया रसायनांच्या हालचालीवर संदेश वहन, ग्रहण, मनातले विचार, भावना, जगाबद्दलची समज अवलंबून असते.

मानवी मेंदू हा अद्वितीय आहे. उत्क्रांतीने बदलत आलेला आहे. सरपटणाऱया प्राण्यांमध्ये फक्त जैविक मेंदू असतो. भय, भूक, लैंगिक आकर्षण एवढेच तो जाणतो. माणसामध्येही तो असतोच. ब्रेन स्टेम आणि मेडय़ुला म्हणजेच हा जैविक मेंदू. आपल्या सर्व शरीर क्रियांचे नियंत्रण करण्याचे काम जैविक मेंदू करत असतो जसे की, शारीरिक हालचाली, श्वासोच्छ्वास, पचन, शरीराचे तापमान. इ. सस्तन प्राण्यांमध्ये जसे की कुत्रा, बैल यांच्यामधे मात्र जैविक मेंदू सोबतच लिम्बिक ब्रेन अर्थात भावनिक मेंदूही कार्यरत असतो. म्हणूनच कुत्रा आपल्या मालकावर प्रेम करू शकतो. मानवी मेंदूतही हा भाग असतोच. सेरेब्रल कॉर्टेक्स नावाचा मेंदूचा भाग ज्याला वैचारिक मेंदू म्हणता येईल तो माणसाप्रमाणेच गोरीला, चिंपांझी यासारख्या अधिक उत्क्रांत झालेल्या काही माकडाच्या मेंदूतही असतो. परंतु ‘प्री प्रंटल कॉरटेक्स’ नावाचा मेंदूतील सर्वात पुढे असणारा भाग फक्त मानवी मेंदूमध्येच असतो. त्यामुळेच आपण सारासार विचार करू शकतो, प्रगती करू शकतो. आपल्या बेभान कृतींवर नियंत्रण मिळवू शकतो.

Advertisements

आपल्या भावनिक मेंदूतील अमायग्डला (Amygdala) हा भाग सतत प्रतिक्रिया करत असतो. ज्यावेळी कोणताही धोका जाणवतो त्यावेळी अमायग्डला लगेच रिऍक्ट करतो. त्याच्या प्रतिक्रियेमुळे आपल्या शरीरात काही रसायने पाझरतात आणि त्यामुळे शरीर मनाच्या तीन स्थिती निर्माण होतात. फाईट, फ्लाईट, फ्रीज. धोका कळताक्षणी मनात राग निर्माण होतो आणि आपण आलेल्या संकटाचा सामना करू शकतो, मनात भीती निर्माण होते, आपण त्या धोक्मयापासून पळू शकतो, फ्रीज म्हणजे जसे एखादे संकट आल्यावर प्राणी मूर्च्छा आल्यासारखे पडून राहतात तसे आपले शरीर मन फ्रीज होते. ज्याला आपण उदासी वा डीप्रेस्ड इमोशन म्हणू शकतो. म्हणजेच भीती, राग, उदासी, चिंता या भावना अमायग्डलाची प्रतिक्रिया म्हणून उत्पन्न होतात. मानवी मेंदूतील प्री प्रंटल कॉर्टेक्स हा भाग यावर नियंत्रण ठेवत असतो. त्याची इतरही अनेक कामे आहेत परंतु भावनिक नियमनाचे महत्त्वपूर्ण काम मानवी मेंदूतील हा भाग करत असतो.

