तरुण भारत

पेट्रोल-डिझेलचा भडका सुरूच

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सलग तिसऱया दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीची हॅटट्रिक केल्याने वाहनधारकांच्या खिशावर बोजा पडला आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर सरासरी 40 ते 60 पैशांनी महागले. मुंबईत रविवारपासून पेट्रोल 1 रुपया 17 पैशांनी महागले आहे, तर डिझेलच्या दरामध्ये 1 रुपया 16 पैशांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Advertisements

इंधन दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा भाव 79.49 रुपये झाला. आज त्यात 58 पैशांची वाढ झाली. तसेच डिझेलचा भाव 69.37 रुपयांपर्यंत वाढला. सोमवारी डिझेल 68.79 रुपये होते. मंगळवारी मुंबईत डिझेल 58 पैशांनी महागले. महाराष्ट्र सरकारने गेल्या पंधरवडय़ातच इंधनावरील व्हॅटच्या अधिभारात वाढ केली होती. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी महागले होते.

दिल्लीत मंगळवारी पेट्रोल 54 पैशांनी महागल्यामुळे दर 72.46 रुपये प्रतिलिटर झाला. तर डिझेलचा दर 70.59 रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल 74.46 रुपये लिटर झाले असून त्यात सोमवारच्या तुलनेत 57 पैशांची वाढ झाली आहे. कोलकात्यात डिझेल दर 66.71 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल 40 पैशांनी महागले असून ग्राहकांना पेट्रोलसाठी 76.60 रुपये मोजावे लागतील. डिझेलचे दर प्रतिलिटर 69.25 रुपये झाले आहेत.

दररोज आढावा अन् दरवाढ…

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी रविवारपासून 83 दिवसांच्या अंतरानंतर दररोज किंमतींचा आढावा पुन्हा सुरू केला आहे. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून तेलाच्या किंमती वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये किंचित वाढ झाल्याने इंधन दरही वाढवण्याचे कारण पुढे केले जात आहे.

लॉकडाऊन उठविल्याचा परिणाम

देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे जारी केलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर इंधनाची मागणी वाढत आहे. याचाच फायदा उठविण्याचा प्रयत्न तेल कंपन्यांकडून सुरू आहे. लॉकडाऊन हळूहळू शिथिल झाल्यानंतर आता खासगी वाहनांसह, ऑटो, टॅक्सी, बस, दुचाकी चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या तीन टप्प्यांपर्यंत रस्त्यावर फारच कमी वाहने धावत होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची विक्रीही बरीच कमी झाली होती.

Related Stories

‘ओ पॉझिटिव्ह’ व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी

Patil_p

राज्यांना ‘म्युकरमायकोसिस’वरील औषधाच्या 23,680 वायल्स

datta jadhav

देशात कोरोनामुक्तीचा वेग वाढला

datta jadhav

पाकिस्तानच्या कराचीत गणेशोत्सव साजरा

Patil_p

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कालवश

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश?

datta jadhav
error: Content is protected !!