तरुण भारत

महावीर अभयाण्यात चार जलसंवर्धन प्रकल्प

पावसाळी पाण्याचा होणार संचय : उन्हाळय़ात वन्य प्राण्यांचीही तहान भागणार

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

 वनखात्याने हाती घेतलेल्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर’ म्हणजेच जलसंवर्धन या महत्त्वाच्या प्रकल्पाचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत. मोले येथील महावीर अभयारण्यात चार ठिकाणी असे प्रकल्प बांधून पूर्णत्त्वास आले असून उन्हाळय़ात वन्यप्राण्यांची तहान भागवितानाच, त्यांचे पाण्यासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत. शिवाय मोठय़ा प्रमाणात वाया जाणाऱया पावसाच्या पाण्याचेही वर्षभरासाठी भूगर्भात संचय होणार आहे. केंद्र सरकारच्या जलसंवर्धन योजनेखाली या प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे.

 महावीर अभयारण्य क्षेत्रातील मोक्याच्या जागा निवडून मोले, करंझोळ, म्हायडा व तांबडीसुर्ल या ठिकाणी या प्रकल्पांची बांधणी करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यांपासून हे काम हाती घेण्यात आले होते व पाऊस सुरु होण्यापूर्वी ते पूर्ण झाले. जूनचा पाऊस सुरु होताच जल संचयनाचा सकारात्मक परिणाम त्यातून दिसून आला. वास्तविक या प्रकल्पांचा पाया गेल्या वर्षी घालण्यात आला होता. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोन प्रकल्प बांधण्यात आले होते. वन्य प्राण्यांकडून त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो हेही तपणासण्यात आले. निरीक्षणानंतर बरेच प्राणी पाण्यासाठी तेथे फिरकत असल्याचे स्पष्ट झाले. बिबटय़ा, अस्वल, गवेरेडे, हरणे या वन्यप्राण्यांबरोबरच विविध प्रकारच्या पक्षांचा पाण्यासाठी संचार याठिकाणी आढळून आला.

पाण्यासाठी होणारे प्राण्यांचे स्थलांतर थांबणार

या जलसंवर्धन प्रकल्पामुळे पाण्यासाठी आपल्या अधीवासातून प्राण्यांचे होणारे स्थलांतर थांबण्यास मदत झाल्याने त्यांचे लोकवस्तीजवळ फिरकणे कमी होईल. या शिवाय मोठय़ा प्रमाणात वाया जाणारे पावसाचे पाणी जमिनीत झिरपतानाच, अभयारण्य क्षेत्राच्या जवळपास असणाऱया गावातील विहिरी व इतर जलस्रोतांचे झरे टिकून राहण्यासाठी त्याचा फायदा होणार असल्याची माहिती महावीर अभयारण्याचे वन संरक्षक परेश परोब यांनी दिली. महावीर अभयारण्यात एकूण 18 नैसर्गिक जलकुंड व 4 काँक्रिटने बांधलेले जलकुंड आहेत, त्यासाठीही हे पाणी वापरले जाणार आहे. प्रकल्पांसाठी निवडण्यात आलेली जागा रानातील नैसर्गिक नाल्यांना जोडूनच निवडलेली आहे. या नाल्यांवर छोटे बंधारे बांधून पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याची सोय करण्यात आली आहे, जेणेकरुन अभयारण्यात वर्षभर पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही.

प्रकल्पाचे बांधकाम पारंपरिक पद्धतीने

 प्रकल्पांचे बांधकाम पारंपरिक पद्धतीने माती व दगडांचा वापर करुन करण्यात आले आहे. शिवाय एकाही झाडाची कत्तल करण्यात आलेली नाही. वनखात्याचे कर्मचारी व पारंपरिक बंधारे बांधणाऱया जाणकार लोकांच्या मदतही त्यासाठी घेण्यात आली आहे.  साधारण डिसेंबर महिन्यात रानातील जलस्रोतांचे पाणी आटू लागते. त्यानंतर पाच महिने तसेच उन्हाळय़ात जूनचा पाऊस सुरु होईपर्यंत वन्य प्राणी व पक्षांची पाण्याच्या शोधात भ्रंमती सुरु होते. जवळपास पाणी न मिळाल्यास ते आपला अधीवास सोडून पाण्यासाठी लोकवस्तीजवळ किंवा दुसऱया भागात जाण्याचा धोका असतो. पाण्यासाठी त्यांचे होणारे हे स्थलांतर थांबावे व त्यांना आपल्या अधीवास क्षेत्रातच पाणी मिळावे यासाठी वनखात्याची ही योजना उपयुक्त ठरणार आहे. जलसंचयासाठी बांधलेले जलाशय प्राणी व पक्षांसाठी नैसर्गिकरित्या आकर्षित करणारे असून वन्यजीवांची अन्नसाखळी टिकून राहण्यासही मदत होणार आहे. एका निरीक्षणामध्ये पर्यावरणीय साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या बेडकांसाठीही हे पाणथळ उपयुक्त ठरु लागले आहेत. अशा जागांवर बेडकांची अंडी व प्रजनन वाढू लागल्याचेही स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारच्या निधीतून प्रकल्पांचे बांधकाम : संतोष कुमार

मुख्य वनपाल संतोष कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या योजनेविषयी माहिती देताना मोले महावीर अभयारण्या व्यतिरिक्त राज्यातील इतर अभयारण्यामध्येही अशाप्रकारच्या प्रकल्पांचे काम हाती घेतल्याची माहिती दिली. केंद्र सरकारकडून जलसंवर्धन योजनेखाली वनखात्याला साडेतीन कोटी रुपयांचा  निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी छोटय़ा स्वरुपात असे प्रकल्प राबण्यात आले होते. पण आता वनखात्यातर्फे पावसाच्या पाण्याचे संवर्धन करतानाच वन्य प्राण्यांची गरज भागविण्याचा हेतूही साधला जात आहे.

Related Stories

यावर्षी राज्यात तिसऱयांदा सर्वाधिक मान्सूनपूर्व पाऊस

Omkar B

पुरस्कारप्राप्त शिक्षकांना यापुढे सेवेत मुदतवाढ नाही

Patil_p

पैसेअभावी कॅनेडीयन नागरिक कांदोळीत अडकून राहिला

Omkar B

भावाकडून मोठय़ा बहिणीचा खून

Patil_p

पत्रादेवी येथे कडक पोलीस बंदोबस्त

Patil_p

लॉकडाऊनचा निर्णय कळताच कुडचडे बाजारात लोकांची गर्दी

Amit Kulkarni
error: Content is protected !!