तरुण भारत

कोरोनाच्या लढय़ात अखंड सावधपणच कामी येणार

ग्रामीण भागात पोचलेल्या कोरोनो संसर्गाचा सामाजिक प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर, स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन व अखंड सावधपणा हा ग्रामीण जनतेने दाखविलेला शहाणपणाच कामी येणार आहे.

लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू होईपर्यंत गोवा राज्य ग्रीन झोनमध्ये सुरक्षित असल्याचा समज होता. जूनच्या पहिल्या आठवडय़ात वास्कोतील मांगोरहिल या गजबजलेल्या लोकवस्तीत अचानक 6 कोरोनाबाधित आढळले आणि प्रशासनाचा बेसावधपणा उघड झाला. अवघ्या दहा दिवसात कोरोना रुग्णांनी तीनशेचा आकडा पार केला आहे. झपाटय़ाने वाढत चाललेल्या संसर्गामुळे सुशेगाद गोवा खडबडून जागा  झाला असून वास्को शहर पूर्ण लॉकडाऊन करण्याचा दबाव सरकारवर वाढू लागला आहे. विरोधकानंतर आता काही सत्ताधारी आमदारांनीही या मागणीवर जोर दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मात्र लॉकडाऊन न करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. 

Advertisements

मे महिन्याच्या अखेरपर्यंत परराज्यातून व विदेशातून येणाऱया प्रवाशांमधून एक दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. वास्कोतील घटनेनंतर कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. संसर्गाचा प्रसार राज्यातील सत्तरी, फोंडा, सांगे, काणकोण या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने भीती व चिंता वाढली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण 292 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या 33,283 चाचण्यांमध्ये 32,198 चाचण्या नकारात्मक तर 1089 अहवाल अजून यायचे आहेत. गोमेकॉत दिवसाकाठी केवळ 425 चाचण्यांचे नमुने तपासणे शक्य असल्याने, यापुढे परराज्यातून येणाऱया सर्व प्रवाशांची कोविड चाचणी होणार नाही. मात्र त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागेल, असा नवीन आदेश जारी करण्यात आला आहे.

कोरोनाचे हे संकट गडद होतानाच, सरकारला अर्थकारणाचे चक्र सुरू ठेवावे लागेल. ज्या वास्को भागात सध्या कोरोनाचा कहर आहे ते महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. गोव्यातून खनिज माल व कोळशाची निर्यात याच बंदराच्या शहरातून होते. त्यामुळे अर्थकारणाचे चक्र सुरू ठेवण्यासाठी वास्को बंद ठेवण्यास सरकार राजी नाही. सरकारपुढे आधी अर्थकारण की सामाजिक आरोग्य हा पेच निर्माण झाला आहे. राज्यातील खनिज वाहतूक 13 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याने तूर्त वास्को शहर लॉकडाऊन करणे सरकारला व्यावहारिकदृष्टय़ा परवडणारे नाही.

राज्याच्या महसूलप्राप्तीचा महत्त्वाचा स्रोत असलेला पर्यटन व्यवसायही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोरोनाला हाताळतानाच विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्याचे कसब साध्य करावे लागेल. एकंदरीत परिस्थिती पाहता सरकारची वाटचाल याच धोरणाकडे सुरू असलेली दिसते. त्यामुळे अर्थकारण व त्याच्या जोडीला अखंड सावधपणा हा समर्थांचा विचार आचरणात आणूनच पुढे जावे लागणार हे निश्चित.

