तरुण भारत

‘अमृत’ च्या नावाखाली ‘विष’?

अमृत योजनेतून ड्रेनेजमिश्रीत फेसयुक्त पाण्याचा पुरवठा
ठेकेदारांना लिकेज सापडेना, नळ बंद करुन ठेवण्याचा अजब सल्लाविषारी पाण्यापेक्षा कोरोनाने मेलेलं बरं
संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

शहरवासियांना 24 तास शुध्द पिण्याचे पाणी देण्यासाठी कोटय़वधींचा चुराडा करुन अस्तित्वात आलेल्या ‘अमृत’ योजनेतून गेल्या दोन दिवसांपासून ड्रेनेजमिश्रीत आणि फेसयुक्त पाण्याचा पुरवठा सुरू आहे. एकिकडे कोरोना संसर्गाची उरात धडकी आणि अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा धोका असताना आता ‘अमृत’ च्या नावाखाली ‘विष’ प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. ठेकेदाराला लिकेज सापडेना, नगरसेवक चौकशी करेनात आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही फिरकेनात, यामुळे विषारी पाणी पिण्यापेक्षा कोरोना होऊनच मेलेलं बरं, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

मिरजकर नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने अमृत योजना अस्तित्वात आणली. गेल्या एक वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहे. डिसेंबर 2019 मध्येच किल्लाभाग, रेवणी गल्ली, गाडवे चौक, कोकणे गल्ली, वखारभाग, बालगंधर्व नाटय़गृह परिसरातील रहिवाशांना या योजनेतून कनेक्शन देण्यात आले. यापूर्वी तर उघडय़ावर अस्ताव्यस्त टाकलेल्या पाईपलाईनमधून उद्घाटनाविनाच पाण्याचा लोंढा सुरू झाला. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर येऊन तळ्याचे स्वरुप आले होते. या प्रकारामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला होता. त्यानंतरही अनेकवेळा या योजनेच्या पाईपलाईनला गळतीचे ग्रहण लागले. ठेकेदाराने कामचुकारपणा केल्याने आजही काही ठिकाणी गळती लागण्याचे आणि ड्रेनेजचे पाणी मिसळण्याचे प्रकार सुरू आहेत.

24 तास आणि तेही फिल्टरयुक्त पाणी अर्थात ‘अमृत’ देणारी ही योजना सुरूवातीपासूनच कायम विविध कारणास्तव चर्चेत राहिली. योजनेसाठी खोदण्यात आलेल्या पाईपलाईनच्या खड्डय़ांमुळे तर संपूर्ण शहराची चाळण झाली. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पाडून ती अर्धवटरित्या बुजविले. या खड्डय़ामुळे शहरात वारंवार अपघातही झाले. त्यामुळे ही योजना प्रारंभीपासूनच नागरिकांच्या शिव्याशापांची धनी ठरली होती.

योजनेच्या पूर्णत्वासाठी महापालिकेने कोटय़वधी रुपयांचा चुराडा केला. मात्र, ठेकेदाराने कामचुकारपणा करुन योजनेच्या उद्घाटनापूर्वीच महापालिकेचा भोंगळ कारभार उघडय़ावर पाडला. काम सुरू असताना लाभधारकांना दिलेल्या पाईप त्यांच्या घरापर्यंत देऊन खड्डे मुजविण्याची गरज होती. मात्र, केवळ तात्पूरती मलमपट्टी करुन लाखो रुपये घशात घालण्याचा उद्योग ठेकेदाराने केला आहे. याला महापालिकेतील काही अधिकारीही कारणीभूत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून रेवणी गल्ली, कोकणे गल्ली, गाडवे चौक, बालगंधर्व परिसर आणि किल्ला भाग येथे या योजनेतून काळपट, शेवाळलेल्या आणि फेसयुक्त पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. दुपारी चार वाजता पाणी सुटल्यानंतर प्रारंभी हिरवळ पाणी येते. अर्धा-एक तासानंतर काळपट आणि त्यानंतर थेट ड्रेनेजयुक्त पाणी येत आहे. रात्री साडेदहा ते आकरा वाजेपर्यंत गढूळ पाणी पुरवठा सुरू असतो. या पाण्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने अंघोळीसाठीही पाण्याचा वापर करता येत नसल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले. त्यातच जुने नळपाणी कनेक्शनही बंद केल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना हाल, वनवास सोसावा लागत आहे. परिणामी घरात नळ असूनही बोअरचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

ठेकेदाराला लिकेज सापडेना
नागरिकांच्या तक्रारीनंतर या भागात ठेकेदाराने नियुक्त केलेल्या दोन कर्मचाऱयांनी स्वतः येऊन पाहणी केली. पाणी सुटण्याच्या वेळेस प्रत्येकाच्या घरात डोकावून पाहिले. पाणी दुर्गंधीयुक्त, शेवाळलेले आणि गढूळ येत असल्याचे त्यांनीही याची देही याची डोळा अनुभवले. लिकेज कोठून आणि कोणत्या पाईपला आहे?, ड्रेनेजचे पाणी कोठून शिरले? याचा शोध सुरु झाला. संपूर्ण गल्ली-बोळ या कर्मचाऱयांनी पिंजून काढला. मात्र, लिकेज सापडलेच नाही. अखेर त्यांनी वैतागून सर्वच नागरिकांना नळ बंद करुन ठेवण्याचा अजब सल्ला दिला.

प्रशासनाच अलबेल…
एकीकडे कोरोनाची उरात भरलेली धडकी, पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यूचा संभाव्य धोका असताना विषारी पाण्याच्या पुरवठय़ामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. असे असताना महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसते. वारंवार तक्रारी करुनही एकही अधिकारी साधा फिरकत नाही. नगरसेवकही चौकशी करीत नाहीत. अमृतच्या नावाखाली घराघरात विष पुरवठा होत असताना महापालिका प्रशासनच अलबेल असेल तर कोरोना महामारीतही भीषण रोगराईचे तांडव माजण्यास विलंब लागणार नाही.

कोरोनानेच मेलेलं बरं
नळावर पाणी भरलेल्या प्रत्येक भांडय़ात विष दिसत आहे. काळपट ड्रेनेजयुक्त पाणी आणि प्रचंड दुर्गंधीने त्रासावलेल्या नागरिकांना घरात थांबणेही मुश्कील बनले आहे. नळाला पाणी येताच घरात ड्रेनेजच्या पाण्याची दुर्गंधी पसरत असल्याने श्वास घुटमळत आहे. पाणी पिणे तर सोडाच आंघोळ करण्याच्या लायकीचेही नाही. लहान बालके, वृध्द आजारी पडत आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रचंड स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. मात्र, घराघरात पाण्यातून विष पोहोचल्यानंतर पाणी पिऊन रोगाला मिठी मारण्यापेक्षा कोरोना होऊनच मेलेलं बरं, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

Related Stories

सोन्याळ येथे कोरोनाविषयी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शंभर टक्के उत्तीर्ण; तोंडी परीक्षा कोणाची

Abhijeet Shinde

कोरोना काळात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम प्रशंसनीय – पालकमंत्री

Sumit Tambekar

मिरज कृष्णाघाट येथे पाण्यात अडकलेल्या आठ नागरिकांना काढले बाहेर

Abhijeet Shinde

ढवळीतील निधन झालेले युवा उपसरपंच ५७ मतांनी विजय

Abhijeet Shinde

‘ठाकरे सरकारमुळेच राज्य कोरोनाची राजधानी’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!