प्रतिनिधी / पणजी
राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता सरकार हर्ड इम्युनिटीकडे झुकत आहे. मात्र स्वीडनमध्ये केलेला हा प्रयोग फसला आहे आणि गोव्यात तसे झाल्यास 40 टक्के लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती काँग्रेस प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस यांनी व्यक्त केली आहे.
2011 च्या सर्वेक्षणानुसार राज्यात 20 टक्के लोक हे 60 वर्षांवरील आहेत. तर 20 टक्के लोक 15 वर्षांखालील आहेत. त्यामुळे या 40 टक्के लोकांना सरकार धोक्यात घालत आहे. उर्वरित 60 टक्के लोकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा सरकारकडे उपलब्ध आहेत का, असा सवाल फर्नांडीस यांनी उपस्थित केला. या लोकांसाठी इस्पितळात खाटा उपलब्ध आहेत का? त्याचबरोबर तपासणी सुविधा आहेत का? सरकार सांगते आवश्यक यंत्रणा उपलब्ध आहे, पण तरीही चाचण्या होऊ शकत नाही. स्थिती हाताबाहेर गेल्यास सरकारला शक्य होईल का? हर्ड इम्युनिटीवर भर दिल्यास लोकांचे जीवन उध्वस्थ होऊन जाणार आहे. तसेच अर्थव्यवस्था नष्ट होणार आहे.
सरकारला जर पूर्ण लॉकडाऊन करायचे नसेल तर बाहेरून येणाऱया लोकांवर तरी नियंत्रण यायला हवे. इंजेक्शन असल्याशिवाय हर्ड इम्युनिटीवर भर देता येणार नाही. आज अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सरकार नको ते निर्णय घेत आहे. त्यामुळे सरकार चुकीचा निर्णय घेत आहे. सरकार आमच्या 40 टक्के लोकांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. सरकारने लॉकडाऊन करण्याची गरज आहे. रेड झोनमधील लोक गोव्यात येत आहेत. त्यांना बंद करावे असेही ते म्हणाले. यावेळी जनार्दन भंडारी यांचीही उपस्थिती होती.