तरुण भारत

मांगोरहिलमध्ये वाढते रुग्ण… वाढती अस्वस्थता !

लोकांना आरोग्याची भिती अन् मानसिक कोंडमारा : जिल्हाधिकाऱयांची वास्कोत अधिकाऱयांसमवेत बैठक

प्रतिनिधी / वास्को

Advertisements

वास्कोतील मांगोरहिलच्या वस्तीत कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत चालल्याने इथल्या लोकांमधील भितीही दिवसेंदिवस वाढत आहेत. या भितीमुळे काही लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागलेल्या असून मनाचा कोंडमारा आणि भिती अशा परिस्थितीत अडकल्याने या वस्तीत आता अवस्थतता पसरलेली आहे. काही लोकांनी कंटेनमेंट झोनमधून सुटका करण्याची मागणी गेल्या दोन दिवसांपासून केलेली आहे. बुधवारी या वस्तीतील 24 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले.

  मांगोरहिल हा भाग गोव्यातील कोरोना प्रसाराचा केंद्र बिंदू ठरलेला आहे.  गोव्यातील इतर भागात वास्कोविषयी भिती व्यक्त होऊ लागलेली आहे. इतर शहरांतून वास्कोकडे येणाऱया लोकांच्या संख्येवरही वास्कोतील सद्यस्थितीचा परिणाम झालेला आहे. मांगोरहिलनंतर शहरातील इतर भागातही हा संसर्ग पसरत चालल्याने संपूर्ण वास्कोतच आता अवस्थता निर्माण झालेली आहे. सर्वाधिक अस्वस्थतेचे वातावरण मांगोरहिलमध्ये पसरले आहे.

 रूग्णांची संख्या पावणे तीनशेहून अधिक  

  मासळी विक्रेत्या व्यक्तीपासून या संसर्गाला सुरवात झाली. त्याचे पूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यानंतर शेजाऱयांनाही लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर ही संपूर्ण वस्तीच कोरोनोच्या विळख्यात सापडली आहे. मंगळवारी मांगोरहिलच्या या वस्तीत जवळपास अडिचशे कोरोना रूग्ण सापडल्याचे उघडकीस आले होते. बुधवारी यात 24 रूग्णांची भर पडली. अद्याप नागरिकांची तपासणी चालू असल्याने ही संख्या वाढण्याचा धोका आहे.

 वास्कोत वाढते रुग्ण… वाढती अस्वस्थता

वाढत्या रुग्णांबरोबर मांगोरहिलच्या वस्तीत दिवसेदिवस भितीही वाढत आहे. भितीमुळे काही नागरिकांना आरोग्याच्या समस्याही भेडसावू लागलेल्या आहेत. त्यामुळे या वस्तीत आता ऐनवेळी निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ओपीडी सज्ज करण्यात आलेली आहे. काही दिवसांपासून याच झोनमधील लोकांनी शेकडोंच्या संख्येने घराबाहेर पडून रूग्णवाहिका आणि सोयीसुविधांच्या मागणीसाठी निदर्शने केली होती. त्यामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध झालेली असली तरी जीवनावश्यक वस्तू व इतर सुविधांबाबत अजूनही आबाळ सुरूच आहे.

आरोग्याची भिती आणि मानसिक कोंडमारा

   या लोकांना वस्तीतून बाहेर पडता येत नाही आणि योग्य व्यवस्था पुरवणेही प्रशासनाला शक्य झालेले नाही. दुसऱया बाजुने वस्तीतील लोकांमध्ये कोरोनाची लागण वाढतच चाललेली आहे. त्यामुळे भितीमध्येही वाढ होत आहे. वस्तीत अडकून पडल्याने मनाचा कोंडमाराही होत आहे. अशा परिस्थितीमुळे कंटेनमेंट झोनमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. या वस्तीतील काही लोकांनी आपला उद्रेक व्यक्त करून  या झोनमधून आपली सुटका करण्याची मागणी गेल्या दोन दिवसांपासून केलेली आहे.

 दरम्यान, वास्कोत मांगोरहिल तसेच इतर भागातही काल बुधवारी कोरोना प्रकरणे वाढल्याचे दिसून आले आहे. नवेवाडे, शांतीनगर या भागात काही कुटुंबांना क्वारंटईन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मांगोरहिल भागात ओपीडी कार्यरत असून कोविड चाचणीसाठी नमुनेही घेण्यात येत आहेत.

