तरुण भारत

नदी प्रदूषण प्रकरणी टंकरचा शोध सुरू

डेरवण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

चिपळूण

Advertisements

मुंढे परिसरासह कोसबी, फुरुस गावातून वाहणाऱया नदीत अज्ञाताकडून रसायन सोडण्यात आल्याने नदीचे पाणी पांढरे झाले आहे. नदी प्रदुषणप्रकरणी रसायन सोडणाऱया संबंधित टॅकरचा शोध सुरू असून डेरवणपासूनच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. आमदार शेखर निकम यांनी या प्रकरणी सखोल चौकशीच्या व गडनदीचे पाणी सोडण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी घटनास्थळी जाऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

   मुंढे गावातून वहात येणारी नदी कोसबी, फुरुस या गावांनंतर कुटरे मार्गे थेट संगमेश्वर तालुक्यातील गडनदीला जोडली जाते. या नदीलगतची अनेक गावे या नदीवर अवलंबून असून मासेमारीही मोठय़ा प्रमाणावर होते. शनिवारी रात्री अज्ञाताने या नदीत फुरूसदरम्यान रसायन सोडले. पाणी दूषित झाल्याने मृत माशांचा खच पडू लागला आहे. रविवारी उघड झालेल्या या प्रकारामुळे फुरुस, कुटरे, येगाव, नांदगाव, कुंभरखणी, कुचाबे, कुशिवडे, खेरशेत आदी गावांना पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत.

पाणी सोडण्याच्या सूचना  

पाणीत रसायन सोडण्याची एवढी मोठी घटना घडूनही सावर्डे पोलिसांकडून अद्याप कोणतीच कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे सोमवारी आमदार निकम यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याशी संपर्क साधत या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत रसायन सोडणाऱया टँकरचा शोध घेण्यास सांगितले. त्याचबरोबर गडनदी धरणातून अधिकडचे पाणी सोडण्याच्या सूचना केल्या.

  स्थानिकांच्या मदतीशिवाय अशक्य?

  कुठल्यातरी रासायनिक कारखान्याचे रसायन येथे टॅंकरने आणून त्याची विल्हेवाट लावण्यात आली असण्याची शक्यता आहे. शहरापासून दूर अशा आडमार्गाला आणून रसायन सोडण्याचे धाडस स्थानिकाच्या मदतीशिवाय अशक्य असल्याने त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवण्यात आली आहेत. त्यासाठी डेरवण फाटय़ापासून फुरूसमध्ये वाटेतील असणारी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

 पाण्याचे नमुने तपासणीसाठी

   येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी दुपारीच फुरूस येथे जाऊन दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यामुळे हे रसायन नेमके कोणत्या कारखान्याचे आहे याची माहिती समोर येणार आहे.

 प्रकरणाचा छडा लागलाच पाहिजे

   कोसबी, मुंढे येथून वहात येणारी ही नदी बादेकोंड फुरुस मार्गे कुटरे आरवलीकडे जाते. या नदीवर असंख्य गावच्या पाणीयोजना अवलंबून आहेत. मात्र दूषित पाण्यामुळे या योजना धोक्यात आल्या आहेत. त्यामुळेच हे दुष्कृत्य करणाऱयांचा शोध लागलाच पाहिजे अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे.

Related Stories

‘चिपळूण नागरी’कडून मुख्यमंत्री सहाय्यतेसाठी 1 कोटीची मदत

Patil_p

जिल्हय़ात 54 नवे रूग्ण

Patil_p

वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

Ganeshprasad Gogate

उद्या आनंद घेण्यासाठी आज घरीच रहा

Patil_p

धान्य वाहतुकीच्या ट्रकमुळे अपघाताची शक्यता

NIKHIL_N

जीर्ण वाशिष्ठी पूलप्रश्नी राष्ट्रवादीचा महामार्ग उपविभागाला सवाल

Patil_p
error: Content is protected !!