पहिल्या लॉकडाऊननंतर राज्यात सापडलेले 7 रुग्ण बरे झाल्यानंतर गोवा राज्य कोरोनामुक्त जाहीर करण्याची घाई सरकारने केली. कारण कोरोनाचा संसर्ग हा बेसावध क्षणीच गाठणारा आहे. अमेरिका, इटली, ब्राझील या प्रगत राष्ट्रांना हीच बेफिकिरी महागात पडली. लाखो लोकांचे बळी देऊन त्यांना या महामारीची किंमत चुकवावी लागली आहे. यातून धडा घ्यायला हवा होता. समाधानाची बाब म्हणजे गोव्यात आत्तापर्यंत सापडलेले सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झाले. बहुतेक रुग्ण असिम्प्टोमेटीक आहेत. ग्रामीण भागात जे नवीन रुग्ण आढळले त्यापैकी बहुतेक आरोग्यसेवक असून वास्को भागात ते डय़ुटीवर होते. यापुढे गाफिल न राहता ग्रामीण भागात प्रवेश केलेल्या संसर्गाला वेळीच आवर घालीत, त्याचा सामाजिक प्रसार थोपविण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांनी जो शहाणपणा दाखविला त्याची दखल घ्यावी लागेल. गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडताच ज्या स्वयंस्फूर्तीने लोकांनी घरीच थांबून जो जनता कर्फ्यू पाळला तोच पॅटर्न आत्ता येणाऱया संकटाना तोंड देताना राबवावा लागणार आहे.

सरकारने पाचव्या लॉकडाऊनमध्ये राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास मुभा दिली तरी मोठय़ा देवस्थानांनी दि. 30 जूनपर्यंत मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय हॉटेल्स व रेस्टॉरंट खुले करण्यास मोकळीक असली तरी, राजधानी पणजीसह इतर शहरातील हॉटेल्सना ग्राहकांचा लाभणारा अल्प प्रतिसाद व कामगार गावी गेल्याने ती बंदच ठेवावी लागली आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारकडून लॉकडाऊनचा आदेश येईपर्यंत जनता थांबली नसून खबरदारीचे उपाय म्हणून आता तीच स्वयंस्फूर्तीने निर्णय घेऊ लागली आहे.

सध्या कठीण प्रश्न आहे तो शाळा सुरू करण्यासंबंधी. कोरोनाचा प्रभाव कमी होईपर्यंत शाळा बंदच ठेवाव्यात, असा मतप्रवाह जोर धरू लागला आहे. उच्च माध्यमिक व महाविद्यालये सुरू करताना व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघांना विश्वासात घ्यावे तसेच शिक्षण व आरोग्यतज्ञांची समिती स्थापना करून त्यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा अशी सूचना काही आमदारांनी केली आहे. जी ऑनलाईन शिक्षणपद्धती राबविण्यात आली ती, नेटवर्कअभावी कुचकामी ठरू लागली आहे. शाळा सुरू करताना शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णयावरही शिक्षक व पालकांमध्ये गोंधळ दिसतो.

मोसमी पाऊस उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. पावसाचा जोर वाढताच, संसर्गजन्य रोग डोके वर काढणार. त्यामुळे सध्या कोरोनाच्या लढाईत आघाडीवर असलेल्या आरोग्यखात्याची खरी कसोटी लागणार आहे. कोविड व पावसाळी संसर्ग अशा दोन आघाडय़ांवरील ही लढाई असेल. गेल्या तीन महिन्यांपासून 24 तास अथक सेवा देणाऱया आरोग्य कर्मचाऱयांना आपले आरोग्य सांभाळत या येणाऱया संकटाचा मुकाबला करण्यासाठी मानसिकदृष्टय़ा तयार राहावे लागेल. गोमंतकीय जनतेलाही या साथीच्या रोगांशी मुकाबला करण्यासाठी त्यांना साथ द्यावी लागणार. ग्रामीण भागात पोचलेल्या कोरोनोच्या संसर्गाचा सामाजिक प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर, स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन व अखंड सावधपणा हा ग्रामीण जनतेने दाखविलेला शहाणपणाच कामी येणार आहे.

सदानंद सतरकर

Related Stories

कोरोनाच्या जनुकीय बदलाचे आव्हान

Patil_p

ड्रगमाफियांची पाळेमुळे उखडण्याची गरज

Patil_p

आरोपीच्या पिंजऱयात डोनाल्ड ट्रम्प

Patil_p

नवे भान…

Patil_p

‘दिल्ली’त एकत्र, ‘गल्ली’त वेगळे लढणार!

Patil_p

ब्रह्ममय कसे व्हावे

Patil_p
error: Content is protected !!