तरुण भारत

जीवनातील अंधःकार दूर करणाऱया नेत्रदानाला हवी चालना

नेत्रदान दिन विशेष : भारतात दरवर्षी अडीच लाख ‘कोर्निया’ प्रत्यारोपणांची गरज :  मोठय़ा प्रमाणात हवी जागृती व लोकांचा सहभाग

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

रक्तदानाप्रमाणे अवयवदान हेही खूपच मोलाचे असून त्यात नेत्रदान तर फारच महत्त्वाचे आहे. नेत्रदानामुळे अंध माणसाला दृष्टी मिळून त्याच्या जीवनात नवा प्रकाश पडू शकतो. यासंदर्भात उर्वरित देशाबरोबर गोव्यातही हल्लीच्या काळात अधिक प्रमाणात जागृती मोहिमा आयोजित केल्या जात असल्या, तरी ही जागृती आणखी खूप मोठय़ा प्रमाणात होण्याची गरज आहे. चार वर्षांपूर्वी व्यक्त झालेल्या एका अंदाजानुसार, भारतात दरवर्षी सुमारे अडीच लाख इतक्या ‘कोर्निया’ प्रत्यारोपणांची गरज भासते, मात्र प्रत्यक्षात होणाऱया नेत्रदानाचे प्रमाण हे 50 हजार इतकेच आहे.

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात अंधत्व आलेल्यांची संख्या फार मोठी असून नेत्रदानाला चालना मिळण्याची का गरज आहे ते त्यातून स्पष्ट होऊ शकते.

एका अंदाजाप्रमाणे, जगात जवळपास साडेतीन कोटी लोकांना अंधत्वाचा सामना करावा लागत आहे. त्यातील एक चतुर्थांश भारतात असून त्यांची संख्या जवळपास 88 लाख आहे. त्यापैकी सुमारे 46 लाख लोकांच्या जीवनातील अंधःकार प्रत्यारोपणाने दूर होऊ शकतो असे मानले जाते. मात्र नेत्रदानाच्या आघाडीवर अजून हवी तितकी मजल मारता आलेली नसल्याने त्यात खूपच मर्यादित यश हाती लागत आहे.

‘कोर्नियल अंधत्वा’त भारताचा दुसरा क्रमांक

अंधत्व येण्यास ‘ग्लुकोमा’, ‘मोतिबिंदू’ आणि वाढत्या वयाशी निगडीत ‘मेक्युलर डिजनरेशन’पाठोपाठ ‘कोर्नियल अंधत्व’ हे चौथे कारण मानले जाते. मात्र ‘कोर्निया’चे प्रत्यारोपण हे माणसाकडून स्वेच्छेने केल्या जाणाऱया नेत्रदानावर अवलंबून आहे. याबाबतीत इतर जगाशी तुलना करता फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण आशियात बिकट स्थिती दिसून येते. जगात ‘कोर्नियल अंधत्वा’चे प्रमाण सर्वांत जास्त चीनमध्ये पाहायला मिळते. जागतिक संख्येत त्यांचा वाटा 10 ते 15 टक्के आहे. त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक भारताचा लागतो. ‘कोर्नियल’ अंधत्व आलेले जगात जितके लोक आहेत त्यापैकी 9 टक्के आपल्या देशात असून ही संख्या 25 लाखांहून जास्त असल्याचे सांगितले जाते.

गरज व प्रत्यक्ष नेत्रदान यात मोठी तफावत

भारतात ‘कोर्नियल’ अंधत्वाचे प्रमाण हे वाढत चालले आहे. काम-व्यवसायात डोळय़ांना होणारे त्रास, जंतुसंसर्ग, काही आजार आणि ‘व्हिटॅमिन-ए’ची उणीव अशी अनेक कारणे त्यामागे लपलेली आहेत. पण असे असले, तरी मागणी आणि प्रत्यक्षात होणारे नेत्रदान यात खूपच मोठे अंतर आहे. नेत्रदानाची गरज पटवून देण्याकरिता आणि लोकांना प्रोत्साहन देण्याकरिता शासकीय पातळीवरून तसेच संस्थांकडून विविध जागृती मोहिमा राबविल्या जातात. तरीही एका अंदाजानुसार, या मोहिमांतून सुमारे 70 गरजुंमागे केवळ एक ‘कोर्निया’ अशा अल्पप्रमाणात नेत्रदान होते.

जागृतीबरोबर वाढीव सुविधांची गरज

नेत्रदानाच्या बाबतीत प्रभावी तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचा अभाव याही अडचणी भेडसावत आहेत. नेत्रदानात वाढ झालेली असली, तरी योग्य पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण केंद्रांच्या अभावी ते फुकट जाण्याचे प्रकारही घडताना दिसतात. भारतात नेत्रदानाची स्थिती सुधारण्यास निश्चितच खूप वाव आहे. कारण त्यादृष्टीने लोकांचा कल वाढताना दिसतो. तरीही माहितीचा अभाव आणि गैरसमज या बाबी याकामी अजूनही खूप अडथळा आणत आहेत. त्यामुळेच नेत्रदानाविषयी भरपूर जागृती होण्याची आणि खास करून ग्रामीण भागांमध्ये जागृती केली जाण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या बाबतीत असलेली उणीव भरून काढण्याच्या दृष्टीने 2 हजारांहून अधिक नेत्रपेढय़ा व नेत्रदान केंद्रे उभी राहण्याची आवश्यकता व्यक्त होते.

Related Stories

ओव्या म्हणजे मनापासून व्यक्त हेणाऱया भावना

Amit Kulkarni

आंचिम समारोपाला झिनत अमानची उपस्थिती

Amit Kulkarni

गोवा माईल्समुळे उपासमारीची पाळी

Amit Kulkarni

बार्देशात दत्तजयंती उत्साहात

Patil_p

केरी सत्तरी येथे घरातील सिलिंडरला आग.

Omkar B

विद्यार्थ्यांना यशसंपादनासाठी प्रोत्साहित करणारे आर्यन मुष्टिफंड

Patil_p
error: Content is protected !!