वृत्तसंस्था/ लंडन
स्वीत्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररच्या उजव्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असून यंदाच्या वर्षात उर्वरित हंगामातून माघार घेत असल्याचे त्याने ट्विटरद्वारे जाहीर केले. 2021 च्या हंगामामध्ये आपण जोमाने पुनरागमन करु असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
फेडररने यापूर्वी प्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेण्याचे जाहीर केले होते, मात्र आता त्याला यंदाच्या हंगामातील अमेरिकन ओपन स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे. फेडररच्या उजव्या गुडघ्यावर लवकरच एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या गुडघ्याच्या दुखण्याने उचल खाल्ली. यामुळे लवकरात लवकर उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेणे क्रमप्राप्त आहे. 2017 च्या हंगामात मी जे केले तसेच मला आताही करावे लागणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे तंदुरूस्त होऊन थेट पुढील हंगामातच मी पुन्हा टेनिस कोर्टवर उतरेन, असे फेडररने स्पष्ट केले.
दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला जोकोविककडून ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनल सामन्यात फेडररला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर कोरोना महामारीमुळे ग्रँडस्लॅमसह इतर कोणत्याही स्पर्धा झाल्या नाहीत. आता तीन महिन्याच्या कालखंडानंतर जगभरात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाल्याने प्रेंच व अमेरिकन ओपन स्पर्धा होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत फेडररचा जलवा मात्र दिसणार नाही, हे निश्चित आहे.