तरुण भारत

विकास हेच आपले ध्येय जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी

तालुका पंचायत विकास कामांची आढावा बैठक

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगाव तालुक्मयातील ग्रामीण भागातील विविध समस्या सोडविण्याबरोबरच तालुक्मयाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले ध्येय आहे. यासाठी अधिकारी वर्गाने ग्रामीण भागात अधिक लक्ष द्यावे, अशी सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि बेळगाव जिल्हय़ाचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अधिकारीवर्गास केली. सोमवारी जिल्हा पंचायत सभागृहात बेळगाव तालुका पंचायत विकास कामांची आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मंत्री जारकीहोळी बोलत होते. ग्रामीण भागातील विकासासंदर्भात सर्वपक्षियांना सोबत घेऊनच काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी ता. पं. चे कार्यकारी अधिकारी मल्लीकार्जुन कलादगी यांनी उद्योग खात्री अंतर्गत तालुक्मयात सुरू असणाऱया कामाची माहिती दिली. यावेळी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांनी कामे सुरू असली तरी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचे सांगितले. तर जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी कृती आराखडानुसार काम होत नसून नाल्यातील काढलेला गाळ नाल्याशेजारीच टाकण्यात येत आहे. यामुळे हा गाळ पुन्हा नाल्यातच मिसळत असल्याने या कामासाठी होणारा खर्च व्यर्थ होत असल्याचे सांगितले. यावेळी विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी नरेगा अंतर्गत कामे करताना अतिवृष्टी होणाऱया भागाचा सर्व्हे करून कृती आराखडा बनविण्यात यावा. आणि चांगले काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी आणि जि. पं. चे सीईओ डॉ. राजेंद्र के. व्ही. यांना केली.

उचगाव जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी मार्कंडेय नदीत दूषित पाणी मिसळत असल्याने या नदीपात्रात असणाऱया तीन खुल्या विहिरींचे पाणी प्रदूषित बनल्याचे सांगितले. या पाण्याचा वापर कंग्राळी खुर्दसह परिसरातील अन्य गावातील नागरिक पिण्यासाठी करत असतात. मात्र दूषित पाण्यामुळे गंभीर आजाराला निमंत्रण देण्यात येत आहे. यासाठी उपाययोजना करावी. मराठा डेंटल कॉलेजचे पाणीही याच नदीपात्रात सोडण्यात येते. यामुळेही समस्या निर्माण होत आहे. तर नदीतील अतिक्रमण हटवुन नदीपात्राची रूंदी वाढविण्यात यावी, अशी मागणी सरस्वती पाटील यांनी यावेळी केली. यावर जिल्हाधिकाऱयांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना परीस्थितीची पाहणी करून अहवाल देण्याची सूचना केली.

कंग्राळी खुर्दला स्मशानभूमी नसल्याने जागा देण्याची मागणीही सरस्वती पाटील यांनी यावेळी केली. तर एपीएमसी ते कंग्राळी खुर्दपर्यंत रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरू असून रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली. एपीएमसीला दुसरे गेट सुरू करण्यात आल्याने या मार्गावर अपघातांची संख्या वाढणार आहे. यासाठी हे गेट सुरू करण्यात येऊ नये. अन्यथा रास्ता रोको छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

शिक्षण व आरोग्य स्थायी समितीसाठी मंजूर झालेल्या 1 कोटी 13 लाखाचे अनुदान परत गेले आहे. दरवषी अनुदान परत जाण्याचे गौडबंगाल काय आहे? असा प्रश्न समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच येळ्ळूर येथे गेल्या चार महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेची अंमलबजावणी अद्यापही का सुरू करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. केवळ योजनांची घोषणा करून न थांबता या योजना प्रत्यक्षात अंमलात आणाव्यात. येळ्ळूर हे मोठे गाव असून, 15 दिवसाआड गावात पाणी येत आहे. राष्ट्रीय पेय जल योजनेंतर्गत 60 लाख रुपये मंजूर झाले तरी अद्यापही काम सुरू करण्यात आले नाही. केवळ श्रेयवादासाठी हे काम थांबविण्यात आले आहे का? असेही त्यांनी विचारले. पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा येळ्ळूरवासियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा इशारा रमेश गोरल यांनी यावेळी दिला.

 येळ्ळूर रोडवर असणाऱया केएलई इस्पितळापर्यंत हिडकल जलाशयातून जलवाहिनी घालण्यात आली आहे. तेथूनच चार कि. मी. असणाऱया येळ्ळूरपर्यंत ही जलवाहिनी वाढविल्यास गावातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी झाली असती, असेही रमेश गोरल यांनी सांगितले. यावर जि. पं. सीईओ. डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी या विषयावर स्वत: लक्ष घालून विशेष बैठक बोलाविणार असल्याचे सांगितले.

राकसकोप धरणासाठी बेळवट्टी व राकसकोप गावातील 780 एकर जागा घेण्यात आली आहे. मात्र जमिनी दिलेल्या शेतकऱयांना धरणग्रस्त म्हणून प्रमाणपत्र अद्यापही दिले नसल्याचे ता. पं. सदस्य नारायण नलवडे यांनी सांगितले. 1963 मध्ये येथील शेतकऱयांनी आपल्या जमिनी धरणासाठी दिल्या आहे. मात्र अद्यापही येथील मराठी भाषिकांना न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. जि. पं. सदस्य मोहन मोरे यांनी बेळगुंदी येथे पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली. तसेच किणये धरणाचे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा केली. तिलारी धरणातील पाणी धामणे एस गावातून बेळगाव जिल्हय़ासाठी आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. यासंदर्भात महाराष्ट्रातील संबंधीत मंत्री आणि अधिकाऱयांशी चर्चा करावी, अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी जिल्हा पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे केली. जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी जिल्हय़ातील नादुरूस्त जलकुंभाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच नादुरूस्त जलकुंभांची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी केली. ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर, सुरेश किर्तने आदिंसह अन्य सदस्यांनीही आपल्या भागातील समस्या मांडल्या. व्यासपिठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, शहर पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमणी, ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील आदी उपस्थित होते..

Related Stories

सरकारी पदवी महाविद्यालयातील नवीन खोल्यांचे उद्घाटन

Amit Kulkarni

जनावरांना फळभाजी घालताना दक्षता घ्या

Rohan_P

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा पीयुसीचा निकाल 23.92 टक्के

Amit Kulkarni

स्मार्ट रस्त्यावर साचले पाणीच पाणी

Patil_p

महापूर येताच महापालिकेला आली जाग

Patil_p

‘जलसंजीवन’ योजना शेतकऱयांना ठरली जीवनदायिनी

Omkar B
error: Content is protected !!