पालिका संचालकांकडून परिस्थितीची पाहणी

पालिका प्रशासकीय संचालक तारिक थॉमस यांनी बुधवारी मुरगाव पालिकेला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत व काही नगरसेवक उपस्थित होते. पालिकेच्या एक महिला कर्मचारी कोरोनाबाधीत झाल्याने पालिका कार्यालयात भिती पसरली होती. त्यामुळे सर्व पालिका कर्मचाऱयांनी कोविड तपासणी केली आहे. तारिक थॉमस यांनी कर्मचाऱयांची चौकशी केली. कोरोनाला घाबरू नका, त्याला सोबत घेऊनच आता कार्यरत राहावे लागणार आहे. स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत कार्यरत राहा अशी सूचना त्यांनी केली. तसेच लॉकडाऊनचा विचार आता कुणी करू नये. लॉकडाऊनवर पालिकेने भर देऊ नये. लॉकडाऊनने प्रश्न सुटणार नाही असे ते म्हणाले.

जिल्हाधिकाऱयांची वास्कोत अधिकाऱयांसमवेत बैठक

बुधवारी दुपारी वास्कोत जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी स्थानिक शासकीय अधिकाऱयांसमवेत बैठक घेऊन वास्कोतील कायदा व सुव्यवस्था तसेच इतर ताज्या विषयांवर चर्चा केली. अधिकाऱयांना उपयुक्त सूचनांही त्यांनी केल्या. मुरगावचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक व संबंधीत इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

वास्कोतील काही बंद व्यवहार झाले सुरळीत

दरम्यान, काल बुधवारी तिसऱया दिवशीही वास्कोतील बऱयाच व्यापाऱयांनी आपले व्यवहार बंद ठेवले. मात्र, गेले दोन दिवस बंद राहिलेले नगरपालिका मार्केट व संडे मार्केट या पालिकेच्या अखत्यारीतील मार्केटमधील व्यवहार काही प्रमाणात पुन्हा सुरळीत झाले आहेत. इतरही काही लोकांनी काल व्यवहार सुरू केले. मासळी मार्केट मासळी अभावी गेल्या काही दिवसांपासून ओस आहे. तर भाजी मार्केटमधील व्यापाऱयांनी पूर्ण बंद ठेवलेला आहे.

‘बडा मांगोर’ला मुक्त करावे : आल्मेदा

मांगोरहिलमधील कंटेनमेंट झोनमध्ये येणाऱया मोठय़ा वस्तीला या क्षेत्रातून मुक्त करावे अशी मागणी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. ‘बडा मांगोर’ म्हणून ओळखल्या जाणाऱया या वस्तीत कोरोनाचा उपद्रव नसल्याने या वस्तीला या झोनमधून वगळणेच योग्य होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या वस्तीत दोन वस्तीत येतात. एक वस्ती मोठी असून ती नौदलाच्या वरूणापुरी नाक्यासमोर आहे. तर दुसरी वस्ती मांगोरहिलच्या दूरध्वनी केंद्रासमोर असून ती वस्ती छोटी आहे. छोटय़ा वस्तीत कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. मोठय़ा वस्तीत अद्याप एकही कोरोनाबाधीत आढळून आलेला नाही. तसेच तेथील कुणाची आरोग्य तपासणी करण्याचीही वेळ आलेली नाही. ही वस्ती सुरक्षित असल्याचे आतापर्यंत दिसून आलेले आहे. मात्र त्यांनाही कंटेनमेंट झोनमध्ये टाकल्याने या वस्तीतील लोकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. त्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्या संतापातूनच मंगळवारी या वस्तीतील काहींनी कडधान्य रस्त्यावर आणून टाकले होते. त्यांना कंटेनमेंट झोनमध्ये डांबल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. या परिस्थितीची दाखल घेऊन आमदार आल्मेदा यांनी वरील मागणी केली आहे.

Related Stories

कोकण रेल्वेत 23 लाखांचा गुटखा जप्त

Amit Kulkarni

भारताच्या खऱया इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान द्या

Patil_p

दुर्लक्षित घटकांच्या समस्या सोडविणार : मुख्यमंत्री

Patil_p

बाणावली येथील धाडीत गांजासह आरोपी अटकेत

Patil_p

आजपासून शनिवारपर्यंत दररोज पावसाची शक्यता

Amit Kulkarni

करमल घाटात वाहन अपघात

Amit Kulkarni
error: Content is protected !!