निरुपयोगी विचार, भावनांचा आवेग यावर नियंत्रण ठेवण्याचे काम तो करत असतो. ज्यावेळी विचार, भावना निर्माण होतात त्यावेळी भावनिक मेंदूसोबत वैचारिक मेंदू ही सक्रिय असतो परंतु त्याची सक्रियता पुरेशी नसेल तर भावनिक मेंदू वैचारिक मेंदूला हायजॅक करतो आणि आपले विचार, भावना यावरचा ताबा सुटून आवेगी वर्तन (इंपल्सिव्ह बिहेव्हियर) घडते. जसे अमाग्डलाची प्रतिक्रिया म्हणून भावनांची निर्मिती होते किंवा अनेकदा अतार्किक, अशास्त्रीय विचारपद्धतीही भावनांच्या उद्भवास कारणीभूत ठरते. तसेच काही विशिष्ट रसायने ही भावनांच्या उद्भवास कारणीभूत असतात. एखादी व्यक्ती मानसिकरित्या अस्वस्थ असेल तर नक्कीच काहीतरी मनाला त्रास देणारी घटना घडली असणार अशी सगळय़ांची खात्री असते. परंतु त्या त्रासाचे बाह्य कारण सापडले नाही तर मग त्या व्यक्तीसंदर्भात घडणाऱया गोष्टी या बाहेरच्या बाधेमुळे, कुणाचा शाप बाधल्यामुळे होत आहेत असा अंधविश्वास ठेवून लोक घाईघाईत अनेक निर्णय घेतात. त्यात वेळ, शक्ती, पैसा हे सारे वाया जातेच आणि समस्या सुटण्याऐवजी त्यातून अनेक वेगळय़ा समस्या निर्माण होतात. मेंदूतील कोणत्याही दोन पेशी परस्परांशी जोडलेल्या नसतात. एका पेशीत आलेला विद्युत संदेश पुढील पेशीमधे पोहचविण्यासाठी दोन पेशींमधे जी रसायने पाझरतात त्यांना न्यूरोट्रान्समीटर्स (संदेशवाहक) म्हणतात. ही रसायने वेगवेगळय़ा भावनांशी संबंधित आहेत. थोडक्मयात मांडायचे तर पहा, नॉरएपिनेफ्रीन हे रसायन आपल्या दिवसभराच्या उत्साहाकडे लक्ष देते. काम करण्यासाठी लागणारा उत्साह, तरतरीत वाटणे हे यावर अवलंबून असते. डोपामाईन हे रसायन उत्सुकतेशी, प्रेरणेशी निगडित आहे. आपल्याला सुखाची भावना नीट अनुभवण्यासाठी वा दु:खाची भावना सहन होण्यासाठी ते उपयुक्त ठरते. डोपामाईन कमी पडल्यास आनंदी प्रसंगात आनंद घेता येत नाही आणि दु:खद प्रसंगात दु:ख सहन करणे अवघड जाते. सहनशक्ती कमी होते. कंटाळा येतो, उत्साह वाटत नाही.

सेरेटोनिन व एन्डॉर्फिन ही रसायने कृती करताना मिळणाऱया आनंदाला कारणीभूत आहेत. मेंदूतील सेरेटोनीन कमी झाले तर औदासिन्य हा आजार होतो. सेरेटोनिन व मॅलॅटोनिन यांच्या अंतर्गत क्रियांचा शोध शास्त्रज्ञांना साधारणतः 1976 च्या आसपास लागला. संध्याकाळ होत चालली की सेरेटोनिनचे रूपांतर मॅलॅटेनिनमधे होते. आपल्याला हळूहळू झोप येते. रात्र संपून प्रकाश पडू लागल्यानंतर मेलॅटेनिनचे रूपांतर पुन्हा सेरेटोनिनमधे होते आणि जाग येते. सेरेटोनिन आतडय़ातील न्यूरॉन्समधे तयार होते त्यामुळे पचनसंस्था आणि उदासी याचाही निकटचा संबंध आहे. अंधुक प्रकाशात हे रसायन तयार होत नसल्याने ढगाळ हवामानात आपल्याला उदास वाटते. हिवाळय़ात असे हवामान असे असेल तर औदासिन्य वाढते यालाच ‘विंटर ब्लू’ म्हटले जाते. गाबा हे देखील मेंदूतील महत्त्वाचे रसायन आहे. पॅनिक डिस्ऑर्डर या आजारात ते कमी झालेले असते. हे आंतरिक शिस्तीसाठी, इच्छा नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. एकंदरच विचार-भावना-वर्तन या सर्व गोष्टींचा समतोल अमायग्डलाची प्रतिक्रिया, वैचारिक मेंदूची सक्रियता, रसायने, विचारपद्धती या सर्वांवर अवलंबून असते. त्यामुळे या सर्व बाबतीत आपण सजग असणे गरजेचे आहे. तसेच मेंदूतील डी
फॉल्ट मोड नेटवर्कला आराम देणेही गरजेचे आहे. त्याविषयी जाणून घेऊया पुढच्या लेखात..

Ad.  सुमेधा देसाई, मो.94226 11583

Related Stories

अशोका विद्यापीठातील सुंदोपसुंदी

Patil_p

गोवा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा घाईची

Patil_p

कोण कोणाची तूं कन्या?

Patil_p

तेजपूर्ण दिवाळी

Patil_p

‘मन की’ ऊर्जा

Patil_p

नेत्यांच्या ‘खासगी उपचारांवर’ नेटकऱयांकडून ताशेरे

Patil_p
error: Content is protected !!