तरुण भारत

भाजपात प्रवेश केल्याने काणकोणचा विकास करता आला

उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे पत्रकार परिषदेत उद्गार : विरोधकांच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देणार

प्रतिनिधी / काणकोण

Advertisements

काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर आपल्यावर विरोधकांकडून सतत टीका केली जात आहे. मात्र आपण भाजपात प्रवेश केला म्हणून काणकोण मतदारसंघाचा विकास करता आलेला आहे. आपल्यावर टीका जरूर करावी, पण ती विधायक असावी. विरोधकांच्या टीकेला आपण योग्य वेळी उत्तर देणार आहे. टीकाकारांना उत्तरे देऊन वेळ गमावण्यापेक्षा आपला वेळ आपण विकासकामे राबविण्यावर खर्च करत आहे, असे सांगून मागच्या वर्षभरात काणकोण मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा पाढा काणकोणचे आमदार व उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी सोमवारी वाचला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱया कार्यकाळातील वर्षपूर्तीनिमित्त काणकोण भाजपा मंडळाने पालिका सभागृहात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत फर्नांडिस बोलत होते. कोविड-19 च्या महामारीमुळे गोवा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे काणकोण मतदारसंघातील रवींद्र भवन, कृषी भवन, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रकल्प, गावडोंगरीचे पंचायतघर हे प्रकल्प रखडले आहेत, असे त्यांनी सांगितले. तरी देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ज्या पद्धतीने प्रशासन हाताळत आहेत त्याबद्दल फर्नांडिस यांनी त्यांचे यावेळी अभिनंदन केले. जे विरोधक आज मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध गळा काढत आहेत त्याच व्यक्ती चार महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे फायली घेऊन येत होत्या, असा टोमणा त्यांनी मारला.

पोळे चेकनाका बंद करायला हवा

पोळे चेकनाका बंद करायला हवा अशी आजही आपली मागणी आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱया वाहनांना परवानगी द्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. काणकोणच्या जागरूक नागरिकांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून चार दिवस बाजार बंद ठेवला त्याबद्दल काणकोणच्या व्यापाऱयांचे त्याचबरोबर अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळल्याबद्दल काणकोणच्या नागरिकांचे फर्नांडिस यांनी अभिनंदन केले.

भाजपचे राज्य सचिव सर्वानंद भगत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वर्षपूर्तीचा संपूर्ण कार्यक्रम सादर केला. मोदी यांनी देशवासियांना लिहिलेल्या पत्राची प्रत काणकोण मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते घराघरात पोहोचविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नगराध्यक्षा नीतू देसाई, आगोंदचे सरपंच प्रमोद फळदेसाई, श्रीस्थळचे गणेश गावकर, गावडोंगरीच्या सुमन गावकर, खोतीगावचे दया गावकर, पैंगीणचे जगदीश गावकर, लोलयेचे शैलेश पागी यांनी लॉकडाऊनच्या काळात आपआपल्या क्षेत्रात राबविलेल्या कामांची माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला काणकोण भाजप मंडळ अध्यक्ष महेश नाईक, सचिव सूरज ना. गावकर, महिला मोर्चाच्या मनुजा ना. गावकर, युवा मोर्चाचे पंकज ना. गावकर, संजू पागी, उपनगराध्यक्ष गुरू कोमरपंत, नगरसेवक दिवाकर पागी, हेमंत ना. गावकर, श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, प्रशांत देसाई, श्रीस्थळ जैवविविधता समितीचे अध्यक्ष विनय तुबकी, भूषण प्रभुगावकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप मंडळाने आणि उपसभापती फर्नांडिस यांनी काणकोणच्या पत्रकारांचे कौतुक करताना कोविड-19 च्या महामारीच्या बाबतीत त्यांनी यशस्वीरीत्या जागृती केल्याचे मत मांडले. यावेळी भाजप मंडळातर्फे काणकोणच्या पत्रकारांना वैद्यकीय कीटही वितरित करण्यात आले.

Related Stories

आगामी पाच वर्षांत विविध क्षेत्रात 30 हजार नोकऱया

Amit Kulkarni

सरकारी कर्मचाऱयांसाठी बायोमेट्रिक हजेरी 15 मे पर्यंत स्थगित

Amit Kulkarni

म्हादई प्रत्यक्ष पाहणीवेळी कर्नाटकची दंडेलशाही

Amit Kulkarni

निवडणूक गोवा फॉरवर्डतर्फे काणकोण मतदारसंघातून लढविणार

Patil_p

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे ध्येय

Amit Kulkarni

तिळारी कालव्यात अडकला गव्यांचा कळप

Amit Kulkarni
error: Content is protected !!