तरुण भारत

कोकणातील वादळग्रस्त मुंबईकर दुहेरी अडचणीत

 निसर्ग चक्रीवादळ भरपाई अर्ज ऑनलाईन भरण्याची मुभा द्या! : सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर चाकरमान्यांचीही मागणी

अजय कांडर / कणकवली:

Advertisements

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात सिंधुदुर्गसह रायगड-रत्नागिरी जिल्हय़ात अपरिमित नुकसान झाले. सिंधुदुर्गात 4 कोटीचे नुकसान झाले असून नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईतच अडकलेल्या चाकरमान्यांना भरपाईचे अर्ज गावी येऊन भरता येत नसल्याने कोकणातील चाकरमानी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, अशा चाकरमान्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुभा द्यावी, असा पर्याय त्यांना खुला ठेवण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर चाकरमान्यांनी केली आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक चाकरमानी मुंबई वा अन्य शहरात अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईचे अर्ज ऑनलाईन भरण्याची परवानगी देण्याबरोबरच तशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्मयातील हजारो घरांची पडझड झाली असून बागायत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात किनारपट्टीतील भागातही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. यासाठी स्थानिक प्रशासनाने अर्ज वाटप सुरू केले आहे.

ना अर्ज भरता येणार, ना सही करता येणार

मात्र, कोकणातील लोक मोठय़ा संख्येने नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई वा अन्य शहरात राहत असून गावातील घरे बंद आहेत. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर त्यांना सहजपणे गाव गाठणे शक्मय नाही. किंबहुना गावी आलात, तर त्याच दिवशी परत जावे लागेल. अन्यथा 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागेल, असे सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाकरमानी कोंडीत सापडले आहेत. दुसरीकडे गावातील रहिवाशांकडून त्यांना व्हॉट्सऍपच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ मिळत आहेत. मात्र, प्रत्यक्ष जाता येत नसल्याने ना त्यांना भरपाईचे अर्ज भरता येणार आहेत, ना त्यावर सही करता येणार. या पार्श्वभूमीवर, भरपाईचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यास ते सहजपणे आवश्यक माहिती भरून देऊन आपले अर्ज प्रशासनास सादर करू शकतील. आवश्यकता वाटल्यास प्रत्यक्ष पंचनाम्यावेळी गावात हजर राहू शकतील.

केंद्र सरकार गप्प का?

कोकणातील प्रश्नावर अलिकडल्या काळात सातत्याने आवाज उठविणाऱया जनता दलाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर म्हणाले, अलिकडेच पश्चिम बंगाल व ओरिसाला वादळाचा तडाखा बसला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी करण्याबरोबरच पश्चिम बंगालला एक हजार कोटी रुपयांची, तर ओरिसाला 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मग कोकणाबाबत केंद्राकडून दुजाभाव का केला जात आहे? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याबाबत गप्प का? का महाराष्ट्रात आता निवडणुका नाहीत, त्यामुळे राज्याला मदत करण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत आहे. पावसाळय़ात सांगली-कोल्हापूर पट्टय़ात महापुराचा फटका बसला होता. त्यावेळीही राज्याला केंद्र सरकारकडून हाच अनुभव आला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोकणपट्टीला बसलेला निसर्ग वादळाचा तडाखा मोठा असून बागायत उद्ध्वस्त झाल्यामुळे जनतेच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पश्चिम बंगाल व ओरिसाच्या धर्तीवर कोकणासाठीही एक हजार कोटी रुपयांची मदत द्यावी, त्यासाठी राज्य सरकारनेही केंद्राकडे मागणी करावी.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

निसर्ग वादळाच्या प्रारंभीच्या काळात कोकणात मोठे नुकसान झाले नाही, असे  सत्ताधारी राज्यकर्त्यांनाही वाटत होते. पण प्रत्यक्षात कोकणातील अनेक भागातील लोकांची अपरिमित हानी झाली आहे. यापूर्वी सरकारने मोठय़ा प्रमाणात भरपाई द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्यानंतर काही प्रमाणात भरपाई मान्य जाहीर करण्यात आली. पण ती अपुरी आहे. सरकारने भरपाईसाठी चाकरमान्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे प्रभाकर नारकर, सुहास बने तसेच कोकण जनविकास समितीचे जगदिश नलावडे, सुरेश रासम, महेश मलुष्टे आदींनी सांगितले.

Related Stories

ग्रा.पं. निवडणुकीची धुरा 18हजार कर्मचाऱयांवर

Patil_p

जिल्हय़ात ‘मान्सून’ची दमदार हजेरी

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत शाळांना पालकांच्या प्रतिसादाची प्रतिक्षा

Abhijeet Shinde

ऑक्सिजन प्लांटची आमदारांकडून पाहणी

NIKHIL_N

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Patil_p

रत्नागिरी : वेरवली बुद्रुक येथे शॉर्ट सर्किटने दुकानाला आग; लाखो रुपयांचे नुकसान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!