तरुण भारत

रवींद्र जडेजा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : स्टीव्ह स्मिथ

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

सध्याच्या कालावधीत जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचे वैयक्तिक मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले आहे.

रविवारी इन्स्टाग्रामवर काही क्रिकेट शौकिनांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना स्टीव्ह स्मिथने जडेजा हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नवोदित क्रिकेटपटूंमध्ये भारताचा के.एल राहुल हा सर्वात आकर्षक क्रिकेटपटू असल्याचे त्याने सांगितले. मैदानावर वावरताना जडेजाच्या चपळ क्षेत्ररक्षणाचे चित्र पाहावयास मिळते. चेंडूवर चित्त्याप्रमाणे झेप घेण्याची लकब जडेजामध्ये दिसून येत असल्याने क्रिकेट क्षेत्रातील अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंनी जडेजाचे कौतुक करत आपल्या मताशी ते सहमत असल्याचे स्मिथने म्हटले आहे. भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज के.एल. राहुल हा एक जगातील दर्जेदार क्रिकेटपटू असून त्याने अल्पशा कालावधीत आपला मोठा चाहतावर्ग जमविला आहे. के.एल.राहुलने 36 कसोटी, 32 वनडे आणि 42 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. राष्ट्रीय संघातील त्याने आपले स्थान मजबूत केले आहे. फलंदाजीबरोबरच मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारीही सोपविली जाते.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जगातील एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. क्रिकेट क्षेत्रात त्याला ‘लिजेंड मि. कूल’ असे ओळखले जाते तर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याला आक्रमक कर्णधार म्हणून ओळखले जाते. मैदानावर उतरल्यानंतर तो आपल्या फलंदाजीचा दर्जा शौकिनांना दाखवून देत असतो, असेही स्मिथने म्हटले आहे. गेल्यावर्षी झालेल्या ऍशेस मालिकेतील बर्मिंगहॅमच्या कसोटीत स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात 144 धावांची खेळी केली होती. आपल्याला सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा सर्वाधिक आवडते, असे मतही 31 वर्षीय स्मिथने व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज तसेच विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड हा जगातील सभ्य आणि तंत्रशुद्ध क्रिकेटपटू असल्याचेही त्याने सांगितले.

Related Stories

बेन स्टोक्स-सिबलीचे शतकी ‘मास्टरस्ट्रोक’

Patil_p

मुंबई इंडियन्सची अंतिम फेरीत धडक

Patil_p

INDvsENG अंतिम सामन्यासह भारताचा 3-2 ने मालिका विजय

Shankar_P

जर्मन, डच मोटो जीपी शर्यत रद्द

Patil_p

नेमबाजी सराव शिबिराच्या दुसऱया टप्प्याला आज प्रारंभ

Patil_p

तेंडुलकर, संगकारा, जयवर्धने सर्वोत्तम फलंदाज : पनेसर

Patil_p
error: Content is protected !!