तरुण भारत

कोव्हिड बदली खेळाडू, लाळबंदीवर आयसीसीचे शिक्कामोर्तब

दुबई / वृत्तसंस्था

कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूस कोरोनाची लक्षणे दिसून आली तर त्याऐवजी पर्यायी खेळाडूला पाचारण करणे व लाळेचा वापर करण्यावर पूर्ण बंदी, असे दोन नवे नियम आयसीसीने मंगळवारी जारी केले. द्विदेशीय मालिकेत किंवा सामन्यात तटस्थ पंचांची परंपराही आयसीसीने येथे संपुष्टात आणली. यामुळे, यापुढे ठरावीक काळापर्यंत यजमान देशांचे पंच देखील पंचगिरी करु शकतील. अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीने या सर्व शिफारशी केल्या होत्या. त्यावर आयसीसीने येथे शिक्कामोर्तब केले. हे नवे नियम हंगामी स्वरूपाचे असतील.

सध्या कोव्हिड-19 चा धोका सर्वत्र आहे. त्यामुळे, बाहेरील देशातून पंच बोलावणे जोखमीचे ठरु शकते. याशिवाय, डीआरएस प्रणाली अंमलात आणली गेल्यानंतर पंचांच्या एखाद्या निर्णयाविरुद्ध खेळाडूंना दादही मागता येऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर, कुंबळे यांच्या समितीने यजमान देशातील पंचांकडे जबाबदारी सोपवण्यास आता काहीच अडचण नसल्याचे स्पष्ट केले होते. नव्या नियमानुसार, संघांना आता नेहमीपेक्षा एक अधिक डीआरएस कॉल घेता येणार आहेत.

या नियमामुळे, सी. शमशुद्दीन, अनिल चौधरी व नितीन मेनन हे भारतीय पंच पुढील वर्षी इंग्लंडचा संघ भारत दौऱयावर येईल, त्यावेळी पंच म्हणून काम पाहण्याची शक्यता असेल. जावगल श्रीनाथ सामनाधिकारी असू शकतील.

सध्या अनेक मंडळे कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे आर्थिक संकटांचा सामना करत असल्याने यावर एक पर्याय म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर 32 इंच उंचीचा अतिरिक्त लोगो वापरता येईल, अशी मुभा आयसीसीने दिली. सध्या फक्त वनडे व टी-20 सामन्यांमध्येच जर्सीवर लोगोची परवानगी होती.

नव्या परंपरेला सुरुवात

लाळेचा वापर करण्यावर बंदी घालत आयसीसीने या निमित्ताने नव्या परंपरेला सुरुवात केली आहे. चेंडूला झळाळी आणण्यासाठी घामाचा वापर करण्याची मात्र परवानगी असणार आहे. लाळ बंदीचे उल्लंघन केल्यास प्रथम समज दिली जाईल. एका डावात दोनवेळा अशी समज दिली जाईल आणि तरीही पुनरावृत्ती झाल्यास त्या संघाला 5 धावांचा दंड ठोठावला जाणार आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धा व नव्या अध्यक्ष निवडीबद्दल आज निर्णय शक्य

यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱया टी-20 आयसीसी विश्वचषक स्पर्धेबाबत आज आयसीसी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयसीसी कार्यकारिणीची व्हर्च्युअल बैठक होत असून याचवेळी आयसीसीचा नवा अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेबद्दलही चर्चा होणे अपेक्षित आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी इंग्लंडचे कॉलिन गेव्ह्ज आघाडीवर आहेत. मात्र, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली, पीसीबी अध्यक्ष एहसान मणी यांची नावेही चर्चेत आहेत. वास्तविक, आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या भवितव्याबद्दल मागील बैठकीतच निर्णय होणे अपेक्षित होते. पण, त्यावेळी बैठकीचा मसुदा त्यापूर्वीच बाहेर आल्याने त्यावेळी निर्णय घेणे टाळले गेले.

आयसीसी अध्यक्षपदासाठी 17 मते

आयसीसी कार्यकारिणीत अध्यक्षपद निवडीसाठी 17 मते आहेत. त्यात 12 कसोटी खेळणाऱया संघांचे प्रतिनिधी, 3 संलग्न संस्थांचे प्रतिनिधी, एक स्वतंत्र सदस्य (इंद्रा नुयी) व मावळत्या अध्यक्षांचे एक मत अशी विभागणी आहे. एखाद्या उमेदवाराकडे 4 ते 5 हक्काची मते असतील तर निवडणुकीत फैसला होऊ शकतो. गांगुली अध्यक्षपदासाठी प्रयत्न करणार का व पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी इच्छुक असतील तर त्यांना बीसीसीआयचे पाठबळ मिळणार का, हे देखील तितकेच महत्त्वाचे असेल.

Related Stories

विंडीज संघात ड्वेन ब्रॅव्होचे पुनरागमन

Patil_p

झेकमध्ये पुढील आठवडय़ात प्रेक्षकांच्या उपस्थितीत टेनिस स्पर्धा

Patil_p

पोर्तुगालचा रायडर गोन्साल्वेस अपघातात ठार

Patil_p

भारत-संयुक्त अरब अमिरात आज फुटबॉल लढत

Patil_p

ही लढाई घरात बसूनच जिंकावी लागेल

tarunbharat

सिद्ध करण्यासारखे काहीच बाकी नाही!

Patil_p
error: Content is protected !!