तरुण भारत

कोरोना संसर्गामुळे वास्कोतील शहर आरोग्य केंद्र अडचणीत, 34 पैकी 24 कर्मचाऱ्यांना लागण

प्रतिनिधी / वास्को

वास्कोत पसरलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे वास्कोतील शहर आरोग्य केंद्र अडचणीत सापडले आहे. या केंद्राच्या चौतीसपैकी 24 कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झालेली असून आरोग्य कर्मचारीच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने वास्कोतील या आरोग्य केंद्राच्या इतर कामांवरही परीणाम झालेला आहे. पावसाळी आजारांना तोंड देण्यासाठी या केंद्रात त्वरीत कर्मचाऱयांची व्यवस्था होणे गरजेचे आहे.

Advertisements

वास्कोतील मांगोरहिल भागातून सुरू झालेली कोरोनाची साथ वास्कोतच नव्हे तर गोव्यातील इतर भागातही पोहोचून या संसर्गाने आता गंभीर रूप धारण केलेले आहे. वास्कोतील मांगोरहिल भागातील व या भागाशी संबंधीत असे जवळपास साडे तीनशे कोरोना बाधीत आतापर्यंत आढळून आलेले असून चौदा दिवसांपूर्वी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले रूग्णसुध्दा अद्याप बरे होऊन घरी परतलेले नाहीत. शिवाय वास्कोतील रूग्णांमध्ये दिवसेदिवस वाढच होत असून बऱयाच जणांची भरती मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे.

कोरोनाचा शहर आरोग्य केंद्राला जबर धक्का

मांगोरहिलच्या संपर्कातून आतापर्यंत आरोग्य खात्याबरोबरच वीज खाते, मुरगाव पालिका, पोस्ट कार्यालय अशा ठिकाणांवरील कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात आरोग्य खात्याच्या वास्कोतील शहर आरोग्य केंद्राला कोरोनाने जबरदस्त झटका दिला आहे. या विभागाच्या वास्कोतील 34 पैकी डॉक्टरांसह चौवीस कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य खात्यातील खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली. हे कर्मचारी वास्को परीसरातील तसेच मडगाव, सांगे, सत्तरी या भागातीलही आहे. कोरोना बाधीत झाल्याने ते सध्या डय़ूटीपासून दूर असल्याने शहर आरोग्य केंद्रच अडचणीत सापडलेले आहे.

आता पावसाळा सुरू झालेला असून डेंग्यू, मलेरीया सारखे आजार डोके वर काढण्याची भिती आहे.  गेल्या काही वर्षांपासून वास्कोत डेंग्यू आणि मलेरिया गंभीर समस्या निर्माण करीत आहे. त्यामुळे शहर आरोग्य केंद्राला सध्याच्या दिवसांत पावसाळी आजाराने दूर ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे होते. मात्र, जनतेच्या आरोग्याची खबरदारी घेणारे आरोग्य खात्याचे कर्मचारीच सध्या कोरोना विरूध्द लढता लढता स्वतःच कोरोना बाधीत झाल्याने इतर कामांवर परीणाम होऊ लागलेला आहे. डेंग्यू आणि मलेरीयाविरूध्द उपाययोजना करण्यासाठी वास्कोतील शहर आरोग्य केंद्राला आता मनुष्यबळ पुरवण्याची गरज निर्माण झालेली आहे.

मुरगाव पालिका कर्मचारी निगेटीव्ह

दरम्यान, मुरगाव पालिका कर्मचारी कोविड चाचणीत निगेटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेतील एका महिला कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याने 65 कर्मचाऱयांची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीत सर्व कर्मचारी कोरोनापासून मुक्त असल्याचे स्पष्ट झाले. सहकारी कोरोना बाधीत झाल्याने पालिका कर्मचाऱयांमध्ये भिती पसरली होती. मात्र, कर्मचाऱयांनी या भितीचा परीणाम दैनंदिन कामावर होऊ दिला नाही.

वास्कोतील भाजी मार्केटमधील व्यवहार सुरू

दरम्यान, आता वास्को शहरातील जवळपास सर्व व्यवहार सुरू झालेले आहेत. शहरातील भाजी मार्केटमधील व्यापाऱयांनी काल शनिवारपासून आपापले व्यवहार सुरू केले. कोरोना प्रसार रोखण्याचा प्रयत्न म्हणून या व्यापाऱयांनी स्वंयघोषीत लॉकडाऊन केला आहे. त्यांच्याबरोबर पालिका मार्केट व इतरांनी व्यवहार बंद ठेवले होते. मात्र, हळुहळु आता जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत झालेले आहेत. शहरातील अवघ्याच काही दुकानदारांनी व्यवसायीक अडचणी तसेच कोरोनाचा धोका टाळण्याच्या हेतून दुकाने उघडलेली नाहीत.

कंटेनमेंट झोनचा कालावधी वाढण्याची शक्यता

दरम्यान, मांगोरहिलमधील लोक कंटनमेंट झोनपासून मुक्त होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. या कंटेनमेंट झोनला आज चौदा दिवस पूर्ण होत आहेत. लोकांच्या अडचणी दिवसेदिवस वाढत आहेत. ओपीडीमधून लोकांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. मांगोरहिलमध्ये कोरोना बाधीत लोकांची संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोनचा कालावधी वाढण्याची चिंता लोकांमध्ये आहे.

पोलिसांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था व पीपीई किटस्

वास्कोतील कंटेनमेंट झोनचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने सरकारने या वस्तीभोवती गस्त घालणाऱया पोलिसांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. कंटेनमेंट झोनसाठी 180 पोलीस सध्या सेवा बजावत असून हे पोलीस आपली डय़ुटी संपल्यावर घरी जाऊ नयेत यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. चुकून एखादा पोलीस कर्मचारी कोरोना बाधीत झाल्यास हा संसर्ग त्याच्या घरापर्यंत पोहोचू शकतो. याची दखल घेऊन खास कंटेनमेंट झोनसाठी सेवा बजावणाऱयां पोलिसांसाठी सरकारने वास्को शहराला जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणा खाण्याची व्यवस्था केलेली आहे. या पोलिसांच्या सुरक्षेसाठी पीपीई किटस्सुध्दा उपलब्ध करण्यात आलेले असून आणीबाणीचा प्रसंग उद्भभवल्यास हे पोलीस पीपीई किटस्चा उपयोग करणार आहेत.

Related Stories

सर्वपक्षीय सल्लागार समितीची स्थापना करा : गोवा फॉरवर्ड

Patil_p

मजुरांच्या नावे भाजपकडून 13 कोटींचा घोटाळा

Omkar B

केपे विभागीय कृषी कार्यालयाकडून झेंडू लागवडीला चालना

Omkar B

संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Patil_p

केपेतील 200 शेतकऱयांनी पाहिला पंतप्रधान मोदींचा संवाद

Omkar B

कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी

Omkar B
error: Content is protected !!